एक खेळ ‘नोटीशी’चा...

15 Jun 2020 20:08:44


NADA_1  H x W:


कोरोना जागतिक महामारीचे संकट सुरु असतानाच काही भारतीय क्रिकेटपटूंना सध्या एका वेगळ्याच समस्येला तोंड द्यावे लागत आहे. भारतीय क्रिकेटमधील काही स्टार क्रिकेटपटूंना राष्ट्रीय उत्तेजन प्रतिबंधित संस्थेने (नाडा) नोटीस पाठवली आहे. यात काही पुरुष आणि महिला खेळाडूंचा समावेश आहे. आपल्या निवासस्थानाबाबतची माहिती देण्यास विलंब झाल्याने ‘नाडा’ने स्टार क्रिकेटपटूंसह भारतीय क्रिकेट नियामक मंडळासही (बीसीसीआय) नोटीस बजावत जाब विचारला. ‘नाडा’च्या या वागण्याबाबत अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. संपूर्ण जग सध्या कोरोना महामारीविरोधात लढा देत आहे. अशा गंभीर परिस्थितीत देशात सर्वत्र ‘लॉकडाऊन’ जाहीर करण्यात आला असून संपूर्ण क्रीडाविश्व यामुळे थंडावले आहे. क्रिकेटसह अनेक खेळांच्या स्पर्धा पुढे ढकलण्यात आल्या आहेत. कोट्यवधींची उलाढाल होणारी ‘आयपीएल’ स्पर्धाही स्थगित करण्यात आली आहे. अशा परिस्थितीत अनेक खेळाडू मैदानापासून दूर आहेत. मात्र, असे असतानाही ‘नाडा’ने कसोटीपटू चेतेश्वर पूजारा, अष्टपैलू खेळाडू रवींद्र जडेजा, भारताचा सलामीवीर फलंदाज आणि यष्टीरक्षक लोकेश राहुल, भारतीय महिला संघाची स्टार क्रिकेटपटू स्मृती मानधना आणि दीप्ती शर्मा यांच्यासह आणखी काही जणांना नोटीस बजावल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. परंतु, यामागचे कारणही तसेच आहे. ‘नाडा’चे महानिर्देशक नवीन अग्रवाल यांनी याबाबत खुलासा केला की, ”या पाच खेळाडूंच्या ठिकाणांची माहिती अपूर्ण राहिल्यामुळे आम्ही ही नोटीस पाठवली आहे.उत्तेजन चाचणींच्या नियमांनुसार प्रत्येक खेळाडूला आपली वैयक्तिक माहिती ‘नाडा’ला देणे बंधनकारक आहे. ‘नाडा’कडे असणार्‍या माहिती फॉर्ममध्येही खेळाडूंनी आपली माहिती भरणे आवश्यक असते. मात्र, काही खेळाडूंना हे फॉर्म भरणे अनेकदा कठीण जाते, तर काही स्टार खेळाडूंकडे वेळ नसल्याने त्यांच्या संघटनेकडे ही फॉर्म भरण्याची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मात्र, ही माहिती न मिळाल्याने ‘नाडा’ने या खेळाडूंना नोटीस पाठविली. परंतु, ‘नाडा’ संबंधीची नोटीस असल्याचे कळताच उत्तेजनाबाबतचे हे काही तरी प्रकरण असल्याचा समज झाल्याने सर्वत्र गाजावाजा झाला. मात्र, मुळातच ही नोटीस खेळाडूंच्या वैयक्तिक माहितीसंबंधीची असून यात उत्तेजनाबाबतचा कोणताही उल्लेख करण्यात आलेला नाही. त्यामुळे नोटिशीच्या या खेळात ना कुणी हरले ना कुणी जिंकले.



खोटेपणाला येथे वाव नाही!

 


कोरोना महामारीच्या संकटातही ‘नाडा’ने अनेक स्टार खेळाडूंना नोटीस पाठविताच अनेकांच्या भुवया उंचावल्या. मैदानावर खेळ सुरु नसतानाही ‘नाडा’ने बजावलेल्या या नोटिसींबाबत अनेकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात आले. अनेकांनी यावरून टीकेचा सूरही ओढण्यास सुरुवात केली. मात्र, नाण्याची दुसरी बाजू लक्षात घेणेही तितकेच महत्त्वाचे आहे. ‘लॉकडाऊन’सारख्या गंभीर परिस्थितीतही ‘नाडा’ आपले काम चोखपणे बजावत आहे. मैदानावर खेळ होवो अथवा न होवो. भारताचे क्रीडा मंत्रालय आणि यासंबंधी यंत्रणा मात्र याबाबत सतर्क असल्याचे यावरून दिसून आले. खरेतर या गोष्टीचे कौतुक व्हायला हवे. कारण, मैदानाबाहेर असतानाही खेळाडूंची काळजी घेणे, हे प्रत्येक देशासाठी तितकेच महत्त्वाचे आहे ; अन्यथा एखादी छोटी चूकही महागात पडू शकते. उदाहरण घ्यायचेच झाले तर श्रीलंकेत नुकत्याच घडलेल्या एका प्रकाराचे घेता येईल. श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज शेहान मदुशंका याला स्थानिक पोलिसांनी गेल्याच आठवड्यात ‘ड्रग्ज’बाळगल्या प्रकरणात अटक केली. ‘ड्रग्ज’चे सेवन केल्याचे चौकशीत सिद्ध झाल्यास मदुशंका याच्यावर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी) आजीवन बंदी घालण्याची शक्यता आहे. ‘लॉकडाऊन’ काळात आपल्यावर कुणाचीही नजर नाही, असा गैरसमज करून घेत मदुशंका वावरला आणि अडचणीत सापडला. खेळाडू अनेकदा अशा चुका करतात. मात्र, योग्य ती समज देऊन खेळाडूंना या प्रकारांपासून दूर ठेवणे, हे त्या देशातील क्रीडा मंत्रालय आणि संबंधित खेळाच्या बोर्डांची जबाबदारी असते. श्रीलंकेने याबाबत मात्र सतर्कता न दाखवल्यानेच खेळाडू गैरप्रकारांच्या चक्रव्यूहामध्ये अडकले आहेत. ड्रग्ज बाळगल्याप्रकरणी मदुशंका याच्यावर कारवाईची टांगती तलवार लटकत असतानाच, ‘मॅच फिक्सिंग’च्या आरोपांवरून क्रिकेटमधील आणखी तीन खेळाडूंमागे ‘आयसीसी’च्या चौकशीचा ससेमिरा मागे लागला आहे. या प्रकरणांमुळे श्रीलंकेच्या बोर्डाची पळता भुई थोडी झाली आहे. खेळाडूंबाबत आधीच काळजी घेतली असती, तर बरे झाले असते असा पश्चाताप करण्याची वेळ श्रीलंका बोर्डावर आली आहे. श्रीलंकेच्या तुलनेत भारताने मात्र आधीच काळजी घेत आपली सर्व यंत्रणा कामाला लावली आहे. क्रिकेटच्या विश्वात आतापर्यंत अनेक देशांतील खेळाडूंवर उत्तेजनाप्रकरणी बंदी घालण्यात आली आहे. मात्र, भारत यापासून अलिप्त राहिला आहे. ‘नाडा’सारख्या संस्थांच्या सतर्कपणाचेच हे फळ म्हटले तर ते चुकीचे ठरू नये.

- रामचंद्र नाईक

 
Powered By Sangraha 9.0