‘फुले’ उधळण्याच्या योग्यतेचा ‘नायक’

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    13-Jun-2020
Total Views |


nilu phule_1  H



पांढरा पायजमा आणि वर झब्बा, खांद्यावर कापडी झोळी असा साधा पोशाख असणारे, सामाजिक चळवळीत सक्रिय सहभाग नोंदवणारे व जबराट शब्दफेक, भेदक नजर, उत्तम देहबोली हे सर्व त्या पाताळयंत्री, मग्रूर खलनायकाच्या भूमिकेत जीव ओतून काम करणारे अभ्यासू व्यक्तिमत्त्व म्हणजेच अभिनयसम्राट निळूभाऊ फुले.


सातारा-पुणे रस्त्यावर खंबाटकी घाटाच्या अलीकडे गेली दहा वर्षे एका कलाकाराचा फोटो रस्त्याच्या कडेला आहे आणि खाली लिहिलं आहे मोठा माणूस!’ ‘मोठा अभिनेता’ यापेक्षाही ‘मोठा माणूस’ ही या कलाकाराची ओळख देखणी आणि तितकीच खरी आहे. डोक्यावर तिरपी पांढरी गांधी टोपी, भेदक नजर, धोतराचा सोगा हातात धरलेला आणि तोंडाचा चंबू करून बेरकीपणानं हुंकारत हा कलावंत बोलत असे. ती त्यांची ‘स्टाईल’च होती. अनेक मिमिक्रीवालेसुद्धा त्यांची एवढीच नक्कल करतात. चित्रपटातून दिसणारा हा कलाकार मी लहानपणापासून पाहतच होतो. त्यांच्याविना कुठलाही मराठी चित्रपट पूर्णच होऊ शकत नव्हता. नायक, खलनायक, चरित्र अभिनेता या प्रकारच्या भूमिका त्यांनी केल्या असल्या तरीदेखील ‘खलनायक’ म्हणून ते ठळकपणे आपल्या लक्षात राहतात. त्यांनी साकारलेला ‘खलनायक’ एवढा जिवंत वाटायचा की स्त्री वर्ग तर अक्षरशः त्यांच्या नावाने बोटं मोडायचा. एका मराठी तंत्रज्ञाने या कलाकाराला घरी जेवायला बोलावलं होतं. त्यावेळी त्या तंत्रज्ञाच्या आईनं, “असल्या नालायक माणसाला मी जेवायला वाढणार नाही,” असं म्हणून त्यांना चक्क जेवणही नाकारलं. ही त्यांच्या भूमिकेची ताकद होती. सोशल मीडियाच्या जमान्यातही प्रेक्षक त्यांचे संवाद विसरलेले नाहीत. चित्रपटात धोतर, पायात कोल्हापुरी चपला व डोक्यावर गांधी टोपी अशा वेशात त्यांची ‘एंट्री’ झाली की प्रेक्षक शिट्ट्या आणि टाळ्या वाजवत, तर बायका ‘मुडदा बशविला याचा’ म्हणून त्यांच्या नावाने कडकडा बोटे मोडत. मराठी चित्रपटसृष्टीत अनेक प्रवाह आले. नटांच्या पिढ्या बदलल्या. पण, या सगळ्या प्रवाहांमध्ये आपल्या निराळ्या व जबर संवादफेकीसाठी ओळखले जाणारे मराठी चित्रपटातील अमिताभ बच्चन म्हणजे अनभिषिक्त अभिनयसम्राट निळू फुले.

ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांचे मूळ नाव ‘निळकंठ कृष्णाजी फुले.’ पण, ते ‘निळूभाऊ’ या नावाने सुपरिचित. त्यांचा जन्म पुण्याला झाला. त्यांचे वडील पुण्यालाच लोखंड आणि भाजी विकून मिळणार्‍या पैशावर चरितार्थ चालवत असत. निळू फुलेंचे शिक्षण मॅट्रिकपर्यंत झाले. उद्यानविषयक पदविकाही त्यांनी मिळविली. मात्र, त्यांना अभिनयाची किशोरवयापासूनच विलक्षण आवड होती. आपल्या ऐन तारुण्यात त्यांनी पुणे येथील आर्म्ड फोर्सेस मेडिकल कॉलेजच्या उद्यानात माळी म्हणून काम केले. याच सुमारास त्यांचा राष्ट्र सेवा दलाशी संबंध आला. आपल्या दरमहा ८० रुपये पगारातील दहा रुपये ते दरमहा राष्ट्र सेवा दलाच्या कार्यासाठी देत. राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकात त्यांनी काम केले. यावेळी वसंत बापट, पु. ल. देशपांडे या दिग्गजांशी त्यांचा संपर्क आला. खरे तर त्यांना ‘माळी’ म्हणूनच पुढे कार्य करावयाचे होते. त्यासाठी ते स्वत:ची रोपवाटिका (नर्सरी) सुरू करण्याच्या विचारात होते. परंतु, घरची परिस्थिती बेताची असल्याने त्यांना पुरेशा भांडवलाअभावी हा विचार सोडून द्यावा लागला. राष्ट्र सेवा दलात कार्य करीत असताना त्यांना वाचनाची गोडी लागली. रवींद्रनाथ टागोरांच्या साहित्याने ते प्रभावित झाले. याच काळात त्यांनी ‘उद्यान’ हे नाटकही लिहिले होते. 1957च्या लोकसभा निवडणुकीत त्यांनी राष्ट्र सेवा दलाच्या कलापथकासाठी ‘येरा गबाळ्याचे काम नोहे’ हा वग लिहिला. या वगाच्या सादरीकरणाने त्यांना प्रसिद्धी तर मिळालीच; शिवाय त्यांच्या अभिनयकौशल्याची चुणूक इतरांना जाणवली. त्यानंतर पु. ल. देशपांडे यांच्या ‘पुढारी पाहिजे’ या नाटकात ‘रोंगे’ची भूमिका साकारून त्यांनी सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले.
‘कथा अकलेच्या कांद्याची’ या वगनाट्यातील भूमिकेमुळे ते खर्‍या अर्थाने कलाकार म्हणून पुढे आले. या लोकनाट्याचे मराठी रंगभूमीवर दोन हजारांहून अधिक प्रयोग झाले. या नाटकामुळे त्यांना ‘एक गाव बारा भानगडी’ या मराठी चित्रपटात भूमिका मिळाली व त्यांचे चित्रपटसृष्टीत पदार्पण झाले. या चित्रपटात त्यांनी साकारलेली ‘झेले अण्णा’ ही विनोदी खलनायकाची भूमिका अत्यंत गाजली. त्यांच्या नाट्य-कारकिर्दीत विजय तेंडुलकर लिखित सखाराम बाईंडरया नाटकातली त्यांची खलनायकी ढंगाची भूमिका विलक्षण प्रभावी ठरली. या नाटकाचे, त्यातील आशयाचे आणि निळू फुले यांच्या भूमिकेचे समीक्षकांनी स्वागत केले. ‘पुढारी पाहिजे’, ‘बिन बियाचे झाड’, ‘कुणाचा कुणाला मेळ नाही’, ‘कथा अकलेच्या कांद्याची’, ‘लवंगी मिरची कोल्हापूरची’, ‘मी लाडाची मैना तुमची’, ‘राजकारण गेलं चुलीत’ यांसारख्या लोकनाट्यांमधून त्यांनी भूमिका केल्या. ही सर्वच लोकनाट्यं त्या काळात गाजली. सलग ४० वर्षे ते चित्रपटसृष्टीत व रंगभूमीवर सक्रिय होते. आपल्या कारकीर्दीत त्यांनी १४० हून अधिक मराठी चित्रपटांमधून व १२ हिंदी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत. त्यांच्या भूमिकांपैकी ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘शापित’, ‘पिंजरा’, ‘पुढचं पाऊल’ यांतील भूमिका विशेष लक्षणीय मानल्या जातात. ‘सामना’ चित्रपटातील ‘हिंदुराव धोंडे पाटीलही व्यक्तिरेखा साकारून निळूभाऊंनी खलनायकाची स्वतंत्र शैली निर्माण केली. त्यांची जरबयुक्त शब्दफेक, भेदक नजर, देहबोली हे सर्व त्या पाताळयंत्री, मग्रूर भूमिकेसाठी पूरक ठरले. या व्यतिरिक्त ‘सोंगाड्या’, ‘पिंजरा’, ‘हर्‍या नार्‍या जिंदाबाद’, ‘वरात’, ‘भिंगरी’ , ‘जैत रे जैत’, ‘नाव मोठं लक्षण खोटं’, ‘पटली रे पटली’ , ‘एक होता विदूषक’ आदी मराठी चित्रपटांतील तसेच ‘सारांश’, ‘मशाल’, ‘प्रेम प्रतिज्ञा’, ‘कुली’, ‘दिशा’, ‘नरम गरम’ आदी हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी केलेल्या भूमिका लोकप्रिय ठरल्या. त्यांनी भूमिका केलेल्या काही प्रमुख नाटकांमध्ये ‘सूर्यास्त’, ‘सखाराम बाईंडर’, ‘जंगली कबुतर’, ‘बेबी’, ‘रण दोघांचे’ ही नाटकेही लोकप्रिय ठरली. मराठीसोबतच निळू फुलेंनी हिंदी चित्रपटसृष्टीतही काही भूमिका साकारल्या, ‘कुली’ चित्रपटात त्यांनी साकारलेल्या अमिताभ बच्चनच्या मामाची भूमिका ही त्यापैकीच एक. हिंदी भाषेशी जुळवून घेता न आल्याने आपण तेथे फार रमलो नाही,” असे ते म्हणत. इतरही काही हिंदी चित्रपटांतून त्यांनी भूमिका साकारल्या, तरी त्यांची ओळख मराठी चित्रपटाचे कलाकार अशी राहिली.


निळू फुलेंना वाचनाची प्रचंड आवड. एकदा पुस्तक हातात घेतले की ते त्याच दिवशी संपवायचे, असा त्यांचा हट्ट असायचा. वाचनाच्या आवडीमुळेच त्यांच्यातील कलावंतामध्ये अभिनयाची ही प्रगल्भता आणि सहजता आली असावी. अभिनयाची जी उंची निळू फुले यांना गाठता आली, तिथवर कुणीही पोहोचू शकलेले नाही. निळूभाऊ जिथं जिथं चित्रीकरणासाठी जात, तिथं माणसांचे मोहोळ गोळा होई. शुटिंगच्या काळात निळूभाऊंना ‘पाहायला’ येणार्‍यांमध्ये अनेकजण असायचे. कोल्हापूरच्या स्टुडिओबाहेर एक पापडविक्रेता हा त्यापैकीच एक. तो चित्रीकरणादरम्यान तासन्तास येऊन निळूभाऊंना पाहत बसायचा. तो तसा बसला तर त्याचा धंदा कसा होणार, याचा विचार निळूभाऊ करायचे. त्याला अधिक झळ बसू नये म्हणून ते स्वत: त्याच्याकडून पापड विकत घेत असत. सतत येऊन येऊन त्याची निळूभाऊंशी ओळख झालेली. पापड विकत घेता घेता मग कधी ते त्याच्याबरोबर जेवणाचा आस्वादही घेत. आपले शुटिंग पाहायला आलेल्या सामान्य माणसाच्या ताटास ताट लावून बसणार्‍या निळूभाऊंना खर्‍या अर्थाने ‘माणूसवेडा’ म्हणता येईल. कोल्हापूरच्या जयप्रभा स्टुडिओत शुटिंगच्या काळात अनेक रसिक अन् तितकेच बघे त्यांना ‘बघायला’ जायचे! अशाच एका दिवशी कॉलेजची दोन तरुण पोरं स्टुडिओत घुसली. विनाकारण सेटवर घुसून वेळेचा अपव्यय करणारी ही आगंतुक पोरं म्हणजे एक व्याप होता. ते दोन तरुण सेटवर घुसल्याचं कुणाच्या तरी लक्षात आल्यानंतर त्यांनी त्या दोघांना हाकलण्यासाठी आवाज दिला. मात्र, ते तरुण जायलाच तयार होत नव्हते. आम्ही निळू फुलेंना भेटायला आलो आहोत,” असे त्यांनी सांगितले. तेवढ्यात निळूभाऊ शॉट आटोपून आले. त्यांनी त्यांची आस्थेने चौकशी केली. काय शिकताय?’, ‘कितवीत आहात?’, ‘कोणती पुस्तकं वाचताय?’ असे वेगळेच सवाल केले. शुटिंग पाहून झाल्यावर त्यांना माघारी पाठवलं. त्यातला एक तरुण नंतर त्यांचा मित्र झाला. तोच पुढे जाऊन आपला ‘पानिपत’कार विश्वास पाटील झाला. अशी जादू होती निळूभाऊंच्या अभिनयाची...

चित्रपटातल्या भूमिकांनी निळू फुले देशभर पोहोचले असले तरी ‘नाटक’ हीच त्यांची मूळ आवड. ‘‘नाटक करताना मजा येते,” असं ते म्हणायचे. “नाटक करताना सावधगिरी बाळगावी लागते. तुमच्या प्रत्येक संवादावर लगेचच प्रतिक्रिया उमटण्याची शक्यता असते. तिथेच खर्‍या अभिनेत्याची कसोटी लागते,” असं ते म्हणत. मराठी चित्रपटातील गावचा पाटील असो नाही तर सरपंच, आजही ज्येष्ठ अभिनेते निळू फुले यांच्याशिवाय ती भूमिका कोणी साकारू शकेल, असं वाटत नाही. ‘नामदेव शिंपी’ नंतर त्यांनी प्रकृती अस्वास्थ्यामुळे चित्रपटात काम करायचे नाही, असे ठरवले होते. पण, निर्माते आणि दिग्दर्शकांच्या आग्रहास्तव काही आश्वासने ते पूर्ण करीत राहिले. २००९चा गोष्ट छोटी डोंगराएवढीत्यांचा हा शेवटचा चित्रपट. संपूर्ण चित्रपटात त्यांच्या वाटेला फार कमी संवाद आले. थकलेले निळूभाऊ पाहताना हृदयात कालवाकालव होते. फार कमी बोलूनही दारिद्य्रात पिचलेला शेतकरी लक्षात राहतोच. महाराष्ट्र शासनातर्फे उत्कृष्ट अभिनयासाठी त्यांना सलग तीन वर्षे पुरस्कार मिळाले. १९९१ मध्ये भारत सरकारचा संगीत नाटक अकादमीचा पुरस्कारही त्यांना मिळाला होता. ‘सूर्यास्त’ या नाटकातील भूमिकेसाठी त्यांना ‘नाट्यदर्पण पुरस्कार’ देऊन गौरविण्यात आले होते. नाटक आणि सिनेमा या दोन्ही क्षेत्रांतही निळूभाऊंनी स्वत:च्या अभिनयाचा वेगळा ठसा उमटवला. ‘नायक’ आणि ‘खलनायक’ अशा दोन्ही भूमिका करणार्‍या निळूभाऊंचे ग्रामीण आणि शहरी जीवनाचे निरीक्षण अतिशय अचूक व सूक्ष्म होते. या निरीक्षणाचा त्यांनी अभिनयात खूबीने उपयोग केला. त्यांच्या कारकिर्दीची अभिनयाइतकीच महत्त्वाची दुसरी बाजू राहिली, ती सामाजिक चळवळीमधील सक्रिय सहभागाची. अंधश्रद्धा निर्मूलन, हमाल पंचायत, सत्यशोधक चळवळ, दलित-आदिवासी-ग्रामीण साहित्य आदींशी त्यांचा अतिशय जवळचा संबंध व सहभाग होता. आयुष्याच्या अखेरपर्यंत त्यांनी पुरोगामी चळवळींशी आपली नाळ अखंडित ठेवली होती.
निळू फुले यांचे दि. १३ जुलै २००९ रोजी पहाटे २ वाजताच्या सुमारास अन्ननलिकेच्या कर्करोगाने निधन झाले. ते ७९ वर्षांचे होते. व्यक्तिगत आयुष्यात निळूभाऊ अत्यंत साधे होते. पांढरा पायजमा आणि वर झब्बा, खांद्यावर कापडी झोळी हाच त्यांचा कायमचा वेश. त्यात कधीच बदल झाल्याचे स्मरत नाही. खलनायकाच्या भूमिकेत असताना शिवराळ भाषा वापरणारे, तसेच वावरणारे निळू फुले यांच्याशी गप्पा मारताना हा माणूस अतिशय अभ्यासू आहे, हे जाणवायचे. निळूभाऊ स्वभावाने विनम्र होते नि कमालीचे सज्जनही होते. पडद्यावरची खलनायकी छटा त्यांच्या आयुष्यात अजिबात नव्हती. शिक्षण फार झाले नसलं तरी वाचन मात्र दांडगे होते. म्हणूनच त्यांच्या जाण्याने ‘फुले’ उधळण्याच्या योग्यतेचा ‘नायक’ गेला, असेच म्हणता येईल.

- आशिष निनगुरकर

@@AUTHORINFO_V1@@