पंतप्रधान नरेंद्र मोदींनी साधला फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींशी संवाद

10 Jun 2020 15:03:49

PMO_1  H x W: 0



नवी दिल्ली
: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज फिलिपिन्सचे राष्ट्रपती महामहिम रॉड्रिगो डयुटर्ट यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि कोविड १९ महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांचा सामना करण्यासाठी दोन्ही देशांच्या सरकारकडून केल्या जात असलेल्या उपाययोजनांवर चर्चा केली. दोन्ही नेत्यांनी सध्याच्या आरोग्य संकटादरम्यान परस्परांच्या देशांमधील नागरिकांचे कल्याण सुनिश्चित करण्यात आणि त्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केलेल्या सहकार्याची प्रशंसा केली. फिलिपिन्सला अत्यावश्यक औषधी उत्पादनांचा पुरवठा करण्यासाठी भारताने केलेल्या उपाययोजनांचीही फिलिपिन्सच्या राष्ट्रपतींनी प्रशंसा केली.





पंतप्रधानांनी राष्ट्रपती डयुटर्ट यांना या महामारीविरोधातील लढ्यात फिलिपिन्सला सहाय्य करण्यासाठी भारत वचनबद्ध असल्याचे आश्वासन दिले आणि संभाव्य लस सापडल्यावर तिच्या उत्पादनाबरोबरच किफायतशीर औषधी उत्पादने तयार करण्याची भारताची सुस्थापित क्षमता कायम ठेवत संपूर्ण मानवजातीच्या कल्याणासाठी ती यापुढेही उपलब्ध करून देऊ यावर त्यांनी भर दिला. दोन्ही नेत्यांनी संरक्षण सहकार्यांसह द्विपक्षीय सहकार्याच्या सर्व पैलूंमध्ये अलिकडच्या काळात दिसून आलेल्या प्रगतीबाबत समाधान व्यक्त केले. हिंद-प्रशांत क्षेत्रात भारत, फिलिपिन्सला आपला महत्वपूर्ण भागीदार मानतो, यावर पंतप्रधानांनी विशेष भर दिला. पंतप्रधानांनी फिलिपिन्सच्या आगामी राष्ट्रीय दिनानिमित्त महामहिम राष्ट्रपति डयुटर्ट आणि फिलिपिन्सच्या जनतेला शुभेच्छा दिल्या.
Powered By Sangraha 9.0