इवांका ट्रम्प यांच्या खासगी स्वीय सहायकास कोरोनाची लागण

09 May 2020 18:05:53

ivanka trump_1  



व्हाईट हाऊसमधील कोरोनाग्रस्तांची संख्या ३ वर


वॉशिंग्टन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांची कन्या आणि व्हाईट हाऊसच्या वरिष्ठ सल्लागार इवांका ट्रम्प यांच्या खासगी स्वीय सहायकास कोरोनाची लागण झाली आहे. अमेरिकेचे उपराष्ट्रापती माइक पेन्स यांच्या सेक्रेटरी केटी मिलर यांची कोरोना चाचणी सकारात्मक आल्यानंतर इवांका यांच्या स्वीय सहायकाबाबतची बातमी समोर आली आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांमध्ये कोरोना व्हायरस संक्रमण वेगाने वाढत असल्याबाबत चिंता व्यक्त करत व्हाईट हाऊसच्या प्रेस सेक्रेटरी केलिग मॅकनानी यांनी शुक्रवारी ब्रिफिंगदरम्यान सांगितले की, कर्मचाऱ्यांमध्ये होणारा कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाययोजना सुरु आहेत.


इवांका यांचे पती जेरेड कुशनर हेसुद्धा वरिष्ठ सल्लागार आहेत. तसेच, इवांका आणि कुशनर यांची चाचणी निगेटीव्ह आली आहे. व्हाईट हाऊसमध्ये कोरोना विषयी आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात असल्याची माहिती डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली आहे.


दरम्यान, आजघडीला जगभरात कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झालेल्या नागरिकांची सर्वाधिक संख्या ही अमेरिकेमध्ये आहे. जॉन हॉपकिन्स यूनिवर्सिटीने दिलेल्या आकडेवारीनुसार शनिवारपर्यंत अमेरिकेतील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या तब्बल ७७१८० इतकी आहे. तर आतापर्यंत १,२८३,९२९ अमेरिकन नागरिकांना कोरोना व्हायरसची बाधा झाली आहे.
Powered By Sangraha 9.0