कोकणासाठी शक्य तितकी मदत करणार : देवेंद्र फडणवीस

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    12-Jun-2020
Total Views |
devendra fadanvis_1 





मुंबई : कोकणातील निसर्ग चक्रीवादळग्रस्तांना भाजपच्या वतीने जितकी मदत करता येणे शक्य आहे. तितकी आम्ही करणार आहोत, पण यासाठी शासनाने पुढाकार घेणे आवश्यक आहे. सरकारने मदत जाहीर केली पण ती कागदावरच आहे. एकही उपाययोजना जमिनीवर सुरू झालेली नाही, असे विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. आपल्या दोन दिवसांच्या दौर्‍यानंतर दापोली येथे पत्रकारांशी त्यांनी संवाद साधला. यावेळी संपूर्ण दौऱ्यात त्यांच्याबरोबर असणारे विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर, माजी मंत्री रवींद्र चव्हाण, निलेश राणे, प्रसाद लाड, निरंजन डावखरे इत्यादी उपस्थित होते. 

दोन दिवसांच्या कोकण दौर्‍यानंतर येथील परिस्थितीबाबत आणि त्यासाठी कराव्या लागणार्‍या आवश्यक उपाययोजनांबाबत एक सर्वंकष निवेदन राज्य सरकारला देणार असल्याची देवेंद्र फडणवीस यांनी दिली. ते म्हणाले की, आज सरकारचे अस्तित्व जमिनीवर दिसत नाही. केलेल्या घोषणा प्रत्यक्षात उतरताना दिसत नाही. कुठलीही आपत्ती आपण थांबवू शकत नसलो, तरी त्याला प्रतिसाद कसा दिला, हे महत्त्वाचे असते. राज्य सरकारने पॅकेज जाहीर केले. पण ते कागदावरच आहे, त्याचा फायदा होणार नाही.

डिझेलचा परतावा तातडीने द्या


सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये मासेमारांसाठी काहीही नाही. कोळीबांधवांना डिझेलचा परतावा जरी तत्काळ दिला, तर त्यांच्या हाती पैसा येईल. अनेकांना बोटींच्या दुरुस्तीसाठी लाख-दीड लाख रुपये लागणार आहेत. जुने कर्ज असल्याने नवीन घ्यायचे कसे, हा प्रश्न त्यांच्यापुढे आहे. आधीच कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे उत्पन्न बंद आहे आणि त्यात हे चक्रीवादळाचे संकट आले. या दुहेरी संकटात त्यांचे जुने कर्ज माफ करून नवीन कर्ज मिळण्याची व्यवस्था करावी लागेल, असे ते म्हणाले.

पत्र्यांमध्येही काळाबाजार

वादळ येऊन दहा दिवस झाले, पण अद्यापही मदत पोहोचलेली दिसत नाही. अशा आपत्तीत मदत तात्काळ द्यायची असते. वीज नसल्याने बँकांचे व्यवहार थांबले आहेत. त्यामुळे रोखीने मदत देण्याचा निर्णय घ्यावा लागेल. निवार्‍यासाठी शिट्स (पत्रे) मिळत नाहीत. त्याचा काळाबाजार होत आहे. तीन पट भाव आकारले जात आहेत. हा काळाबाजार कसा थांबेल, यासाठी शासनाने तातडीने पावले उचलण्याची गरज आहे. भाजपच्या वतीने आम्ही काही कंपन्यांशी बोललो आहोत. भाजपच्या वतीने जितकी मदत करता येणे शक्य आहे, तितकी आम्ही करू. पण शासनाची शक्ती नेहमी मोठी असते. त्यांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे.


गुंठेवारी मदत हवी

बागायतदारांना हेक्टरी मदतीतून काहीही साध्य होणार नाही. एका गुंठ्याला केवळ ५०० रुपये मदत मिळेल. सफाईसाठी लागणारा पैसा सुद्धा त्यापेक्षा अधिक आहे. १०० टक्के अनुदानातून फळबाग योजना आता राबवावी लागणार आहे. चालू कर्ज माफ करून दीर्घमुदतीचे कर्ज द्यावे लागेल. केंद्र सरकारने स्वत: हमी घेऊन वित्तपुरवठ्याच्या योजना जशा तयार केल्या, तशा योजना राज्य सरकारला तयार कराव्या लागतील. शाळांची मोठी दुरवस्था झाली आहे. जे १० हजार रुपये जाहीर केले, ते कमी असले तरी ते तत्काळ दिले पाहिजे.

या मदतीला विलंब झाला तर काहीच उपयोग नाही. वीजव्यवस्था पूर्वपदावर आणणे हे अतिशय आवश्यक आहे. रेशनचे अन्नधान्य तात्काळ मिळेल, याची व्यवस्था केली पाहिजे. आज दुर्दैवाने मदतीत संवेदनशीलता दिसून येत नाही. राजकीय नेतृत्वाने थोडे अधिक लक्ष दिले पाहिजे. आजची मदत कागदावर आहे. एकही उपाययोजना जमिनीवर सुरू झालेली नाही. सुका चारा उपलब्ध नाही. त्याकडेही राज्य सरकारने तातडीने लक्ष देण्याची गरज आहे, असेही देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितले.





@@AUTHORINFO_V1@@