सेलिब्रिटी कलाकार ते सामाजिक कार्यकर्ता...

    दिनांक  09-May-2020 20:55:14
|

sadashiv amrapurkar_1&nbs‘दुनियाने उन्हे खलनायक का नाम दिया, लेकिन उन्होंने भी बहोत कुछ नेक काम किया’ असे अभिनयाबरोबरच सामाजिक भान जपणारे व्यक्तिमत्त्व म्हणजे सर्वांचे लाडके ‘तात्या’ उर्फ सदाशिव अमरापूरकर....


अहमदनगरच्या भाऊसाहेब फिरोदिया शाळेत २००४ साली एक कार्यक्रम होता. या कार्यक्रमामध्ये दहावीच्या परीक्षेत विशेष प्राविण्य मिळवणार्‍या विद्यार्थ्यांचा विशेष सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमास अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित राहणार होते. माझा सत्कार असल्याने मी हवेत होतो. पण, तिथे गेल्यावर एका व्यक्तीने मला प्रभावित केले आणि त्यांचे भाषण ऐकून मी जमिनीवर आलो. त्यावेळी भरकटलेल्या माझ्या आयुष्याच्या कलेची दिशा सुरळीत झाली. त्या व्यक्तीच्या भाषणाने किंवा विचारांनी माझ्यावर मनोमन संस्कार केले. खरंतरं ’दुनियाने उन्हे खलनायक का नाम दिया, लेकिन उन्होंने भी बहोत कुछ नेक काम किया’ असे स्वत: एक संवेदनशील कलाकार असण्यासोबतच, समाजाप्रती आस्था असलेले जागृत नागरिक, भारदस्त खलनायक म्हणजे सर्वांचे लाडके ’तात्या’ उर्फ सदाशिव अमरापूरकर...

सदाशिव अमरापूरकर यांचा जन्म ११ मे १९५० रोजी अहमदनगर येथे झाला. त्यांचे मूळचे नाव गणेशकुमार नरवाडे. नाटकांतील भूमिकांसाठी त्यांनी ‘सदाशिव अमरापूरकर’ हे नाव घेतले. त्यांच्या आयुष्याचा फार मोठा भाग ग्रामीण जीवनानं व्यापला होता. जन्मगाव (नगर जिल्ह्यातील) शेवगाव तालुक्यातील अमरापूर (ज्यावरून त्यांचं नाव ‘अमरापूरकर’ पडलं), धोरजळ आणि देवाची आळंदी या तीन ठिकाणी त्यांचं बालपण गेलं. अमरापूरकर यांचा जन्म ब्राह्मण कुटुंबातला. त्यांचे वडील दत्तात्रय हे अहमदनगरमधील एक मोठी हस्ती होते. सदाशिव अमरापूरकर यांना कुटुंबीय, मित्र आणि नातेवाईक ’तात्या’ या टोपणनावाने हाक मारायचे. काहीतरी करत राहायचं, असा मुळातच कार्यकर्त्याचा स्वभाव असलेल्या अमरापूरकर यांचा शालेय जीवनापासूनच मोठा मित्रपरिवार. त्यांचे वडील शेती करायचे. शेत नांगरणं, मोट चालवणं, बैलांना चारा घालणं, गाईचं दूध काढणं, जत्रेत बैल पळवणं या सगळ्या गोष्टी अमरापूरकरांनी लहानपणी केल्या. त्यांच्याकडे १०० शेळ्या होत्या. रोज त्यांना चरायला घेऊन जाण्याचं काम अमरापूरकर करत. शेत नांगरणं, शेतात खत टाकणं, ही कामंही ते करत. त्यांची एक आत्या आळंदीला राहायची. आषाढी कार्तिकीला पंढरपूरला वारीबरोबर पायी चालत जायची. अमरापूरकर तिच्यासोबत तीन-चारवेळा आळंदी ते पंढरपूर असे पायी चालत गेले. आळंदीला संतसाहित्याचे ज्येष्ठ अभ्यासक सोनोपंत दांडेकर राहत. ते वारकरी संस्थेचे अध्यक्ष होते. ते कथा, प्रवचन करत, शिकवत. टाळ कसे वाजवायचे, कीर्तनाला उभं कसं राहायचं, कशी सुरुवात करायची, या गोष्टी अमरापूरकर त्यांच्याकडून शिकले.

sadashiv amrapurkar_1&nbs


अमरापूरकर यांना वाचनाची गोडी लागली ती त्यांच्या आजोळला, आष्टीला. त्यांना गोष्टी ऐकायला आवडायचं. मीना नावाची बहीण त्यांना पुस्तकातल्या गोष्टी वाचून दाखवायची. तिच्या मांडीवर डोकं ठेवून गोष्ट ऐकण्याचा त्यांना छंदच लागला होता. तिथं त्यांनी पहिलं पुस्तक ऐकलं ते ‘शामची आई’. साने गुरुजींच्या पुस्तकांनी त्यांना वाचनाची गोडी लावली, ती शेवटपर्यंत कायम होती. त्यांच्याकडे पाच ते सहा हजार पुस्तकं होती. ते रोज किमान तीन तास वाचन करत. मराठी-इंग्रजीतील नवनव्या पुस्तकांबाबतचं त्यांचं वाचन अतिशय अद्ययावत म्हणावं असं होतं. नगरलाच ‘अहमदनगर एज्युकेशन सोसायटी’ नावाची न्या. रानडे यांनी बांधलेली शाळा आहे. अमरापूरकर त्या शाळेचे विद्यार्थी. शालेय वयात ते अत्यंत हूड विद्यार्थी होते, पण क्रिकेट चांगले खेळायचे. पुढे महाविद्यालयात गेल्यावर क्रिकेट सुटलं आणि नाटक सुरू झालं. त्या दोन-चार वर्षांत मुंबईची प्रचंड नाटकं नगरला आली. त्या काळी मुलांना आठ आणे तिकीट होतं. अमरापूरकर प्रत्येक नाटक पाहायचे. त्या काळात त्यांनी भरपूर नाटकं पाहिली.
महाविद्यालयीन शिक्षणासाठी ते नगर महाविद्यालयात गेले. भालचंद्र नेमाडे, मधुकर तोरडमल हे प्राध्यापक त्यांना शिकवायचे. त्या दरम्यान त्यांच्या मित्रानं एकांकिका करायला सुरुवात केली होती. त्यात अमरापूरकरांना नोकराचं काम मिळालं; पण आयत्या वेळेला हिरोचं काम करणारा मुलगा निघून गेला आणि ती भूमिका त्यांच्याकडे आली. त्या एकांकिकेला आणि अमरापूरकरांना उत्तेजनार्थ दहा रुपयांचं बक्षीस मिळालं. ती - ‘पेटलेली अमावस्या’ - त्यांची पहिली एकांकिका. त्यानंतर त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवर ‘छिन्न’, ‘हॅण्ड्सअप’, ‘काही स्वप्नं विकायचीयत’, ‘हवा अंधारा कवडसा’, ‘ज्याचा त्याचा विठोबा’ अशा विविध नाटकांत काम केलं. अमरापूरकर यांचे वडील महानगरपालिकेत नगरसेवक म्हणून काँग्रेसकडून निवडून गेलेले. शिवाय वडील एक अनाथ संस्था चालवत, शेतकी शाळा चालवत. मुलानं शिकून नोकरी करावी, अशी त्यांच्या वडिलांची इच्छा होती. नगरमध्येच त्यांचं शालेय आणि कॉलेजचं शिक्षण झालं. कॉलेजमध्ये असतानाच त्यांना अभिनयाची गोडी लागली. पुढे पुणे विद्यापीठातून इतिहासात ’एमए’ पूर्ण केल्यानंतर ते रंगभूमीकडे ओढले गेले. 1973 मध्ये त्यांनी आपली शाळेपासूनची मैत्रिण सुनंदा करमरकर यांच्याशी विवाह केला. तरीही सुरुवातीला मुलगा नाटक करतोय म्हटल्यावर त्यांनी उत्तेजन दिलं; पण लग्न होऊन दोन मुलं झाली तरी अमरापूरकर नाटकच करत आहेत, हे पाहिल्यावर मात्र त्यांनी विरोध करायला सुरुवात केली. वडील अमरापूरकरांना ‘नाच्या’ म्हणत. तरीही वडिलांचा विरोध पत्करत त्यांनी नाटकं करणं सुरुचं ठेवलं. या काळात त्यांच्या पत्नी, सुनंदा यांनी त्यांना खूपच खंबीरपणे साथ दिली. पदवीधर झाल्यावर अमरापूरकरांनी परभणीला ‘ऑल इंडिया रेडिओ’वर उद्घोषक म्हणून नोकरीही करायला सुरुवात केली, पण ते वातावरण त्यांना मानवलं नाही. शिवाय आणीबाणीचा काळ. त्या वातावरणातील मुस्कटदाबीला कंटाळून त्या नोकरीचा त्यांनी सहा महिन्यांत राजीनामा दिला. नंतर ते ‘नोकरीसाठी जातो आहे,’ असे सांगून पुण्याला नाटक करायला आले. तेव्हा घरची आघाडी सांभाळून सुनंदाताईंनी त्यांना प्रोत्साहन देण्याचं, त्यांची उमेद वाढवण्याचं मोठं काम केलं.


sadashiv amrapurkar_1&nbs
‘अर्धसत्य’मुळे अमरापूरकरांच्या जीवनात मोठा बदल झाला. मराठीतील शैलीदार कथालेखक श्री. दा. पानवलकर यांच्या ‘सूर्य’ या कथेवर गोविंद निहलानी यांनी विजय तेंडुलकर यांच्याकडून कथा-पटकथा लिहून घेऊन ‘अर्धसत्य’ हा चित्रपट १९८४ साली केला. त्यात ’रामा शेट्टी’ ची छोटीशी भूमिका अमरापूरकर यांनी केली. पण, त्यांच्या या छोट्या भूमिकेनं प्रचंड लोकप्रियता मिळवली. त्या संदर्भातील दोन किस्से खूप रंजक आहेत.  या चित्रपटाचं शूटिंग संपल्यावर अमरापूरकर गावी नगरला गेले. त्यांच्या मोठ्या भावाला बाहेरगावी जायचं असल्याने वडिलांनी त्यांना तोपर्यंत किराणा मालाचं दुकान सांभाळायला सांगितलं. दरम्यान ‘अर्धसत्य’च्या प्रीमिअरची तारीख जवळ आली. अमरापूरकरांनी त्याबाबत वडिलांना सांगितल्यावर ते म्हणाले, “तो मुंबईत आहे ना, तू दुकान सांभाळ.” त्यानंतर आठ-दहा दिवसांनी अमरापूरकर नगरहून एसटीने निघून पहाटे दादर बस स्टॅण्डला उतरले. तोवर ‘अर्धसत्य’ मधील रामा शेट्टी मुंबईत सर्वांना माहीत झाला होता. त्यामुळे त्यांना पाहताच टॅक्सीवाल्यांनी त्यांच्याभोवती गलका केला. एकानं बळजबरीनं त्यांना टॅक्सीत बसवून त्यांच्याकडून पैसेही न घेता त्यांना घरी सोडलं. ‘अर्धसत्य’च्या कथेचे मूळ लेखक श्री. दा. पानवलकर यांनी या चित्रपटाविषयी ‘शूटिंग’ (१९८५) या नावाने एक पुस्तक लिहिले आहे. त्यात त्यांनी ओम पुरी आणि अमरापूरकर यांच्या समोरासमोरच्या दृश्याविषयी लिहिले आहे - “इथं सदाशिव अमरापूरकरांचा रामा शेट्टी फार समजदारीनं संवादांतील सम खटकन पकडतो. हे सगळं दृश्य सदाशिव अमरापूरकर यांनी विनासायास अभिनयानं झक्कास तोलून धरलं. फिल्मी दुनियेत हे त्यांचं पदार्पण, पण ‘वामना’च्या पहिल्या पावलासारखं नेमकं आणि भक्कम.”
त्या एवढ्या भूमिकेवरून अमरापूरकरांना १८० चित्रपटांच्या ऑफर आल्या. त्यांची तुलना अमरीश पुरीशी केली गेली. त्यानंतर आजतागायत त्यांनी ४५० हून अधिक हिंदी चित्रपटांत आणि ७० -८० मराठी चित्रपटांत भूमिका केल्या. याशिवाय भोजपुरी, गुजराती, बंगाली, उडिया अशा अनेक चित्रपटांमध्ये काम केलं. अमरापूरकरांनी अमान जलाल यांच्या मालिकेत लोकमान्य टिळकांची छोटीशी भूमिका करून रुपेरी कारकिर्द सुरू केली, तर ‘राज से स्वराज तक’ या मालिकेत टिळकांची मोठी भूमिका केली. श्याम बेनेगल यांच्या ‘डिस्कव्हरी ऑफ इंडिया’तील महात्मा फुले आणि ‘सडक’, ‘हुकूमत’, ‘ऐलान-ए-जंग’ या चित्रपटांतील खलनायकाच्या भूमिका त्यांना स्वत:लाही आवडलेल्या होत्या, तर मराठीतील सुमित्रा भावे यांच्या ‘वास्तुपुरुष’ मधील भूमिका त्यांना सर्वात आव्हानात्मक वाटली होती.१९९१ मध्ये ‘सडक’ या चित्रपटात अमरापूरकर यांनी साकारलेली ’महाराणी’ची भूमिका वाहवा मिळवून गेली. या भूमिकेसाठीही अमरापूरकर यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतर १९९३ मध्येही अमरापूरकर यांनी उत्कृष्ट खलनायकाचा मान पटकावत पुन्हा फिल्मफेअर पुरस्कार जिंकला. विशेष म्हणजे ’उत्कृष्ट खलनायक’ या कॅटेगरीतला तो पहिलावहिला पुरस्कार होता.


’अर्ध सत्य’नंतर ‘पुराना मंदिर’, ‘नासूर’, ‘मुद्दत’, ‘विरू दादा’, ‘जवानी’ आणि ‘फरिश्ते’ या चित्रपटांमध्ये अमरापूरकर यांनी छोट्या भूमिका साकारल्या. १९८७मध्ये धर्मेंद्रच्या ’हुकूमत’मध्ये खलनायकाची मुख्य भूमिका अमरापूरकर यांना मिळाली. या संधीचं खर्‍या अर्थाने अमरापूरकर यांनी सोनं केलं. हा चित्रपट ‘ब्लॉकबस्टर’ ठरला. ‘मिस्टर इंडिया’ त्यावेळीच झळकला होता. त्यालाही ’हुकूमत’ने मागे टाकले.धर्मेंद्र अमरापूरकर यांच्यासाठी ’लकी’ ठरला होता. मग ही जोडी जमली. त्यानंतर अनेक चित्रपटांत धर्मेंद्र नायक आणि अमरापूरकर खलनायक अशी जोडी दिसली. पुढे अमिताभ बच्चन असो की गोविंदा आणि आमीर खानपर्यंत सगळ्या नामवंतांबरोबर त्यांनी काम केले. १९९०च्या दशकात सुरूवातीच्या काही वर्षांनंतर अमरापूरकर यांनी विनोदी भूमिकांकडे आपला मोर्चा वळवला. ’आँखे’, ‘इश्क’, ‘कुली नं. १’, ‘गुप्त’, ‘आंटी नं. १’, ‘जय हिंद’ या चित्रपटांमध्ये विनोदी आणि सहकलाकाराच्या भूमिकेत ते झळकले. १९९६ मध्ये ‘छोटे सरकार’ चित्रपटात त्यांनी डॉ. खन्नांची भूमिका साकारली. पुढे २००० नंतर अमरापूरकर हे हिंदी चित्रपटांमध्ये फारसे दिसले नाहीत.


‘बॉलिवूडमधील कलाकार’ अशी ओळख असलेल्या अमरापूरकर यांची ओळख ‘सेलिब्रिटी कलाकार ते सामाजिक कार्यकर्ता’ अशी होती. विशेष म्हणजे, अभिनयाबरोबरच सामाजिक भानही त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत जपलं. जिथे अन्याय दिसेल तिथे आवाज उठवायचा, असा त्यांचा खाक्या होत्या. त्यामुळेच होळीदरम्यान रेन डान्ससाठी पाण्याची उधळपट्टी करणार्‍या हुल्लडबाजांविरोधातही त्यांनी आवाज उठवला होता. अमरापूरकर यांच्यावर हात उचलण्यापर्यंत या हुल्लडबाजांची मजल गेली. पण, त्याला त्यांनी भीक घातली नाही. सदाशिव अमरापूरकर यांचे ३ नोव्हेंबर २०१४ रोजी निधन झाले. शेवटच्या श्वासापर्यंत लढा देणार्‍या अशा महान कलावंताला मानाचा मुजरा!!!


- आशिष निनगुरकर
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.