लॉकडाऊन शिथिल होताच मुंबईत कचराऱ्यात वाढ!

15 Jun 2020 18:15:24

garbaage_1  H x


दरदिनी साडेपाच हजार मेट्रिक टन कचरा

मुंबई : कोरोनामुळे लागू करण्यात आलेले लॉकडाऊन शिथिल होताच मुंबईत दर दिवशी जमा होणाऱ्या कचऱ्यात वाढ झाली आहे. गेल्या अडीच महिन्यात तीन हजार मेट्रिक टनापर्यंत जमा होणारा कचरा आता साधारण साडेपाच हजार मेट्रिक टनावर पोहोचला आहे. तसचे रुग्णालये आणि प्रतिबंधित क्षेत्रात निर्माण होणाऱ्या कचऱ्याची विल्हेवाट पालिकेला शास्त्रोक्त पद्धतीने करावी लागते आहे.


मुंबईमध्ये दिवसाला साधारण सात हजार मेट्रिक टन कचरा जमा होत होता. मात्र कोरोना संसर्गामुळे लॉकडाऊन करण्यात आल्यामुळे कचऱ्याचे प्रमाण बरेच घटले होते. लॉकडाऊनमुळे अत्यावश्यक सेवा सुरू होत्या. जीवनावश्यक वस्तूसाठी मर्यादित वेळा असल्याने नागरिक त्याचवेळेत बाहेर पडत होते. खासगी कार्यालयेही बंद होती. अत्यावश्यक सेवा वगळता रस्त्यावर शुकशुकाट होता. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी तसेच व्यावसायिक क्षेत्रातील कचऱ्याचे प्रमाण कमी झाले होते. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात दररोज साधारण तीन हजार मेट्रिक टन कचरा जमा होत होता. मात्र लॉकडाऊन शिथील केल्यानंतर दुकाने, तसेच काही खासगी कार्यालये सुरू झाली. त्यामुळे सध्या मुंबईत रोज साडेपाच पाच हजार मेट्रिक टन कचरा जमा होऊ लागला आहे. शिवाय प्रतिबंधित क्षेत्र व रुग्णालय परिसरातील रोज १६.७ मेट्रिक टन कचऱ्याची शास्त्रोक्त पद्धतीने पालिकेला विल्हेवाट लावावी लागत असल्याची माहिती संबंधित पालिका अधिकाऱ्यांनी दिली.
Powered By Sangraha 9.0