कोकणाला केंद्राकडून मिळणार मदत !

11 Jun 2020 18:32:38
Chandrakant Patil and Nar





चंद्रकांतदादा पाटील यांनी मानले केंद्रीय कृषिमंत्र्यांचे आभार




मुंबई : कोकणातील शेतीचे 'निसर्ग' चक्रीवादळामुळे अतोनात नुकसान झाले असून त्यापैकी नारळशेतीच्या नुकसानीचा अभ्यास करून केंद्र सरकारला तातडीने अहवाल सादर करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी 'कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डा'च्या अध्यक्षांच्या नेतृत्वात एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. त्याबद्दल भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी केंद्रीय कृषीमंत्र्यांचे आभार मानले आहेत.



चक्रीवादळामुळे रायगड, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, पुणे, नाशिक या जिल्ह्यांमध्ये शेतीचे नुकसान झाले. कोकणात त्याची तीव्रता अधिक आहे. या संदर्भात भाजपने केंद्रीय कृषीमंत्र्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारा एका बैठकीचे आयोजन केले होते. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांच्यासह पक्षाचे विविध लोकप्रतिनिधी व शेतकरी या बैठकीत सहभागी झाले होते. 



या बैठकीच्या अनुषंगाने ताबडतोब केंद्र सरकारच्या कृषी व किसान कल्याण मंत्रालयातर्फे दि. ११ जून रोजी एक निर्णय घेण्यात आला व कोकणातील नारळ शेतीच्या नुकसानीचा अभ्यास करण्यासाठी उच्च स्तरीय समिती नियुक्त करण्यात आली.
या समितीमध्ये कोकोनट डेव्हलपमेंट बोर्डाचे चेअरमन, केरळमधील कासारगौड येथील संस्थेतील प्रमुख शास्त्रज्ञ, बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाच्या कुलगुरुंचे प्रतिनिधी, महाराष्ट्र सरकारच्या फलोत्पादन विभागाचे संचालक आणि मुख्य नारळविकास अधिकारी यांचा समावेश आहे. 



समितीने ३० जूनपर्यंत केंद्रीय कृषी मंत्रालयाला अहवाल सादर करायचा आहे. चक्रीवादळाचा फटका बसलेल्या शेतकऱ्यांना व गावकऱ्यांना मदत करण्यासाठी भारतीय जनता पार्टी सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. पक्षातर्फे मदतसाहित्य यापूर्वीच रवाना करण्यात आले आहे. विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी कोकणचा दोन दिवसांचा दौरा गुरुवारी सुरू केला आहे. यापूर्वी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर तसेच पक्षाच्या आमदारांनी व पदाधिकाऱ्यांनी कोकणातील विविध गावांना भेट देऊन चक्रीवादळामुळे झालेल्या नुकसानीची माहिती घेतली आहे. पक्षाचे स्थानिक कार्यकर्ते मदतकार्यात गुंतलेले आहेत.






Powered By Sangraha 9.0