मुंबई : भारतीय जनता पार्टीचे जळगाव ग्रामीण जिल्हाध्यक्ष माजी खासदार व माजी आमदार हरिभाऊ जावळे यांचे मंगळवारी मुंबईत निधन झाले. मृत्यूसमयी ते ६७ वर्षांचे होते. करोनाची लागण झाल्यामुळे त्यांच्यावर मुंबईतील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. तिथेच उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालावली.भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी भाजप महाराष्ट्रतर्फे हरिभाऊ जावळे यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली. शेती, पाणी, सिंचन याबद्दल आत्मियता असलेला एक कर्तबगार नेता भाजपाने गमावला आहे, असे चंद्रकांतदादा पाटील म्हणाले.
हरिभाऊ जावळे यांना ३ जून रोजी करोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. त्यानंतर प्रकृती खालावल्याने त्यांना ५ जूनला मुंबई येथील बॉम्बे हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ हलविण्यात आले होते. आज, मंगळवारी दुपारी साडेबारा वाजता अखेरचा श्वास घेतला. हरिभाऊ जावळे जळगाव जिल्ह्यातील यावल विधानसभा मतदारसंघातून १९९९ साली सर्वप्रथम आमदार म्हणून विजयी झाले. त्यानंतर २००७ साली लोकसभा पोटनिवडणुकीत ते जळगाव मतदारसंघातून निवडून गेले. २००९ साली पुन्हा एकदा त्यांना रावेर लोकसभा मतदारसंघातून मतदारांनी विजयी केले. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीत ते रावेर मतदारसंघातून निवडून आले. महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेचे ते उपाध्यक्ष होते. ते जळगाव जिल्ह्यातील फैजपूरच्या मधुकर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन होते. त्यांचा अनेक शिक्षण संस्थांशी निकटचा संबंध होता. केळ्याची शेती, सिंचन, पाणी, ग्रामविकास या विषयात त्यांनी आत्मियतेने काम केले. ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक होते.
दोन वेळा खासदार आणि दोन वेळा आमदार राहिलेल्या हरिभाऊ जावळे यांचे सहकार क्षेत्रात भरीव कार्य असून, मधुकर सहकारी साखर कारखान्याच्या चेअरमन पदाची धुराही त्यांनी यशस्वीपणे सांभाळली होती. केळी उत्पादकांसाठी त्यांनी भरीव कामगिरी केली आहे. त्यामुळे त्यांना राज्यातील कृषी विभागातील राज्यमंत्र्यांचा दर्जा असलेली जबाबदारीही त्यांना सोपविण्यात आली होती. केळी प्रक्रियाउद्योग, सूक्ष्मसिंचन तसेच पूर कालवे योजना मतदारसंघात राबविण्यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा राहिला आहे. एक मनमिळाऊ माणूस, शांत आणि संयमी नेतृत्त्व म्हणून त्यांची जिल्ह्याच्या राजकारणात ओळख होती.