मन:स्वास्थ्य राखा !

    दिनांक  01-Jun-2020 21:46:37
|

corona stress_1 &nbsकोरोना पूर्वकाळात आपण खूप ‘बिझी बिझी’ असायचो़ श्वास घ्यायला फुरसत नसायची. जीवन इतकं वेगानं चालू होतं की, कुणालाही थांबायला फुरसत नव्हती. अर्थात, त्याचेही दुष्परिणाम आपले शरीर आणि मन भोगत असते. मुंबईकरांच्या मनगटाला नाही तर मानगुटीवर घड्याळ बांधलेले असते. अशा ताणतणावातून अनेक समस्या जन्म घेतात. कळत-नकळत आरोग्य धोक्यात येते.
वैश्विक संकट अजून टळलेले नाही. याउलट जगात हा नरसंहार सुरुच आहे. जीवितहानी होऊ नये, यासाठी जागतिक स्तरावर प्रयत्न चालू आहेत. कोरोनासाठी लस अथवा औषध सापडेलही. पण, सध्या संपूर्ण जग एकजुटीने या समस्येचे निराकरण करण्याचा प्रयत्न करीत आहे. कोट्यवधी लोक ‘लॉकडाऊन’मध्ये आहेत. स्वत:च्या आणि इतरांच्या हिताच्या द़ृष्टीने आपले सर्वांचे घरात राहणे अत्यावश्यक आहे. कठीण वाटत असले तरी अवघड निश्चित नाही. आपल्या सुरक्षिततेच्या द़ृष्टीने आपल्या ‘होम स्वीट होम’मध्ये शांततेने राहणे महत्त्वाचे आहे़. कोणतीही गोष्ट करताना शांतता असायला हवी. मन शांत असले की, शरीरही अस्वस्थ नसते. या ‘लॉकडाऊन’च्या काळात या अभूतपूर्व मन:शांतीचा अनुभव आपण घ्यायला हवा. जे काही घडते ते सर्व आपल्या भल्यासाठीच, असा सकारात्मक विचार ठेऊन सकारात्मक राहावे. आपल्या मन:स्थितीचा फार मोठा प्रभाव आपल्या कामकाजावर होत असतो. कोरोना पूर्वकाळात आपण खूप ‘बिझी बिझी’ असायचो़ श्वास घ्यायला फुरसत नसायची. जीवन इतकं वेगानं चालू होतं की, कुणालाही थांबायला फुरसत नव्हती. अर्थात, त्याचेही दुष्परिणाम आपले शरीर आणि मन भोगत असते. मुंबईकरांच्या मनगटाला नाही तर मानगुटीवर घड्याळ बांधलेले असते. अशा ताणतणावातून अनेक समस्या जन्म घेतात. कळत-नकळत आरोग्य धोक्यात येते.


कोरोना प्रादुर्भावामुळे ‘लॉकडाऊन’ची स्थिती अनुभवायला लागत आहे. सुरुवातीचे काही दिवस ठीकठाक गेले, पण जसजसे दिवस वाढत जात आहेत, तसतशी मनात अस्थिरता भीती घर करुन राहत आहे. ’मन चिंती ते वैरी न चिंती’ अशी म्हण हेच दर्शवते की, उद्या-परवाचे संकट आज जगू नका. टीव्हीवरील जगभरातील मृतांचा वाढवणारा आकडा पाहून हृदयाचा ठोका चुकतो. अनामिक भीतीचे दडपण प्रत्येकाच्या मनावर आता दिवसेंदिवस वाढत आहे. प्रत्येक व्यक्तीने खंबीर राहायला हवे. प्रत्येक कुटुंबातील व्यक्तीही एक जबाबदार नागरिक आहे. प्रशासनाला संपूर्णपणे सहकार्य करणे, हे आपले आद्यकर्तव्य आहे. देशातील एकंदर परिस्थिती पाहता जनतेचे संपूर्ण सहकार्यच देशाला या संकटातून बाहेर काढू शकेल. मन अतिशय चंचल असते आणि ते ताब्यात राहणे, अत्यंत कठीण कर्म घरात बसून राहणे हे मनाला पटत नाही. कारण, इतक्या वर्षांची सवय एकाएकी सुटणार नाही.
 

परंतु, अंतर्मनास एक प्रश्न विचारावा. आपल्या जीवापेक्षा आपले तत्कालीन मनोरंजन महत्त्वाचे आहे का? बाहेर साक्षात मृत्यू आहे तो केवळ तुम्हालाच नव्हे, तर तुमच्या संपर्कात येणार्‍या प्रत्येकाचा काळ ठरणार आहे. तुमचे आणि इतरांचे आरोग्य धोक्यात आणणार्‍या अशा धाडसी कृत्यांना आवर घालायला शिकले पाहिजे. एका व्यक्तीच्या हलगर्जीपणाचा फटका शासनाला, जनतेला आरोग्य विभागाला सोसावा लागतो. त्यामुळे घर सोडून बाहेर पडू नये. जीवनावश्यक वस्तूंच्या खरेदीसाठी घरातील केवळ एकच व्यक्ती बाहेर पडेल आणि सुरक्षिततेचे नियम पाळून जलद घरी येईल. मनुष्य हा समाजशील प्राणी आहे. कंपू करुन राहणं ही मानवीवृत्ती आहे. पण, ‘कोविड-१९’च्या काळात आपल्याला ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळायला हवं. समाज जगायला हवा. इटली-स्पेन-चीन-जर्मनी-अमेरिका यांची भयावह परिस्थिती आपण अनुभवली. ’पुढच्यास ठेच मागचा शहाणा’ समाजमाध्यमांद्वारे अनेक अपडेट्स आपल्यापर्यंत पोहोचले. वास्तवाची भीषणता विशद करणार्‍या या गोष्टी आपल्या आरोग्याच्या आणि जीविताच्या द़ृष्टीने महत्त्वपूर्ण आहेत. कोणत्या गोष्टीतून आपण काय शिकायचे हे महत्त्वाचे नाही का?


मध्यंतरी वाचनात आले की, जंगलात वणवा पेटला की चहुबाजूंनी ज्वाळा भडकलेल्या असतात. सर्व प्राणी बचावासाठी सैरावैरा पळत असतात. हेतू हाच की जीव वाचावा. पण, त्या वणव्यात जंगलच्या राजासह सर्वजण खाक होतात. एकच प्राणी जगतो तो म्हणजे उंदीर! आग लागताच तो जमिनीतील बिळात स्वत:ला गाडून घेतो. त्यामुळे आगीपासून संरक्षण मिळून जीव वाचवतो. आपल्या सर्वांना गरज आहे. गणराजाच्या या वाहनापासून काही शिकण्याची आपल्या घरात आपण जेवढे सुरक्षित आहोत तेवढे जगात अन्यत्र कुठेही नाही. त्यामुळे मला स्वत:ला वाटते काही काळासाठी घरात थांबा, अविचाराने वागू नका. ‘कोविड-१९’ एकदा हद्दपार झाला की मोकळं आकाश तुम्हाला बोलावेल. समुद्राची गाज तुम्हाला बोलावेल. त्यावेळी जरुर जा. पण आता नितांत आवश्यकता आहे ती घरात थांबण्याची़, असं समजा. आपल्याला क्वॉलिटी टाईम मिळाला आहे. या संधीचा पुरेपूर कसा फायदा घेता येईल? व्यक्तिमत्त्व विकासाच्या द़ृष्टीने हा वेळ सत्कारणी लावता येईल. याचा व्यापक विचार करावा. नियमित ध्यानधारणा, हलकासा व्यायाम, पोषक आणि संतुलित आहार, पुरेशी झोप मिळणं या काळात आवश्यक आहे. आपण इतर आजारांनी अंथरुणावर पडणार नाही एवढी काळजी घेतली तरी पुरे! जनसंपर्कातून होणारे आजार आपल्याद्वारे इतरांकडे संक्रमित होणार नाहीत, याची खबरदारी बाळगावी.


मनोरंजनाची अनेक साधने घरात आहेत. टीव्ही, मोबाईलमुळे रिकामा वेळ भरुन निघू शकतो. घरकामात होताहोईतो मदत सर्वांनी करावी. त्यामुळे अंगात भरलेला आळस निघ्ाून जाईल. कार्यक्षमता वाढेल. सगळीच घरं मोठी नाहीत म्हणून आहे त्या घरात राहणे. जगण्यासाठी अशी कितीशी जागा लागते? २४ बाय ७ सतत संपर्कात राहिल्याने अनेक ठिकाणी खटके उडू शकतात. यासाठी मनावर संपूर्णत: नियंत्रण असावे, एकाच घरात विविध वयोगटाच्या, विविध वृत्ती-प्रवृत्तीच्या व्यक्ती वास्तव्यास असतात. ’हाताची पाचही बोटे सारखी नसतात़’. तद्वतच एकाच प्रसंगात सर्वच व्यक्ती सारख्याच अभिव्यक्त होत नसतात. स्वभाव धर्मातील वैचित्र्य सर्वत्र पाहावयास मिळतं. आपण नेहमी शारीरिक आरोग्याचा विचार प्रामुख्याने करतो. पण, ज्यावर हे शारीरिक आरोग्य अवलंबून आहे. त्या मानसिक आरोग्याकडे आपले नाही म्हटले तरी दुर्लक्ष होतेच. अनेक शारीरिक व्याधी मनाशी संलग्न असतात. त्यामुळे कोणत्याही भीषण परिस्थितीत तुम्ही किती टिकाव धरता, हे संपूर्णत: तुमच्या मनावर अवलंबून आहे़ मन:स्वास्थ्य बिघडलं की त्याचे दुष्परिणाम त्या व्यक्तीला आणि निकटतम व्यक्तींना भोगावे लागतात. म्हणून आपल्या स्वभावावर नियंत्रण ठेवावे. इतरांचा विचार करावा. आपलाच हेका कायम चालवू नये. वादापेक्षा संवाद आणि सुसंवादावर अधिकतम भर द्यावा. वादामुळे अनावश्यक ताण आधी मनावर आणि त्यानंतर शरीरावर दिसू लागतात. सध्याच्या काळात बर्‍याच जणांची मानसिक घुसमट होऊ शकते. त्यामुळे सर्वांना त्यांच्या वयोगटानुसार, स्वभाव धर्मानुसार समजून घ्यावे आणि चर्चा करुन समस्येवर उपाययोजना करावी. आपल्याला छोट्या/क्षुल्लक वाटणार्‍या गोष्टी कदाचित इतरांना अत्यंत महत्त्वाच्या असू शकतात.’मन:स्वास्थ्य’ हे आपले आपणच जपायचे असते. शरीराची एखादी जखम औषधोपचाराने काही काळात बरी होऊ शकते. त्या वेदना विशिष्ट काळापुरत्या मर्यादित असतात. परंतु, मनावरचा आघात मनाची जखम आयुष्यभर पुरते. प्रत्येकाचा पिंड वेगळा असल्याने अशा किती गोष्टी मनावर घ्यायच्या, या ज्याच्या त्यानेच ठरवाव्यात. घरात राहणार्‍या माणसांनी एकमेकांची पर्वा करायला शिकले पाहिजे. दुसर्‍याचा विचार करणारी अशी किती माणसे या जगात आहेत! बर्‍याच जणांना नैराश्य येते. कारण, त्यांना जसं हवं तसं त्यांना मिळत नाही. अर्थात, प्रत्येकाच्या आयुष्यात अशी वेळ केव्हा ना केव्हातरी येत असते. त्यामुळे ’आपबीती’चा अनुभव असल्यास दुसर्‍या यातना समजू शकतात. ‘कोविड-१९’ची समस्या निर्माण झाली ती कालांतराने निघ्ाून जाईल. प्रत्येकाचे मानसिक स्वास्थ्य जपले, तर शरीर आरोग्याच्या समस्या अगदी नगण्य आहेत. या अवघड काळात आपल्याला आपला शोध घेता येतोय. अनेक दुर्लक्षित किरकोळ बाबी वेळीच उपाययोजना केल्यास भावी आयुष्याच्या द़ृष्टीने फार महत्त्वाचे ठरेल. जो इतरांचा विचार करतो त्याच्या बाजूने परमेश्वर! सध्याचे दिवस तणावाचे असले तरी घरात सौहार्दाचे वातावरण कसे राहील, याकडे लक्ष द्यावे. आपण निश्चय करु आणि आपला आदर्शं इतरांपुढे ठेवू. ’हेही दिवस जातील’ या आशेवर पुढील मार्गक्रमणा करायची आहे, पण घराबाहेर पडायचे नाही. तूर्तास रजा घेतो पुन्हा भेटू...


-संजीव पेंढरकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.