लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांसाठी लालपरी आली धावून...

09 May 2020 18:10:39

ST buses_1  H x
मुंबई : लॉकडाऊन वाढवल्यापासून हातावर पोट असणाऱ्यांचे अतोनात हाल झाले आहे. राज्यभरात अडकलेले नागरिक, विद्यार्थी, पर्यटक आणि मजुर पायपीट करत मैलाचा प्रवास करून घर गाठण्याचा प्रयत्न करत आहेत. अशामध्ये आता यांच्या मदतीसाठी लालपरी म्हणजेच एसटी धावून आली आहे. नियम आणि अटींसह एसटी महामंडळ या सर्व लोकांना इच्छित स्थळी मोफत पोहोचवणार आहे. राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांनी याबाबतची माहिती दिली आहे.
 
मुंबई, पुण्यासह राज्यातील सर्व जिल्ह्यात अडकलेले विद्यार्थी, मजूर, नातेवाईकांकडे गेलेल्या व्यक्ती अशा आपापल्या जिल्ह्यात सोडण्याची व्यवस्था प्रशासनाकडून करण्यात आली आहे. कंटेन्मेंट झोन वगळता बाकी सर्व ठिकाणच्या प्रवाशांना एसटीने प्रवास करता येणार आहे. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाला मदत आणि पुनर्वसन विभागाकडून आवश्यक निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. त्यामुळे संचारबंदीमुळे राज्यामध्ये अडकलेले नागरिक आपापल्या जिल्हयात जाऊ शकतील. यासाठी मोफत एसटी बस सेवा पुरवण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. मात्र या प्रवासासाठी प्रशासनाने काही नियम आणि अटी घातल्या आहेत.
 
एका एसटी बसमध्ये एकावेळी एका गटामध्ये २२ जणांचा समावेश असेल. २२ जणांच्या गटप्रमुखाला पोलीस स्टेशन आणि ग्रामीण भागात जिल्हाधिकारी किंवा तहसीलदाराला प्रवासाच्या परवागनीसाठी अर्ज करावा लागेल. तसेच प्रवाशांना आधार कार्ड किंवा अधिकृत ओळखपत्र दाखवत स्वतःची ओळख द्यावी लागेल. प्रवासादरम्यान प्रवाशाला मास्क लावणे अनिवार्य असेल, एसटी बसमध्ये एका एका सीटवर एकच प्रवासी बसेल.
 
 
Powered By Sangraha 9.0