चलना ही जिंदगी है...

    दिनांक  15-Jun-2020 21:55:13
|

sushant rajpoot_1 &n


आपल्या आयुष्यात आपल्याला असह्य वाटणारी जटील परिस्थिती येत असतेच. अशा बिकट समयी आपल्याला आशेचे सूर्यकिरण दिसत नाहीत. आणखी कशाला, समोर प्रसन्न आणि आश्वस्थ चेहरा दिसायचा म्हटले तर ती दुसर्‍या ग्रहावरची गोष्ट वाटते. या क्लिष्टसमयी आपल्या शब्दकोशात ‘आनंद’ नावाचा शब्द असेल का, असा संभ्रम आपल्याला पडतो.

माझ्या बहिणीचा ‘क्वारंटाईन’ काळातला वाढदिवस म्हणून आपण जमेल तसा साजरा करायचा, असे ठरविले. केक जरी नाही मिळाला तरी घाईघाईत का होईना, आठ-दहा दिवसांच्या सगळ्या आवश्यक खरेदीत थोडीशी काजूकतली घरी आणून ठेवली होती. संध्याकाळ आज काहीतरी गोड खायचं म्हणून. पण, नेमकी दुपारी मन हेलावणारी ‘ब्रेकिंग न्यूज’ आली आणि सगळ्यांचा मूडच गेला. बॉलीवूडच्या आकाशात नुकताच दिसू लागणार्‍या हिरो सुशांत सिंह राजपूतने आत्महत्या केली होती. काजूकतलीचा गोडवा हवेतच विरला. आपल्यापैकी कित्येक जणांनी आपले नातेवाईक, मित्रमंडळी ज्यांच्यावर कधी आपण जवळून तर कधी दुरून प्रेम केलं, अशापैकी कुणीतरी आत्महत्या केल्याची हृदयद्रावक बातमी यापूर्वी ऐकलेली आहे. आपल्या हृदयाचा ठोका त्यामुळे चुकला आहे. अलीकडे आत्महत्येच्या बातम्या आपण नेहमीच ऐकतो. आपल्यापैकी प्रत्येकाच्या मनात दोन अनावृत्त विचार आयुष्यात अधूनमधून किंवा एकदातरी येतात. त्यापैकी पहिला विचार म्हणजे देवाने माफ केलं, तर याचा/हिचा आता खूनच करून टाकीन आणि दुसरा विचार म्हणजे, आता सहन होत नाही बुवा. आयुष्यच संपून टाकावं हे बरं! या दोन्ही विचारांत ‘विनाश’ ठासून भरलेला आहे.


पण, हे विचार माणसाला त्या कृती करायला भाग पाडतील असे नाही. जोपर्यंत माणसाच्या मनाचा विवेक टिकून आहे, तोपर्यंत भरकटणार्‍या अस्तावरून विचारांचा लगाम त्याच्याच हातात आहे, हे निश्चित. बहुधा भावनेच्या उद्रेकात हे असे हिंसक आणि भडक विचार त्याच्या मनाला स्पर्श करून जात असावेत. थोडा बारकाईने विवेकनिष्ठ विचार केला तर लक्षात येईल की, सर्वांच्या आयुष्यात एक गोष्ट सर्वसामान्य आहे, ती म्हणजे आपल्या समस्या. समस्याविना माणूस म्हणजे मूळाविना उभा असलेला वृक्ष. केवळ अशक्यप्राय संकल्पना. समस्यांचे स्वरूप वेगवेगळे असते. त्याची पातळी कमीजास्त असेल, पण त्यातून निर्माण होणार्‍या यातनांचे स्वरूप मात्र एकच असते. आपल्या आयुष्यात आपल्याला असह्य वाटणारी जटील परिस्थिती येत असतेच. अशा बिकट समयी आपल्याला आशेचे सूर्यकिरण दिसत नाहीत. आणखी कशाला, समोर प्रसन्न आणि आश्वस्थ चेहरा दिसायचा म्हटले तर ती दुसर्‍या ग्रहावरची गोष्ट वाटते. या क्लिष्टसमयी आपल्या शब्दकोशात ‘आनंद’ नावाचा शब्द असेल का, असा संभ्रम आपल्याला पडतो.


लोक आत्महत्येच्या काळ्या समुद्रात का उडी मारतात, याचं एक विशिष्ट कारण सांगता येणं तसं कठीण आहे. पण, कारणं निश्चित असतात. कदाचित ती एकमेकांत गुंतलेली असतात. कधी ‘डिप्रेशन’सारखा आजार निराशेच्या भोवर्‍यात सापडलेल्या विकल मनाला आपल्या पोटात खेचतो, तर कधी चित्रविचित्र भासांच्या चक्रव्यूहात अडकलेला अभिमन्यू आत शिरल्यावर त्याला बाहेर पडता येत नाही. काहींचे वास्तविकतेचं भान काही क्षणांसाठी हरपते, तेव्हा त्यांना योग्य निर्णय घेता येत नाहीत. ‘आत्महत्या’ ही नेमकी या क्षणी जेव्हा वैचारिक ‘लॉजिक’ गायब होते, तेव्हाच उद्भवते. खरं तर आत्महत्या करणार्‍या मंडळींना विपत्तीच्या भूकंपातून सुटायचं असतं अगदी कायमचं. पण, एखादा माणूस स्वतःला आपदेतून वाचविण्यासाठी आपणच या जगातून निघून जातो, तेव्हा त्याला हे खरंच जाणवत नसावं की, जगातल्या अनेक सुंदर गोष्टींपासून तो मुकला आहे. त्याच्यावर जीवापाड प्रेम करणार्‍या प्रियजनांची साद आता त्याला ऐकू येणार नाही. तो ज्या जगात गेला, तिथे त्याला आता हाक मारणारं कुणी नाही. जीव घाबरलेला असताना अथांग प्रेमानं कुशीत घेऊन थोपटणारं प्रेम आता कुठून मिळणार? आजपर्यंत जीवनपथावर चालताना जी स्वप्नं पाहिली आणि ज्या महत्त्वाकांक्षा जोपासल्या, त्या आता कशा पूर्ण होतील? कदाचित ‘जिंदगी’ वाचवली असती, तर आपल्या स्वप्नातील जी यशस्वी व्यक्ती होण्याची स्वप्न आपण पाहत होतो, ती पूर्ण करायची संधी आपल्याला कदाचित मिळाली असती, तीसुद्धा आपण या आत्महत्येच्या नादात गमावली.
खरे तर आपण आपल्या आयुष्यात अनेक गोष्टींवर, अनेक घटनांवर, अनेक माणसांवर आणि विविध स्वप्नांवर ठासून भरलेल्या डायनामाईटसारखे प्रेम करतो. यदाकदाचित त्या डायनामाईटलाच सुरुंग लागला, तर आपलाच त्यात विनाश होतो. असं का? असं होतं कारण, आपण आपल्या स्वतःभोवती कवचकुंडलं करायला विसरतो. ही कवचकुंडलं खूपच महत्त्वाची आहेत. ती आहेत आपण आपल्यावरच केलेल्या अनुकंपेची आणि प्रेमाची. इतर कोणी ही कवचकुंडलं आपल्याला देईल, याची भोळीभाबडी कल्पना करून माणूस आयुष्याच्या लढाईत ऐनवेळी मार खातो तो असा! आयुष्यात अशी वेळ कधीतरी येते की, वाटतं आता सगळं संपलं आणि आपण निराधार झालो आहोत. यावेळी खरी गरज आहे, ते थोडं थांबायची. तेव्हा दीर्घ श्वास घेऊन भावी आयुष्याकडे पाहिलं की लक्षात येतं की, किनार्‍याच्या दुसर्‍या टोकाला बरंच काही आहे. तिथे अर्थपूर्ण अनुभव, प्रेमाचा झरा आणि नात्याची कवाडं आपली वाट पाहत आहेत. आता जी डोळ्यांवर संहारक झापड आली आहेत, ती दूर झाली की एक विधायक आणि सुपीक जीवन आपलीच वाट पाहत आहे. आपल्याला फक्त पोहत दुसर्‍या काठावर पोहोचायचं आहे. म्हणूनच याक्षणी ‘श्रद्धा आणि सबुरी’ हा उपदेश मोलाचा ठरतो. सगळ्यांच्याच आयुष्यात अनेक जबर जखमा होत राहतात. दारिद्य्र येतं, कर्जबाजारीपण येतं, अपयश येतं, नाती लुटतात. पण, इथे थांबला तो संपलाच समजा. अनेक परिणत माणसं आपला मार्ग बदलत नाहीत. कर्म करतच राहतात. अनेकजण या जखमांच्या अनुभवातून शहाणपण शिकतात. जीवन सक्षम बनवतात. कठीण समस्यांवर मात करता येते. पण, जीवनाची गाडी ड्राईव्ह तर करता आली पाहिजे. गाडी बुला रही है, सीटी बजा रही है। चलना ही जिंदगी है।

- डॉ. शुभांगी पारकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.