बॉलीवूडमधील सुप्रसिद्ध संगीतकार वाजीद खान पडद्याआड !

01 Jun 2020 10:31:35

wajid khan_1  H
 
 
मुंबई : ‘दबंग’ चित्रपटातील ‘तेरे मस्त मस्त दो नैन’ या गाण्याचे संगीतकार साजिद-वाजीदमधील वाजीद खान याचे रविवारी रात्री निधन झाले. वयाच्या अवघ्या ४२व्या वर्षी त्याने जगाचा निरोप घेतला. वाजिदला अनेक दिवसांपासून मूत्रपिंडाचा त्रास होता. मुंबईतील एका रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. अचानक प्रकृती बिघडल्याने त्याला व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आले होते. ‘दबंग’च्या सर्व चित्रपटांतील गाण्यांना त्यांनी संगीत दिले होते.
 
 
साजिद - वाजिद आणि सलमान खानचे चित्रपट हे प्रेक्षकांसाठीचे अफलातून समीकरण यापुढे मात्र काहीसे अपूर्णच राहिले. या लोकप्रिय संगीतकार जोडीने आतापर्यंत 'वॉण्टेड', 'दबंग', 'एक था टायगर' अशा चित्रपटांना संगीत दिले होते. संगीत दिग्दर्शनासोबतच त्याने रिऍलिटी शोमध्ये आपल्या भावासोबत परीक्षक म्हणूनही भूमिका बजावली होती. ‘सारेगमप’ या रिऍलिटी शोमध्ये त्यांनी सर्वांची मने जिंकली होती. 
 
 
 
 
 
कोरोनामुळे वाजिदचा मृत्यू झाल्याचे सोशल मीडियावर सांगितले जात आहे. या वृत्ताला दुजोरा देत अभिनेता आणि वाजिदचा बालपणीचा मित्र रणवीर शौरेने लिहिले की, “माझ्या बालपणीच्या मित्राची बातमी ऐकून मला वाईट वाटले. वाजिदने कोविड-१९ समोर घुडगे टेकले. मला धक्का बसला आहे. हे अत्यंत दु:खद आहे.” ही बातमी काळातच अनेक सेलिब्रेटींनी दुःख व्यक्त केले आहे.
 
 
Powered By Sangraha 9.0