वेदांचा उदात्त साम्यवाद

17 Jun 2020 21:43:42


rigvedas_1  H x



वेदांत हा आम्हास एक दुसर्‍यांना वाटून खाण्याचा संकेत करतो- ‘केवलाघो केवलादी भवति।’ म्हणजेच जो केवळ ‘आदी’ म्हणजे एकटाच खाणारा आहे, तो केवळ ‘अद्य’ म्हणजे पापाचे भक्षण करणारा आहे. वेदांची संस्कृती दातृत्वाची शिकवण देते. केवळ ‘मी व माझेच सर्वकाही...’ अशा स्वार्थी वृत्तीने पछाडलेल्या लोकांना वेदांनी ‘राक्षस’ किंवा ‘दानव’ म्हटले आहे.



मोघमन्नं विन्दते अप्रचेताः,
सत्यं ब्रवीमि वध इत्स तस्य ।
नार्यमणं पुष्यति नो सखायं
केवलाघो भवति केवलादी ॥
(ऋग्वेद- १०/११७/६)
 

अन्वयार्थ


 
सर्वव्यापक सर्वज्ञ परमेश्वर वेदवाणीच्या माध्यमाने उपदेश देताना म्हणतो- लोकहो! (अहं) मी (सत्यं ब्रवीमि) खरेच सांगतो की, (अप्रचेताः) वाईट प्रवृत्तींचा, हीन दर्जाचा व दुर्बुद्धीने ग्रासलेला (दुर्जन) माणूस हा (मोघम्) व्यर्थच (अन्नं) अन्नधान्य व इतर उपभोगाच्या वस्तू (विन्दते) मिळवतो, कमवतो. कारण (सः) ते सर्व धन-वैभव हे (तस्य) त्या मानवाच्या (वध इत्) एक प्रकारे मृत्यूचे, वधाचे, नाशाचे किंवा दुःखाचेच कारण आहे. विशेष म्हणजे, हा स्वार्थी माणूस एक तर (न अर्यमणं) ना सत्पुरुषांना किंवा ना राष्ट्रकल्याणकारी कार्यांना किंवा (नो सखायं) ना ही आपल्या मित्र-आप्तेष्ट बांधवांना (पुष्यति) प्रदान करतो, वितरीत करतो किंवा पुष्ट (तृप्त) करतो! खरोखरच (केवलादी) एकटा भक्षण करणारा, भोगणारा मनुष्य (केवलायः) केवळ फक्त पापांचेच भक्षण करतो. (तो तर फक्त पापभक्षी आहे.)

 
विवेचन


 
आपल्या उदात्त अशा मानवोपकारी आणि सर्वजीवकल्याणकारी मूल्यांमुळे ‘वैदिक संस्कृती’ ही जगात सर्वश्रेष्ठ मानली जाते. याच सर्वोत्तम तत्त्वांमुळे सा प्रथमा संस्कृतिः या विश्ववारा।असा जगात सर्वप्रथम व प्राचीन होण्याचा सर्वोच्च बहुमान हिला प्राप्त झाला आहे. भूत-वर्तमान-भविष्य अशा त्रिकाळी समग्र समस्यांचे निवारण करण्याचे सामर्थ्य याच वैदिक विचारप्रणालीमध्ये दडले आहे. त्यासोबतच देश-देशांतरीच्याच नव्हे, तर समग्र सृष्टीत जिथे कुठे जीवसृष्टीचा वास असेल, त्या सर्वांकरिता सद्विचारांची मंगलमय रुजवण करून सर्वांना समतेने जगण्याचा मूलमंत्र शिकविण्याचे कार्य हीच तर वैदिक संस्कृती करते आहे. या भूतलावर ज्या कोणत्या संस्कृती व मत-पंथ उदयास आले, त्या सर्वांमध्ये विद्यमान जे जे उत्तम, उदात्त, पवित्र व दिव्य विचार, ते ते याच वैदिक संस्कृतीच्या ज्ञानगंगेतून प्रवाहित झाले आहे.

 
जगातील साम्यवादी तत्त्वज्ञानाचा उदयदेखील वेदातूनच होतो. वरील मंत्र म्हणजे खर्‍या अर्थाने वैदिक साम्यवादाला प्रमाणित करणारा एक उत्कृष्ट नमुना होय. वैदिक प्रत्यक्ष ईश्वर किंवा मंत्रद्रष्टे ऋषी वेदवाणीच्या माध्यमातून बुद्धिवादी अशा मानवांकरिता मोठ्या आंतरिक तळमळीने म्हणतात की, ‘सत्यं ब्रवीमि।अर्थात मी खऱेच बोलतो! माझ्यात यत्किंचितदेखील दुविधा, संशय किंवा असत्यता नाही-
‘अप्रचेताः मोघमन्नं विन्दते, स तस्य वध इत् ।’


 
या जगात जेवढे वाईट बुद्धीचे दुष्ट लोक असतात, तेवढे जे काही धन कमवतात, त्यांना अन्न-धन मिळविण्याचा मार्ग हा पवित्र नसतो. नानाविध अनिष्ट मार्गाने प्राप्त केलेली संपत्ती हीच त्यांच्याकरिता विपत्तीचे कारण ठरते. अन्याय व अत्याचाराच्या अधम पंथांचा अवलंब करीत लुबाडलेले धन हे न देवाय न धर्माय न बन्धुभ्यो चकास्ति।याप्रमाणे या ईश्वरीय कार्याला उपयोगी पडते ना धार्मिक विधी व दानादी कर्मासाठी कामास येते किंवा ना ही नातेवाईकांच्या मदतीला उपयुक्त ठरते. त्या वाढत चाललेल्या वैभवाचा शेवट मात्र नाशातच होतो. म्हणूनच ‘अप्रचेता’ म्हणजे जे दुर्जन असतात, त्यांची संपत्ती ‘मोघ’ (व्यर्थ) असते, ती अमोघ (सार्थ) कदापि नसते. या ना त्या मार्गाने (अधर्ममार्गी) कमावलेली संपदा चिरकाल टिकून राहणारी नसते. म्हणून दुष्टांनी धन कमावण्याच्या भानगडीत पडू नये. कारण, त्याद्वारे त्यांना शाश्वत (आत्म) सुख कदापि लाभणारच नाही. ‘त्या’ व्यर्थ धनाने ते भौतिकदृष्ट्या प्रगत झालेले दिसतील. पण, आध्यात्मिक आनंदापासून नेहमी वंचित राहतील. कारण, सुखाची सुरुवातच धर्मा (पवित्र कर्मा) पासून होत असते. सुखस्य मूलं धर्मः।’ सुखाचे मूळ हे धर्मकार्यात असते, असे नीतीवचन सांगते.

 
जागतिक इतिहासाची पाने चाळली असता, आपणास हे वास्तव लक्षात येईल की, जे अधर्माने मिळवलेले राज्य स्थिर राहिलेच नाही. अनिष्ट संपत्तीसोबतच ते कमावणार्‍या अप्रचेता मंडळींचा ‘वध’च झालेला आहे. मात्र, जे ‘प्रचेता’ म्हणजे ‘प्र + चेता’ प्रकर्षाने, प्रयत्नाने सुबुद्धीयुक्त राहिले, अशांची धवल कीर्तीध्वजा मात्र युगानुयुगे फडकतच आहे. रावण, कंस, दुर्योधन किंवा त्यानंतरच्या युगात वसुंधरेवर जे जे ‘अचेता’ होऊन गेले, ते ते संपून गेले.
खरे तर धन कोणतेही असो, विद्याधन, बलधन, शरीरधन, साधन, कुलधन, भौतिक धन इत्यादी... हे सर्व शोभून दिसते, ते सज्जनांमुळे! कारण, सज्जन हे आपल्या पवित्र बुद्धीद्वारे वरील सर्व प्रकारच्या धनांचा सदुपयोग करून घेतात. म्हणूनच अशांना वेदांनी ‘प्रचेता’ असे म्हटले आहे. ‘चिति’ही एक दिव्य शक्ती आहे. यालाच ‘मेधा’ किंवा ‘बुद्धी’ असे म्हणतात. चितिशक्तीने परिपूर्ण असलेल्यांनाच चेता - चेतलेला, जागा असलेला (जागृत) असे म्हटले जाते. त्यांच्यात उत्कृष्ट चेतना असते. त्यांना चैतन्याने भारावलेले सत्पुरुष असेदेखील म्हणतात. प्रचेता लोकांचा समूह असेल, तर ‘लक्ष्मी’ स्थिर स्वरुपात निवासते. याउलट अप्रचेता असलेल्या (दुर्बुद्ध) लोकांचा समूह वाढला की हीच लक्ष्मी अस्थिर व चंचल बनते. आज प्रचेता वृत्तीचा समाज लुप्त आहे आणि अप्रचेता प्रवृत्तींच्या लोकांचा समुदाय भरमसाठ वाढतोय. म्हणूनच सध्या त्या अनिष्ट संपदेसह त्यांना कमावणार्‍या दुर्जनांचाही ‘वध’ होताना दिसतोय. कदाचित हा ‘वध’ (नाश) शारीरिक नसेल, पण तो मानसिक व आत्मिकदृष्ट्या तर नक्कीच आहे.
 
दुसरी एक महत्त्वाचा उपदेश वरील मंत्राच्या शेवटच्या चरणात दिसून येतो. ज्याची चर्चा प्रारंभी ‘वैदिक साम्यवाद’ या अनुषंगाने केलेलीच आहे. वेदांत हा आम्हास एक दुसर्‍यांना वाटून खाण्याचा संकेत करतो- ‘केवलाघो केवलादी भवति।’ म्हणजेच जो केवळ ‘आदी’ म्हणजे एकटाच खाणारा आहे, तो केवळ ‘अद्य’ म्हणजे पापाचे भक्षण करणारा आहे. वेदांची संस्कृती दातृत्वाची शिकवण देते. केवळ ‘मी व माझेच सर्वकाही...’ अशा स्वार्थी वृत्तीने पछाडलेल्या लोकांना वेदांनी ‘राक्षस’ किंवा ‘दानव’ म्हटले आहे. हा केवळ स्वतःचाच विचार करतो, त्याला स्वार्थापुढे काहीच दिसत नाही. ते मानव नसून एक प्रकारे पशूच! आपल्या सभोवतालच्या दीन-दुःखितांचे दारिद्य्र पाहून त्यांना आपल्या जवळील थोडेसे धन द्यावे असे वाटत असेल, तर त्यांचे खाणे-पिणे सार्थक ठरते. आपल्या घासातून इतर आर्तजनांची भूक शमविण्याचा ज्यांचा प्रयत्न, ते खरोखरच देव कोटीतील सज्जन पुण्यभक्षी होत.
 
स्वतःजवळील धन किंवा भौतिक साधने गरजू व सत्पात्री अशा गोरगरिबांना वितरीत करणे, इतकेच काय तर प्राणिमात्रांवरदेखील दया करीत त्यांच्याकरिता आपली संपदा खर्ची घालणे, हेदेखील पुण्यभक्षण किंवा पुण्यदान होय. केवढा विशाल हा, वैदिक साम्यवाद! हाच पवित्र सद्भाव केशवसुतांच्या ‘वरदान’ या कवितेतून व्यक्त होतो.


 
कोणी अवतीभवती माझ्या,
मजले किंवा जमवियले ज्यां
पुरवाया ते त्यांच्या गरजा
द्या सामर्थ्य निदान
प्रभो, मज अन्य नको वरदान!
 

- प्रा. डॉ. नयनकुमार आचार्य

Powered By Sangraha 9.0