पवारांच्या सर्कशीतले विदूषक

    दिनांक  11-Jun-2020 21:45:28
|
Sharad Pawar NCP _1 
पंतप्रधानपदाचे वारंवार स्वप्न पाहण्यापर्यंत मारलेल्या कोलांडउड्यांनी पवार प्रचंड अनुभवसंपन्न झाले आणि या अनुभवाचा उपयोग करण्याची ‘हीच ती वेळ’ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सत्तेसाठी हपापलेल्या शिवसेनेला साथ दिली तर त्याचा रिमोट कंट्रोल आपल्याच हाती असेल आणि या सर्कशीचा रिंगमास्तर आपणच असू, हे पवारांनी ओळखले.
“महाराष्ट्रात सरकारच्या नावाखाली सर्कस सुरु आहे. कोरोनाच्या संकटात महाराष्ट्रात जे काही सुरु आहे ते चांगले नाही. शरद पवारांसारख्या जाणकाराच्या हाती या सरकारची सूत्रे आहेत तरीही असे घडते, याचे आश्चर्य वाटते,” अशा शब्दांत भाजप नेते व संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी सोमवारच्या ‘महाराष्ट्र जनसंवाद’ या व्हर्च्युअल रॅलीतून महाआघाडी सरकारवर घणाघात केला. राजनाथ सिंह यांचे शब्द विरतात न विरतात, तोच दुसर्‍या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी कोकण दौर्‍यावर असताना, आमच्या सर्कशीत प्राणी असून विदूषकाची कमतरता असल्याचे उत्तर दिले.


पवारांना मुरब्बी आणि धुरंधर राजकारणी मानणार्‍यांनीही त्यांच्या या उत्तराला राजनाथ सिंहांना लगावलेला टोला म्हणून पेश केले. त्यांचेही बरोबरच म्हणा, शब्दांचा नेमका अर्थ लक्षात न घेता फक्त साहेब जे बोलतील, जे करतील, त्याला माना डोलवायच्या, हांजी हांजी करायचे, एवढेच त्यांना जमते. म्हणूनच ‘आमची सर्कस’ या शब्दांतून शरद पवार खुद्द स्वतःच राजनाथ सिंह यांनी केलेल्या पाणउतार्‍याला दुजोरा देत असल्याचा अर्थबोध अशा लोकांना झाला नाही. व्यक्तिपूजेतून अशा गोष्टी होतात आणि पवारांची व्यक्तिपूजा तर महाराष्ट्रात गेल्या कित्येक वर्षांपासून सुरु आहे. त्यामुळे पवार बोलून फसले हे सांगण्याची बुद्धीही कोणाला झाली नाही. 


बारामतीकरांच्या व्यक्तिपूजेपायी मती मारली गेल्याचे अलीकडच्या काळातील, हे उत्तम उदाहरण. तसेही शरद पवारांचे ते कामच आहे म्हणा, आपल्या पुढे-मागे फिरणार्‍यांनी तर्काने विचार करावा, असे पवारांना वाटत नाही. ‘मी जे बोलतो, तेच प्रमाण समजून मान्य करावे,’ असे त्यांचे वागणे असते. त्यांचाच गुण त्यांच्या कार्यकर्त्यांत आणि खुशमस्कर्‍यांतही उतरला व तेही तोच कित्ता गिरवू लागले.


मात्र, शरद पवारांना तरी आपण काय बोललो, याचा अर्थ समजला असेल का, याचीच शंका वाटते. किंवा पवार बोलले म्हणजे, त्याचा अर्थ जाणूनच बोलले असतील, असे म्हणावे लागेल. त्या अनुषंगाने पवारांच्या सावलीत साकारलेले हे सरकारच नव्हे, तर त्यांचे राजकारणही सर्कशीपेक्षा अजिबात कमी नसल्याचे दिसते. अगदी पहिल्यांदा राज्याचे मुख्यमंत्री होण्यापासून ते सोनिया गांधींच्या विदेशीपणाच्या मुद्द्यापर्यंत आणि नंतर सत्तेसाठी त्यांच्याशीच हातमिळवणी करण्यापर्यंत पवारांचे राजकारण कोलांटउड्यांनीच भरलेले राहिले. 


ते जुने झाले असेल तर आताच्या विधानसभा निकालानंतरही राष्ट्रवादी काँग्रेसकडून आम्हाला विरोधात बसायचा कौल मिळाल्याचे सांगितले जात होते. पण, आपल्याच शब्दांवर नेहमीप्रमाणे पलटी मारत पवारांनी विरोधात बसण्याऐवजी सत्तेत राहणे पत्करले. त्यालाही एक कारण होते. ते म्हणजे, पंतप्रधानपदाचे वारंवार स्वप्न पाहण्यापर्यंत मारलेल्या कोलांडउड्यांनी पवार प्रचंड अनुभवसंपन्न झाले आणि या अनुभवाचा उपयोग करण्याची ‘हीच ती वेळ’ असल्याचे त्यांच्या लक्षात आले. सत्तेसाठी हपापलेल्या शिवसेनेला साथ दिली तर त्याचा रिमोट कंट्रोल आपल्याच हाती असेल आणि या सर्कशीचा रिंगमास्तर आपणच असू, हे पवारांनी ओळखले व ही सर्कस सुरु केली.


विद्यमान सरकारमध्ये शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस सहभागी झालेली आहे आणि पवारांनी ‘आमच्या सर्कशीतले प्राणी’ असे या तिन्ही पक्षातील नेते-मंत्र्यांकडे पाहूनच संबोधले असणार, हेही नक्की. उल्लेखनीय म्हणजे, शरद पवारांनी विधानसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी एका सभेत, शिवसेनेचे कुत्रे आले का, अशा शब्दांत टर उडवली होती. नंतर मात्र, याच शिवसेनेच्या नेत्यांनी सत्तेसाठी पवारांच्या घरच्या वार्‍या करत त्यांनी उच्चारलेले शब्द खरे करुन दाखवण्याचा चंग बांधला. सत्तेच्या हव्यासापायी इकडून तिकडचा आणि तिकडून इकडचा उंबरा झिजवण्याची वेळ एकेकाळी वाघासम डरकाळी फोडणार्‍या शिवसेनेवर आली. 


पुढे या दारोदार भटकण्याच्या खेळातून एक सच्चा शिवसैनिक मुख्यमंत्रीही झाला. पण, पवारांच्या दृष्टीत अजूनही शिवसेनेवाले सभेत घुसलेल्या प्राण्यासारखेच असावेत आणि म्हणूनच त्यांनी स्वतः पुढाकार घेऊन स्थापन केलेले सरकार हे सर्कस असून त्यात प्राणी असल्याचे मान्य केले. पण, पवारांना एवढा एकच प्राणी मिळाला नाही, तर राणीच्या बागेतले पेंग्विनदेखील त्यांच्याच अखत्यारित येतात. म्हणजे, एकाचवेळी दोन-दोन प्राण्यांचा अलभ्य लाभ स्वतःच्याच चाणाक्षपणामुळे शरद पवारांना झाला. अशा चातुर्याचे कौतुक करावे तरी किती? तत्पूर्वी लोकसभा निवडणुकीवेळी पवारांनी याच शिवसेनेतून ‘कोल्हे’ आयात करुन शिरुर लोकसभा मतदारसंघातून उभे केले होते. म्हणजे, पवारांच्याच मान्यतेनुसार आताच्या सर्कशीची तयारी आधीपासूनच सुरु असल्याचे म्हणता येते.


पुढचा मुद्दा विदूषकाचा असून आमच्या सर्कशीत त्याची कमतरता असल्याचे पवार म्हणाले. पण ऑक्सफोर्ड विद्यापीठाच्या परीक्षांची माहिती ठेवणार्‍या पवारांना ही माहिती नसावी. सर्कस पूर्ण तेव्हाच होते, ज्यावेळी विदूषक त्यात असतो आणि एकदा सर्कस सुरु झाली की रिंग मास्तर, आम्हाला विदूषक हवा, अशी मागणी करत नसतो. पवारांनी राजनाथ सिंहांना दिलेल्या दुजोर्‍याप्रमाणे राज्य सरकारची सर्कस सुरु झालेली आहे आणि त्यात एकच एक विदूषक नाही, संजय राऊत किंवा जितेंद्र आव्हाडांसारखे अनेकजण आहेत, ही वस्तुस्थिती आहे. पवार कुटुंबीयांच्या राजकीय उत्कर्षासाठी राबणार्‍या कार्यकर्त्यांनाही शरद पवारांनी विदूषकच करुन ठेवलेले आहे.


कारण, त्यांचे काम फक्त टाळ्या वाजवण्याचेच राहिलेले असून सर्वप्रकारचे राजकीय लाभ फक्त एकाच कुटुंबाला मिळत आले आहेत आणि पुढेही मिळणार आहेत. तसेच विदूषक काँग्रेस पक्षातही आहेत, फक्त इथे त्यांचा रिमोट कंट्रोल दिल्लीत असून त्यांच्या तालावर इकडची मंडळी झोके घेत असतात. तिकडून एक इशारा केला की अमकी उडी, दुसरा इशारा केला की, तमकी उडी, असे यांचे सुरु असते. त्यामुळे पवारांनी विदूषक नाही, म्हणून मागणी करण्यात अर्थ नाही. मात्र, हे इथवरच नाही, तर पवारांच्या सर्कशीतला बोनस पॉईंट म्हणावा, असे विदूषक शिवसेनेतही आहेत. 


म्हणजे शिवसेनेकडून पवारांना प्राण्यांबरोबरच विदूषकही मिळतात. नको त्या मुद्द्यावर तोंड उघडून किंवा लेखणी खरडून सरकारची नाचक्की करणे, ही त्यांची कर्तबगारी आहे. हे कमी म्हणून की काय, मराठी माध्यमांतले पवारकौतुक सांगणारे व त्यांच्या हाती दोरी असलेल्या कोरोनाविरोधात निष्प्रभ ठरलेल्या सरकारची प्रशंसा करणारेही अनेक विदूषक आहेत. त्यामुळे पवारांनी विदूषक नसल्याची फिकीर करु नये, ते पहिल्यापासून असून पवारकृपेसाठी कसलाही खेळ करायला तयारच असतात. 


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.