आंबोलीत वाघाने केली म्हशीची शिकार ? लाॅकडाऊनमध्ये आढळली होती वाघाची पदचिन्हे

15 Jun 2020 22:53:07

tiger_1  H x W:

 

 

एका म्हशीची शिकार, दोन म्हशी जखमी


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंबोली परिसरात रविवारी वाघाने एका म्हशीची शिकार करुन दोन म्हशींना जखमी केल्याचे समोर आले आहे. मात्र, वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सोमवारी केलेल्या पंचनाम्यामध्ये घटनास्थळी वाघाच्या अस्तित्वाच्या कोणत्याही खुणा आढलेल्या नाहीत. असे असले तरी, स्थानिकांना लाॅकडाऊनदरम्यान या परिसरात वाघाच्या वावराच्या खुणा आढळल्या होत्या. त्यामुळे म्हशीची शिकार वाघानेच केल्याची दाट शक्यता आहे.

 
 
सडलेल्या अवस्थेत सापडलेली म्हैस 

tiger_1  H x W: 
 

पश्चिम घाटामधील वाघाचे अस्तित्व अधूनमधून समोर येत असते. सावंतवाडी तालुक्यातील आंबोली परिसरात वाघाचा वावर असल्याचे कित्येकदा समोर आले आहे. गेल्यावर्षी नोव्हेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात या परिसराता वाघाचा पावलाचे ठसे आढळले होते. त्यानंतर यंदा फेब्रुवारी महिन्यात आंबोलीला लागूनच असलेल्या कोल्हापूर जिल्ह्यातील आजऱ्यामध्ये वाघाचे दर्शन घडले होते. यावेळी स्थानिकांनी नर वाघाचे छायाचित्र कॅमेऱ्यात कैदही केले होते. अशातच २९ मार्च ते २२ एप्रिल दरम्यान आंबोलीपासून ५ ते १० किलोमीटरच्या परिसरात वाघाची पदचिन्हे आढळून आली होती. शिवाय त्याची विष्टा आणि झाडांवर नखांचे ओरखडेही दिसून आल्याची माहिती आणि छायाचित्रे 'महा MTB'ला काही स्थानिकांनी नाव न छापण्याच्या अटीवर दिली. या घटना ताज्या असतानाच हिरण्यकेशी नदी पात्राच्या परिसरात रविवारी स्थानिक शेतकरी चंद्रकांत मेस्त्री यांच्या म्हशींवर वाघाने हल्ला केल्याची घटना समोर आली. या हल्ल्यात एका म्हशीची शिकार झाली, तर दुसऱ्या दोन म्हशी जखमी झाल्या.

 

tiger_1  H x W: 
 
 

मेस्त्री यांनी या म्हशींना चरण्यासाठी सोडले होते. त्या पुन्हा घराकडे न परतल्याने त्यांचा शोध घेतला असता, ही घटना समोर आली. या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सोमवारी वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. या घटनेचा पंचनामा तयार करण्यात आला. यावेळी म्हशीची शिकार झालेल्या ठिकाणी पावसामुळे शिकारी प्राण्याच्या कोणत्याही प्रकारच्या खुणा शिल्लक न राहिल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी दिगंबर जाधव यांनी दिली. तसेच म्हशीचे शरीर पूर्णपणे खाऊन सडलेल्या अवस्थेत सापडल्याने ते तीन-चार दिवस जुने असल्याची शक्यत्या त्यांनी वर्तवली. या म्हशींवर वाघाने हल्ला केल्याची दाट शक्यता आहे. आजऱ्यात दिसलेला नर वाघच या संपूर्ण परिसरात वावरत असल्याचे बोलले जात आहे. अशा परिस्थितीत पश्चिम घाटाच्या संवेदनशील क्षेत्रामधून आजरा आणि आंबोलीच्या आसपासच्या गावांना वगळण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने केंद्राला पाठवला आहे.  

 
 
 
Powered By Sangraha 9.0