तटरक्षक 'केतकी'

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    15-Jun-2020
Total Views |

tress_1  H x W:


 





‘निसर्ग’ चक्रीवादळामुळे किनार्‍यावरील कांदळवने, केतकी, सुरुच्या झाडांचे महत्त्व आपल्याला समजले आहे. मात्र, गेल्या कित्येक वर्षांपासून दुर्लक्षित राहिलेल्या ‘केतकी’च्या झाडांच्या संवर्धनाविषयी आढावा घेणारा हा लेख...

 
 
 

 

प्रा. भूषण भोईर - गेली कित्येक वर्षे तटरक्षक म्हणून उपेक्षित असलेली कांदळवने २००४-०५ साली येऊन गेलेल्या त्सुनामीनंतर कायद्याने संरक्षित झाली आणि तिचे महत्त्व अधोरेखित झाले. त्यात दडलेल्या जैवविविधतेने संशोधकांचे, निसर्गप्रेमींचे लक्ष आकर्षित केले. मात्र, दुर्दैवाने ‘केतकी’चे वृक्ष दुर्लक्षित आणि उपेक्षितच राहिली. चिखल वगळता समुद्रावरील वाळू जी खूपच अस्थिर असते, अशा ठिकाणी ‘केतकी’ सहज उगवते. कांदळवनांनी चिखल असलेल्या क्षेत्रांची राखण केली. या क्षेत्राला समुद्रापासून संरक्षित करून त्यात लाखो जीवांना आसरा दिला. मानवाला त्सुनामी आणि भरती ओहोटीच्या आत शिरणार्‍या पाण्यापासून संरक्षण दिले. त्याचप्रमाणे ‘केतकी’सुद्धा आपले काम करत राहिली आणि करत आहे. समुद्रावरील अस्थिर वाळू ’केतकी’ची झाडे घट्ट धरून ठेवतात. समुद्राकडून वार्‍याने उडून येणारी वाळू आपल्या मुळांमध्ये घट्ट पकडून ही झाडे त्याचे छोटे-मोठे वाळूचे डोंगर उभे करतात. समुद्रापासून येणारा खारट वारा अडवतात. त्यामुळे केतकीच्या मागे जमिनीच्या बाजूने गवत आणि इतर लहान मोठी झाड झुडपे वाढतात. पावसाळ्यात मानवी वस्तीमधून वाहून येणारे पाणी केवळ ‘केतकी’मुळे गाळण होऊन समुद्रात पोहोचते.

 
 
 

गेली कित्येक वर्ष माणसाने ‘केतकी’च्या या वनांची निगा राखली नाही. याउलट त्याठिकाणी भराव टाकला, आग लावण्याचे प्रकार केले. अशा परिस्थितीतही ही झाडे केवळ पावसाच्या पाण्यावर तग धरुन राहतात. समुद्र किनार्‍यांवरील वाळूची धूप रोखण्याचे काम ‘केतकी’चे बन करते. तिच्या संरक्षणात लहान मोठे प्राणी-पक्षी आसरा घेतात. तिच्या छायेच्या भरवश्यावर समुद्री कासव आपली अंडी सोडून जातात. एवढं सगळं करूनही, ‘केतकी’ आजवर उपेक्षितच राहिली आहे. शेकडो वर्षे उपेक्षित असलेल्या ‘केतकी’च्या झाडांना कुणीच वाली उरला नाही. आमच्या पालघर जिल्ह्यातील चिंचणीच्या समुद्र किनारी असलेल्या भल्या मोठ्या ‘केतकी’च्या झाडांची ही कैफियत मी मांडत आहे. अलीकडेच चिंचणीच्या किनार्‍यावरील ‘केतकी’ची झाडे स्थानिकांनी कापून टाकली. समुद्राच्या लाटांपासून संरक्षण व्हावे म्हणून भिंत बांधावयाची असल्याने ही झाडे कापून टाकण्यात आली. काही महाभागांनी किनार्‍यांवरील क्रिकेटचे सामने सहजरित्या पाहता यावे, म्हणून या झाडांवर कुर्‍हाड उगारली. पालघर जिल्ह्यात राजकारण्यांनी ’केतकी’ तोडून समुद्रकिनार्‍यांवर तटरक्षक भिंती बांधल्या आणि त्याबळावर पुढील पाच वर्षे निर्धास्तपणे निवडणुका लढवल्या. त्यामुळे किनार्‍यांचा प्रश्न हा चुकीच्या पद्धतीने अशास्त्रीयरित्या हाताळला गेल्याने तो अधिकाधिक चिघळत गेला आहे.

 
 
 

किनार्यावर दिसणारी वाळू ही एका किनार्‍यावर कधीच थांबत नाही. ती प्रवाहासोबत एका किनार्‍यावरून दुसर्‍या किनार्‍यावर वाहत राहते. अशावेळी एखाद्या किनार्‍यावर धुपप्रतीबंधक बंधारा बांधला जातो, तेव्हा वाळूचे वहन थांबते आणि जिथे बंधारा बांधला जातो त्याच्यापासून पाच ते दहा किलोमीटरवर कुठल्या तरी ठिकाणी किनार्याची धूप सुरू होते. अशा पद्धतीने गरज नसलेल्या ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारा बांधण्याची गरज निर्माण होते. असे बंधारे बांधण्याचा काहीच उपयोग नसतो. उदा. सातपाटी या गावात माझ्या लहानपणी बांधलेला बंधारा दरवर्षी लाटांच्या तडाख्याने कमकुवत झाला. आता तो बंधारा पुन्हा बांधावा लागत आहे. शिवाय या बंधार्‍यांमुळे पावसाचे पाणी गावातून निचरा होण्यास अडचण निर्माण होते. ज्यामुळे बंधार्‍याच्या जमिनीकडील बाजूस सखल भागांमध्ये पाणी साचते. अतिवृष्टी, भरतीचे पाणी आणि पौर्णिमा किंवा अमावस्या एकत्र येतात तेव्हा गावात पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. त्यात जागतिक तापमानवाढ दिवसामागून दिवस आणखीन भर घालत आहे.

 
 
 

लोकांना आज ‘केतकी’चे महत्त्व समजवून देणे अत्यंत गरजेचे आहे. ज्याप्रमाणे कांदळवने चिखल जमिनीचे क्षेत्र समुद्रात वाहून जाण्यापासून रोखते. त्याचप्रमाणे वालुकामय किनारे समुद्रापासून संरक्षित करण्याचे अतिशय कठीण काम ‘केतकी’चे बन करत असते. शासनाने या ‘केतकी’ची उपेक्षा आतातरी थांबवायला हवी. ‘केतकी’ला कायद्याने संरक्षण देणे गरजेचे आहे. धूप होत असलेल्या समुद्र किनार्‍यांवर पर्यावरण पूरक वाळूच्या पिशव्यांचे बांध घालावे. तिथे ’केतकी’ची लागवड करून त्याच्या मागील बाजूस बांबू, बोरी, ताड, खजरी अशी देशी झाडे लावावीत. ज्यामुळ किनार्‍यांची होणारी धूप थांबवता येईल. तसेच स्थानिकांना ‘केतकी’च्या झाडांचे महत्व पटवून देण्यासाठी कार्यक्रम केले पाहिजेत. वातावरणातील तापमान वाढीस कारक असलेल्या कार्बन डायऑक्साइड शोषणारी या पृथ्वीवरील एकूण एक झाडे महत्त्वाची आहेत. त्यामुळे वेळीच सावध होऊन ‘केतकी’ आणि कांदळवनांचे संरक्षण आपल्या हातात घेणे आवश्यक आहे. या परिसंस्थेचे नाश करुन निसर्गाचा शत्रू होण्यापेक्षा तिचे संवर्धन करुन आशीर्वाद प्राप्त करणे गरजेचे झाले आहे.

 

(लेखक पालघरच्या ’सोनोपंत दांडेकर महाविद्यालया’तील प्राणीशास्त्र विभागात प्राध्यापक म्हणून कार्यरत आहे.)

@@AUTHORINFO_V1@@