मुंबईच्या रस्त्यांवरून गाभण गायी चोरी होण्याचे प्रकार

14 Jun 2020 14:13:55
COW _1  H x W:





मुंबई : मुंबई शहर जिथे कोरोनाच्या संकटाशी लढत आहे, तिथे आता गाभण गाई चोरीला जाण्याचे प्रकार उघडकीस आले आहेत. माटुंग्यातील श्री लक्ष्मी नपू हॉल माटुंगा आणि शंकर मठ माटूंगा या भागातून दि. ५ आणि ६ जून दरम्यान दोन गाभण गाईंची एका कारमधून चोरी करण्यात आली आहे. हा सर्व प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद झाल्याने प्रकरण उघडकीस आले आहे. माटुंगा पोलीस ठाण्याच्या दीडशे मीटर परीसरात रात्री उशीरा हा प्रकार घडला. 



शीव झोपडपट्टी येथे राहणाऱ्या विनोद पांडे यांच्या मालकीच्या या गाई दिवसा मंदिराबाहेर उभ्या केलेल्या असत. मंदीरात येणारे भाविक गाईंना चारा देत त्या मोबदल्यात पांडे कुटूंबियांना चाऱ्याचे पैसे देत. असा उदरनिर्वाह चालवणाऱ्या पांडे कुटूंबियांच्या गायी अचानक चोरीला गेल्याने सर्वात आधी धक्का त्यांना बसला. दोन्ही गायींची प्रत्येकी किंमत ८० हजार रुपये असल्याचे पांडे यांनी सांगितले. 




दोन दिवस शोधूनही गायी सापडल्या नसल्याने पांडे कुटूंबियांनी पोलीसांत धाव घेतली. पालिका कायद्यानुसार, गायी मुंबई परिसरात बाळगल्याबद्दल आपल्यावरही कारवाई होऊ शकते या भीतीने पांडे कुटूंबियांनी पोलीस ठाण्यात जास्त पाठपुरावा केला नाही. मात्र, अशा प्रकारे मुंबईतील रस्त्यांवरून गायी चोरीला जाण्याचा प्रकार हा धक्कादायक असल्याने अॅड. धृतीमान जोशी, भाजपचे माजी स्थानिक नगरसेवक गोवर्धन चौहान आणि स्वयंसेवक कमलेश पटेल यांनी या प्रकरणी पाठपुरावा करण्याचे ठरवले आहे. मुंबईच्या रस्त्यांवरील गायी चोरणाऱ्यांवर कारवाई व्हायला हवी, त्यासाठी आम्ही पाठपुरावा करू, अशी माहिती अॅड. जोशी यांनी दैनिक 'मुंबई तरुण भारत'शी बोलताना दिली. 






काही दिवसांपूर्वी हिमाचल प्रदेशमध्ये गाभण गायीला बॉब्म खायला दिल्याने ती गंभीर जखमी झाल्याचा व्हीडिओ व्हायरल झाला होता. मुंबईतून चोरी होणाऱ्या गायी बेहरामपाडा सारख्या भागांत कत्तलीसाठी नेल्या जात असल्याची शक्यताही सुत्रांकडून व्यक्त केली जात आहे. या प्रकरणी योग्य ती कारवाई करावी, अशी मागणी गोरक्षकांतर्फे केली जात आहे.



Powered By Sangraha 9.0