विद्यार्थी व ऑनलाईन शिक्षण

    दिनांक  17-Jun-2020 15:50:27
|


online teaching_1 &n


‘कोविड-१९’ या असाध्य साथीच्या रोगामुळे सारे जग स्तब्ध झाले आहे. सर्व क्षेत्रातील व्यवहार ठप्प झाले आहेत. प्रत्यक्षात असे भासत असले तरी, प्रत्येक क्षेत्राने तंत्रज्ञानाच्या मदतीने एक आभासी असे स्वतःच्या क्षेत्रापुरते जग निर्माण केले आहे. ‘झूम’, ‘गुगल मीट’, व्हॉट्सअ‍ॅप यांच्या मदतीने प्रत्येक क्षेत्राने आपले व्यवहार चालू ठेवले आहेत; याचा प्रत्यय घरी आई-वडिलांच्या ‘वर्क फ्रॉम होम’ या संकल्पनेतून आपण मागील दोन महिने अनुभवत आहोत. शिक्षण क्षेत्रही याला अपवाद नाही. या काळातही या तंत्रज्ञानाच्या मदतीने शैक्षणिक क्षेत्र कार्यरत आहे, असे चित्र सर्वत्र दिसत आहे. या अर्थाने या वर्षीच्या शालेय वर्षाची सुरुवात ‘थोडे हटके’ अशी आहे, ती आभासी आहे. परंतु, एक विद्यार्थी म्हणून आपण या बदलाला कसे सामोरे जायचे आहे, याची माहिती आपण या लेखातून करून घेऊया. 


प्रचलित पद्धतीनुसार आपल्या मागील इयत्तांची सुरुवात ही शाळा, शाळेचा परिसर, मित्र -मैत्रिणी, वर्ग शिक्षक अशा प्रत्यक्ष वातावरणात झाली. या वर्षाची सुरुवात तंत्रज्ञान युगात होत आहे. या तंत्रज्ञानाच्या मदतीने तुमच्या शाळेने ‘आभासी वर्ग’ तयार केला आहे. ज्या वर्गामध्ये तुम्हाला काही दिवस किंवा महिने बसायचे आहे. ‘आभासी वर्गपद्धती’ म्हणजेच ‘ऑनलाईन शिक्षणपद्धती’ होय. या वर्गात बसणे हे आपल्यासाठी काही काळ तरी गरजेचे आहे. त्यामुळे यातील तांत्रिक अडचणी, तंत्रज्ञानाच्या मर्यादा या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन, त्या परिस्थितीचा सकारात्मक दृष्टिकोनातून विचार विद्यार्थी म्हणून केला पाहिजे. इयत्ता दहावी-बारावीचे तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमाचे प्रत्येक वर्ष सर्वार्थाने महत्त्वाचे वर्ष आहे. यानुसार या वर्षी ऑनलाईन पद्धतीने शिकविला जाणारा अभ्यासक्रम पुढील काळ लक्षात घेता पुन्हा शिकवण्यास वेळ मिळणार नाही. त्यामुळे या आभासी वर्गात आपणाला बसायचे आहे, हे लक्षात घेऊन पुढील मुद्दे विचारात घेणे महत्त्वाचे आहे.


१. शैक्षणिक पर्यावरण

शाळेने/महाविद्यालयाने आपल्याला वेळापत्रक दिले आहे, त्याप्रमाणे ऑनलाईनचे वर्ग होणार आहेत. या वर्गात बसताना तुम्ही तुमच्या घरी असाल. घरामध्ये जिथे तुम्ही बसला आहात, तेथे शैक्षणिक पर्यावरण तयार करा. टेबल-खुर्ची असल्यास जरूर त्याचा वापर करा. जमिनीवर बसला असाल तर लिखाणासाठी छोटे टेबल समोर ठेवा. वेळापत्रकाप्रमाणे त्या-त्या विषयाचे पाठ्यपुस्तक व वही तयार ठेवा. विषयांच्या तासिकांप्रमाणे पुस्तके लावून ठेवा. सध्या वह्या उपलब्ध नसतील तर घरातील कागद वापरा. कागदावर वरती विषय व तासिका क्रमांक नोंदवा. दिनांक घाला. या शैक्षणिक वातावरणामुळे आपण अध्ययन करण्याच्या प्रक्रियेमध्ये पूर्णत: एकरूप व्हाल.


२. मानसिक पर्यावरण

ऑनलाईन शिक्षणामध्ये पडद्यावर समोर प्रत्यक्ष शिक्षक आहेत. आपण त्यांच्यासमोर आहात. आपण प्रत्यक्ष वर्गात आहोत, अशी स्वतःची मानसिकता तयार करा. आपले लक्ष शिक्षकांच्या शिकवण्याकडे द्या. वर्गात जसे महत्त्वाचे मुद्दे आपण लिहून घेतो, तसे मुद्दे आभासी वर्ग चालू असतानाही टिपून घ्या. शिक्षक पाठातील मुद्दे समजावून सांगत असतील, तर समोर पाठ्यपुस्तक ठेवा. त्या पाठ्यपुस्तकातील महत्त्वाचे मुद्दे अधोरेखित करा. या गोष्टी केल्यास मानसिक पातळीवर आपण पूर्णपणे शिकण्याच्या प्रक्रियेत स्वतःला सामावून घ्याल.


३. अध्ययन प्रक्रिया

शैक्षणिक व मानसिक पर्यावरण तयार झाले की, आपली अध्ययनाची प्रक्रिया सुरु होते. शिक्षक शिकवत असलेला भाग समजून घ्या. आपल्याला प्रश्न पडल्यास ते वहीत नोंदवून ठेवा. पुस्तकातील न कळलेल्या भागावर खूण करून ठेवा. विषयाचे आभासी वर्गातील अध्यापन झाल्यानंतर शक्यतो त्याच दिवशी दिवसभरात त्या भागाचे वाचन करा. वाचनातून तो भाग पक्का लक्षात राहील. जो भाग समजण्यात अडचण आली आहे, त्या भागावर शिक्षकांनी उपलब्ध करून दिलेल्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षकांना प्रश्न विचारा. दिलेले स्पष्टीकरण वहीत किंवा पुस्तकात लिहून ठेवा. वर्ग ऑनलाईन शिक्षणाच्या मदतीने आभासी स्वरूपात भरत असला तरी आपले शैक्षणिक वर्ष महत्त्वाचे आहे. त्यामुळे आभासी वर्गातील अध्ययन प्रक्रिया आभासी न ठेवता अभ्यास प्रत्यक्ष करायचा आहे याची जाणीव ठेवा.


४. डिजिटल शिक्षण


ऑनलाईन शिक्षण हे प्रत्यक्ष (लाईव्ह) प्रक्षेपणाच्या माध्यमातून होते. जेव्हा तुम्ही प्रत्यक्ष पडद्यावर या बाजूला व शिक्षक दुसर्‍या बाजूला असतात. मात्र, तंत्रज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेता, कदाचित तुमच्या शाळेने डिजिटल शिक्षणाचा पर्याय निवडला असेल. शैक्षणिक व्हिडिओ यांच्या मदतीने काही शाळांनी शिक्षण सुरु केले आहे. हे शिक्षण म्हणजे ‘डिजिटल शिक्षण’ होय. या तंत्रज्ञानाच्या मदतीने आपण शिक्षण घेत असाल तरी नमूद केलेले सर्व मुद्दे या प्रकारच्या शिक्षणातही महत्त्वाचे आहेत. शैक्षणिक पर्यावरण व मानसिक वातावरण महत्त्वाचे आहे. या बरोबरीने एक गोष्ट करणे गरजेचे आहे. आभासी वर्गात शाळा/ महाविद्यालय वेळापत्रक देत आहे. डिजिटल शिक्षणात आपणास वरील घटकांच्या मदतीने शाळा शैक्षणिक साहित्य उपलब्ध करून देत आहे. त्यामुळे डिजिटल शिक्षण घेताना स्वतःचे दिवसाचे वेळापत्रक तयार करा. प्रत्येक विषयाचे व्हिडिओ पाहाण्याची विषयांनुसार तासिका ठरवा. अध्ययन प्रक्रियेमागील शास्त्रानुसार तासिकांच्या नियोजनामुळे त्या विषयांचे अध्ययन जास्त चांगले होते. हे वेळापत्रक तुमचे तुम्ही करणार आहात. मात्र, त्याचे काटेकोर पालन करणे महत्त्वाचे आहे. तासिका वेळापत्रकाच्या मदतीने तुमचे डिजिटल शिक्षणही आभासी अध्ययनाप्रमाणे नक्कीच यशस्वी होईल.


गेलेला काळ परत येत नाही. त्यामुळे प्रत्यक्ष शाळा सुरु होण्यास कालावधी जाणार आहे. आपण ‘आपत्ती व्यवस्थापन’ हा घटक शालेय जीवनात शिकला आहात. त्यानुसार ही आलेली एक आपत्ती आहे. ती काही महिन्यांपुरती असली तरी हे वर्ष आपल्या दृष्टीने नेमके हेच महिने आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. तुमच्या शाळेने/महाविद्यालायाने तंत्रज्ञानाचा जो पर्याय निवडला आहे, त्या तंत्रज्ञानाच्या मदतीने शिक्षकांकडून या पुढील महिन्यात शिकवले जाणारे, शाळा/महाविद्यालये सुरु झाल्यावर पुन्हा शिकवण्यास वेळ उपलब्ध नसेल. त्यामुळे ते याच काळात समजून घेण्याची मानसिकता तयार करा. महाराष्ट्राची भौगोलिक परिस्थिती, तंत्रज्ञानाच्या मर्यादेमुळे जेथे शिक्षण सुरु होऊ शकत नाही, त्यांनी स्वयंअध्ययनास सुरुवात करा. पाठांचे वाचन करा. महत्त्वाच्या वर्षात आपण वरील गोष्टींचे मनन केल्यास नक्की यशस्वी व्हाल. आलेल्या परिस्थितीशी गट्टी करा, अभ्यासास सुरुवात करा ! यश तुमचेच आहे.
धन्यवाद !

- प्राची रवींद्र साठे

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.