इंजिनिअरींगला किती विषय असतात उदय सामंतांनी सांगावे : सुनील राणे

    दिनांक  12-Jun-2020 19:28:11
|
uday _1  H x W:

मुंबई (तेजस परब) : राज्यातील विद्यापीठांच्या अंतिम सत्राच्या परीक्षांवरून राजकारण तापले असताना भाजप आमदार सुनील राणे यांनी शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड आणि उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांना लक्ष्य केले आहे. राज्यातील प्रार्थमिक विभागाच्या विद्यार्थ्यांवर विनाकारण ऑनलाईन अभ्यासक्रम लादून शाळांना शुल्क आकारणीसाठी मुभा दिली जात असल्याचा आरोप आमदार राणे यांनी केला आहे. तर अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा रद्द करून विद्यार्थ्यांचे भवितव्य अंधारात ढकलण्याचा प्रयत्न राज्य सरकार करत असल्याचा टोला त्यांनी उदय सामंत यांना लगावला आहे. इंजिनिअरींमध्ये किती विषय असतात, किती प्रश्नपत्रिका असतात याची माहितीही सामंताना नसल्याने ही वेळ आली असल्याची टीका राणे यांनी केली आहे. 


दैनिक 'मुंबई तरुण भारत'ला दिलेल्या विशेष मुलाखतीत आमदार सुनील राणे यांनी राज्य सरकारला विविध प्रश्नांवर झोडपले. "मुंबईतील रुग्णलयांतून रुग्ण गायब होतात, कानोकान याची खबर कुणाला लागत नाही. मालाड, कांदिवली, बोरिवली या भागांतील २० लाख लोकसंख्येमागे केवळ दोन कोरोना रुग्णालये उपलब्ध आहेत. त्यापैकी एक असलेले शताब्दी रुग्णालय कोरोना नसलेल्या रुग्णांनाही सेवा देत आहे. आरोग्य व्यवस्थेचे कंबरडे मोडले आहे. ज्या प्रमाणे झोपडपट्ट्यांमध्ये कोरोना फैलावत आहे, त्याची कारणीमिमांसा पालिकेने दीर्घकाळ प्रक्रीयेद्वारे करावी, नागरिकांना किमान प्रत्येक घरामागे एक शौचालय देता येईल का किंवा सर्वेक्षण करून पुरेशी स्वच्छ शौचालये उभारता येतील का हे देखील पाहाणे गरजेचे आहे. झोपडपट्टी पूर्नवसन योजना बारगळल्याचा परिणाम आपल्याला कोरोनाच्या काळात दिसून येत आहे. गरीब रुग्णांना उपाचारासाठी एकमेव आधार असलेल्या पालिका रुग्णालयांची आरोग्य व्यवस्था आपण नीट सांभाळू शकलो नाही हे पालिका आणि सरकारचे एकूणच अपयश आहे", अशी टीका त्यांनी केली. 


'राज्यांतील अंतिम सत्राच्या परीक्षा सरकार रद्द करू पाहत आहे, कारण परीक्षा झाली तर त्यांना पुन्हा फेरनिकाल जाहीर करावे लागतील. पुन्हा नापास झालेल्यांसाठी परीक्षा घ्यावी लागेल, पुन्हा पेपर तपासणी घ्यावी लागेल, वेळेत निकाल लावावे लागतील, हा सर्व खटोटोप नको असल्या कारणानेच अंतिम सत्रातील विद्यार्थ्यांच्या परीक्षा घेण्याचे मंत्री सामंत टाळत असल्याचा आरोप त्यांनी लगावला. राज्य सरकारने परीक्षा न घेऊन विद्यार्थ्यांचे भवितव्य धोक्यात घातले आहे. लगेचच परीक्षा न घेता किमान १८० दिवस आणि तासिका घेऊन मग परीक्षा घेण्यासाठी सरकार का कचरत आहे, विद्यार्थी आत्ता जरी परीक्षा देण्याच्या मानसिकतेत नसले तरीही कोरोना महामारी संपल्यानंतर परीक्षा जाहीर करून वेगाने निकाल लावावेत,' असे आवाहन त्यांनी केले आहे. विद्यार्थ्यांना सरककट उत्तीर्ण केल्यानंतर ज्या विद्यार्थ्यांना 'एटीकेटी' लागली आहे, ज्यांचे नापास झाल्याने वर्ष वाया गेले आहे, त्यांच्याबद्दल निर्णय काय ? सरसकट विद्यार्थ्यांना उत्तीर्ण केले तर भविष्यात त्यांच्या नोकऱ्यांचे काय, गुणांकनाचे काय? याची उत्तरे उदय सामंत यांनी द्यावीत, असे आवाहन त्यांनी केले आहे. 


पालक वेठीस ! 


प्रार्थमिक शाळांनी विद्यार्थ्यांना शुल्क आकारणीचा तगादा लावला आहे. त्यांच्याबद्दल शालेय शिक्षणमंत्री कधी निर्णय घेणार? शाळा सुरू करण्याचा घाट सरकारकडून घातला जात आहे. शिक्षक पालकांना ऑनलाईन व्हीडिओ कॉल्सद्वारे अभ्यासक्रम समजवत आहेत, येत्या काळात त्यांच्याकडून यासाठी शुल्कही आकारण्यात येणार आहे. ज्या प्रमाणे 'ना काम ना पगार' अशी भूमीका घेण्यात आली तशी 'ना शाळा ना शालेय शुल्क', अशी भूमीका का घेण्यात येत नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला.

"उच्च व तंत्र शिक्षण मंत्र्यांकडे ज्ञानेश्वर विद्यापीठाची पदविका !"


उदय सामंत यांच्याकडे ज्ञानेश्वर विद्यापीठाची पदविका असल्याचा उल्लेख त्यांनी या मुलाखतीत केला. सामंत यांचे शिक्षण क्षेत्रातील योगदान काय आहे, त्यांनी इंजिनिअरींगमध्ये किती विषय असतात हे सांगावे, असा टोला लगावला.(संपूर्ण मुलाखत पाहण्यासाठी महाMTB फेसबूक पेजला भेट द्या !)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.