भारत-चीन सीमेवर गोळीबार; भारताचे तीन सैनिक शहीद

16 Jun 2020 14:24:13

Indo china_1  H


सीमेवरील शांतता कराराचे चीनकडून उल्लंघन


नवी दिल्ली : भारत आणि चीनच्या सैन्यांमध्ये चकमक झाली. चिनी सैन्याच्या गोळीबारात भारताचे एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. जम्मू काश्मीरमधील लडाखमधील गलवान खोऱ्यात ही चकमक झाली. लडाखमधील सीमावादाच्या पार्श्वभूमीवर नुकतेच भारत आणि चीनमधील सैन्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक झाली होती. मात्र आता पुन्हा दोन्ही देशांच्या सैन्यामध्ये गोळीबार झाल्याने सीमेवरील चिंता वाढली आहे. या झटापटीत चीनचे काही जवान ठार झाल्याचेही म्हटले जात आहे.


चीनसोबत ही झडप झाल्यानंतर संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी चीफ ऑफ डिफेंस स्टाफ जनरल बिपिन रावत यांच्यासोबत बैठक घेतली. या बैठकीत लष्करप्रमुख आणि परराष्ट्र मंत्रीही उपस्थित होते. तर संरक्षण मंत्री राजनाथ सिंह पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेणार आहेत.


भारतीय लष्कराकडून जारी केलेल्या अधिकृत पत्रकानुसार, "गलवान खोऱ्यात सोमवारी रात्री डी-एस्क्लेशनच्या प्रक्रियेदरम्यान भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये हिंसक झडप झाली. या चकमकीत भारतीय सैन्यातील एक अधिकारी आणि दोन जवान शहीद झाले आहेत. दोन्ही देशांचे वरिष्ठ लष्कर अधिकारी यावेळी या मुद्द्यावर शांतता प्रस्थापित करण्यासाठी चर्चा करत आहेत."


सीमेवरील शांतता कराराचा चीनकडून भंग करण्यात आला आहे. भारत-चीन सीमेवर १९७५ नंतर प्रथमच असा गोळीबार होऊन सैनिकांचा मारल्याची घटना घडली आहे. १९७५ नंतर संघर्षात प्रथमच जवानांचा मृत्यू झाला. १९७५ ला भारताचे ४ जवान शहीद झाले होते. १९७५ ला अरुणाचल प्रदेशात संघर्ष उफाळला होता.



Powered By Sangraha 9.0