अंतराळ स्पर्धेचे बिगुल वाजले!

    दिनांक  01-Jun-2020 21:20:32   
|

space x_1  H x


‘स्पेस एक्स’ने अंतराळ यानाचे प्रक्षेपण तर केलेच, पण ते तेवढ्यापुरते मर्यादित नाही, ही केवळ सुरुवात आहे, या क्षेत्रात आणखी बरेच काही व्हायचे आहे. त्यापैकी अंतराळ संशोधन क्षेत्राशी संबंधित अनेक गतिविधी घडत असल्याचे आपल्याला दिसतही आहे आणि त्यातून या क्षेत्रातील स्पर्धा अधिकाधिक वेगवान होईल, याचे संकेतही मिळतात. 
अंतराळ संशोधन क्षेत्रातील आतापर्यंतच्या घडामोडींमध्ये शनिवार दि. ३०मेची नोंद एक ऐतिहासिक दिवस म्हणून झाली. त्याला कारण ठरले ती अमेरिकन अब्जाधीश उद्योगपती एलन मस्क आणि त्यांची कंपनी ‘स्पेस एक्स’ने केलेला कारनामा! ‘स्पेस एक्स’ ही एलन मस्क यांची अंतराळ संशोधनविषयक कंपनी असून त्यामार्फत प्रथमच एका खासगी कंपनीने स्वतः तयार केलेल्या अंतराळ यानातून अंतराळवीरांना अंतराळात पाठवले. आतापर्यंत अंतराळ संशोधन, अंतराळयान प्रक्षेपण आदी कामे विविध देशांतील सरकारी संस्थांमार्फत होत असत आणि अजूनही होतात. मात्र, ‘स्पेस एक्स’ या खासगी कंपनीने या क्षेत्रात प्रवेश केला आणि तिने आता अंतराळयानाचे प्रक्षेपणही करुन दाखवले. ही जितकी कौतुकास्पद घटना तितकीच, भविष्यात काय काय होऊ शकते, त्याची छोटीशी झलक दाखवणारीही. कारण, ‘स्पेस एक्स’ने अंतराळ यानाचे प्रक्षेपण तर केलेच, पण ते तेवढ्यापुरते मर्यादित नाही, ही केवळ सुरुवात आहे, या क्षेत्रात आणखी बरेच काही व्हायचे आहे. त्यापैकी अंतराळ संशोधन क्षेत्राशी संबंधित अनेक गतिविधी घडत असल्याचे आपल्याला दिसतही आहे आणि त्यातून या क्षेत्रातील स्पर्धा अधिकाधिक वेगवान होईल, याचे संकेतही मिळतात. तथापि, परवानाप्राप्त खासगी कंपन्यांनी अशाप्रकारचे अंतराळ अभियान सुरु करावे, यासाठी अमेरिका गेल्या कित्येक वर्षांपासून प्रयत्नशील होती. जेणेकरुन ‘नासा’ला केवळ अंतराळ संशोधन आणि अन्य गतिविधींवर आपले लक्ष केंद्रित करता येईल.मे महिन्याच्या सुरुवातीला ‘नासा’चे प्रशासक जिम ब्रिडेस्टाइन यांनी अशीही घोषणा केली की, ‘नासा’ प्रसिद्ध हॉलिवूड अभिनेता टॉम क्रूझला घेऊन अंतराळात पहिल्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी काम करत आहे. म्हणजेच ‘नासा’ अंतराळविषयक कार्यक्रम-उपक्रमांतून व्यावसायिक लाभाच्या दृष्टीनेही गंभीर असल्याचे यातून स्पष्ट होते. याव्यतिरिक्त ‘नासा’चे लक्ष आता सन २०२४पर्यंत चंद्रावर महिला अंतराळवीरांगना आणि नंतर पुरुष अंतराळवीरांना उतरवण्याच्या योजनेवरही आहे. ‘नासा’ला चंद्रावर अंतराळवीरांसाठी एक बेस कॅम्प किंवा तळ/छावणी तयार करायची आहे. अर्थात, या मोहिमेतही अमेरिकेतील खासगी कंपन्यांची भूमिका महत्त्वाचीच असेल. म्हणजे चित्रपटाच्या चित्रीकरणाची योजना वा चंद्रावर तळ उभारण्यासारख्या उपक्रमांतून आपल्याला एक वेगाने वाढणारी वा निर्माण होणारी ‘अंतराळ अर्थव्यवस्था’ पाहायला मिळेल. तसेच ‘नासा’ आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाच्या व्यावसायिक वापरावरही विचार करत आहे. औषधे आणि गुरुत्वाकर्षणविषयक प्रयोगांच्या पुढे अंतराळ स्थानकाचा उपयोग व्हावा, याची तयारी यातून दिसते. ‘अ‍ॅमेझॉन’चे संस्थापक जेफ बेझोस यांनी तर अंतराळात कोट्यवधी लोकांना राहण्यासाठी वसाहती उभारण्याची एक दीर्घकालीन योजनाही आखली आहे. यासाठीची पूर्वतयारी म्हणून चंद्राच्या पृष्ठभागावर लॅण्डर उभारावे लागेल.


चीनही क्षुद्रग्रहांच्या अभ्यासासाठी मोहीम राबवणार आहे आणि त्याने चंद्राच्या न दिसणार्‍या मागच्या भागावर याआधीच रोव्हर उतरवलेले आहे. याव्यतिरिक्त रशियादेखील चंद्रावर आपला एक तळ उभारण्याच्या तयारीत आहे. मात्र, रशियाचा हेतू हेलियमचे उत्खनन करणे, हा असल्याचे म्हटले जाते आणि यासंबंधीची मोहीम २०२५नंतर सुरु होऊ शकते. सोबतच ‘रियुझेबल रॉकेट्स’ म्हणजे पुनर्वापर करता येण्याजोग्या प्रक्षेपणयानाची निर्मितीही संशोधक करत आहेत. उपग्रहांचा आकार कमी करणे, त्यांच्या प्रत्येक प्रक्षेपणाचा खर्च कमी करण्याची तयारीही जोरात सुरु आहे. अंतराळक्षेत्र केवळ ‘एअरोस्पेस’ आणि ‘डिफेन्स’पुरते मर्यादित न राहता, आयटी हार्डवेअर आणि टेलिकॉमसंबंधी व्यावसायिक संधींची कवाडेही खुली होत आहेत. त्यामुळेच एका अंदाजानुसार तर २०४०पर्यंत जगभरातील अंतराळउद्योगाची उलाढाल ११खर्व डॉलर्स वा त्यापेक्षाही अधिक रकमेची होऊ शकते. दरम्यान, ‘नासा’ आणि अमेरिकेने अंतराळ मोहिमा व उत्खननासंबंधीचे कायदे तयार करणे व ते लागू करण्यासाठीही पावले उचलली आहेत. ‘नासा’ने त्यासंबंधीचा प्रस्तावही सादर केला असून रशियाने मात्र त्यावर आक्षेप घेतला आहे. तत्पूर्वी १९६७ साली अंतराळातील गतिविधींबाबत एक नियमावली सांगणारी ‘आऊटर स्पेस ट्रिटी’ तयार करण्यात आली असून भारतासह १०९देशांनी त्यावर स्वाक्षरी केलेली आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.