
चक्रीवादळाने झालेल्या नुकसानाची पाहणी करणार
रायगड : रायगड जिल्ह्यात ‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक जिल्ह्याच्या दौऱ्यावर जाणार आहे. गावोगावी मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या मालमत्तेचे, फळबागांचे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारचे आंतरमंत्रालयीन पथक मंगळवारी रायगडमध्ये येणार आहे.
मुंबईहून हे पथक अलिबागला रवाना होणार आहे. प्रथम नागावमध्ये नुकसानग्रस्त भागाची पाहणी करतील. त्यानंतर चौल येथे पाहणी करुन मुरुड तालुक्यातील बोर्लीला जातील. त्यानंतर काशिद, नांदगाव येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाईल.
दुपारच्या दरम्यान मुरुड तालुक्यातील प्रकृती रिसॉर्टमध्ये चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीबाबतचे जिल्हाधिकाऱ्यांचे सादरीकरण केल्यानंतर मुरुड तालुक्यातील आगरदांडाकडे नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली जाईल. श्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगार, हरिहरेश्वर येथे नुकसानग्रस्त भागाची पाहणी करुन पथकाचा रात्री महाड येथे मुक्काम असेल, असे जिल्हा प्रशासनाकडून सांगण्यात आले.