लौकिक संस्कृत / प्राकृत वाङ्मयात ‘आर्य’

    दिनांक  09-May-2020 22:17:23
|


sanskrutam_1  Hरामायण आणि महाभारत या दोन आर्ष (ऋषींनी रचलेले) महाकाव्यांतआर्य शब्द सद्गुणांचा वाचक म्हणूनच वापरला गेल्याचे मागच्या लेखात आपण पाहिले. आता पुढच्या उत्तरकालीन लौकिक संस्कृत / प्राकृत साहित्यात सुद्धा आर्यशब्द कुठे आढळतो का, असल्यास कोणत्या अर्थाने येतो, याचाही असाच एक धावता आढावा घेऊ.


संस्कृत नाटकांमध्ये
आर्य


उत्तरकालीन लौकिक संस्कृत वाङ्मयात देखील कोणत्याही आदरणीय
, वंदनीय, सद्गुणी व्यक्तीचा उल्लेख करताना पुरुष असेल तर आर्यआणि स्त्री असेल तर आर्याअसेच म्हणण्याचा तत्कालीन प्रघात दिसतो. सर्वच नाटकांमध्ये सुरुवातीला एक नांदीअसते. त्यात नाटककाराने आपल्या इष्टदेवतेची प्रार्थना केलेली असते. त्यानंतर नाटकाचा सूत्रधाररंगमंचावर प्रवेशतो आणि आपले संवाद सुरु करतो. त्याच्या सोबत बहुधा त्याची पत्नी नटीअसते. यातली सूत्रधाराच्या तोंडची वाक्ये संस्कृत तर नटीच्या तोंडची वाक्ये प्राकृत भाषेत आहेत. हे दोघेही एकमेकांना आर्याआणि आर्य / आर्यपुत्रम्हणतात. हे असेच असले पाहिजे, असा दंडकच नाट्यशास्त्रात घालून दिलेला आहे. याची काही उदाहरणे पाहूया:


कविकुलगुरू कालिदासाचे सुप्रसिद्ध
अभिज्ञानशाकुंतलम्नावाचे एक नाटक आहे. त्याच्या सुरुवातीला नांदीनंतर सूत्रधार येतो. त्याचा नटीसोबत एक छोटासा संवाद आहे. हा सूत्रधार नेपथ्याकडे पाहून म्हणतो: आर्ये, यदि नेपथ्यविधानमवसितम् इतस्तावदागम्यताम् । अर्थ: आर्ये, जर तुझी आतली नेपथ्याची कामे आटोपली असतील, तर जरा इकडे ये.त्यावर नटी तिथे येते आणि म्हणते: अज्जउत्त, इयं ह्मि | आणवेदु अज्जो को णिओओ अणुचिट्ठीअदुत्ति | (आर्यपुत्र, इयमस्मि । आज्ञापयतु आर्य: को नियोगो अनुष्ठीयतामिति |) अर्थ: आर्यपुत्र, ही मी आले. आर्यांनी मला सांगावे काय काम करायचे आहे ते.आणि हा संवाद असाच पुढे अजून थोडा वेळ चालत राहतो. या पूर्ण संवादात वाक्यावाक्यात सूत्रधार आणि नटी एकमेकांना आर्यम्हणतात.अजून एक उदाहरण पाहूया. विशाखदत्त नावाच्या कवीचे
मुद्राराक्षसम्नावाचे असेच एक प्रसिद्ध नाटक आहे. ते आर्य चाणक्याच्या जीवनकथेवर आधारित आहे. यातही हाच संकेत पाळलेला दिसतो. इथेही सूत्रधार नटीला बोलावतो. नटी रंगमंचावर येऊन म्हणते: अज्ज इग्प्रह्णि | अण्णाणिओएण मं अज्जो अणुगेह्णदु | (आर्य, इयमस्मि । आज्ञानियोगेन मामार्यो अनुगृह्णातु |) अर्थ: आर्य, ही मी आले. आर्यांनी मला आज्ञा देऊन उपकृत करावे.त्यावर सूत्रधार तिला म्हणतो: आर्ये, तिष्ठतु तावदाज्ञानियोग: ...... | अर्थ: आर्ये, माझी आज्ञा सध्या जरा बाजूला राहूदे......आणि हा संवाद सुद्धा असाच पुढे अजून थोडा वेळ चालत राहतो. याही पूर्ण संवादात सूत्रधार आणि नटी एकमेकांना आर्यम्हणतात. या दोन्ही उदाहरणांमध्ये हे दोघे एकमेकांना इसवी सनपूर्व १८०० मध्ये मध्य-आशियातून भारतात स्थलांतर करून आलेल्या वंशाचेअसे म्हणून संबोधत आहेत, की आदराने एकमेकांचा उल्लेख करण्यासाठी आर्य शब्दाचा वापर करत आहेत? आपल्याला काय वाटते?संस्कृत गद्यकाव्यात
आर्य

बाणभट्ट नावाचा अजून एक मोठा संस्कृत गद्यकवी होऊन गेला. त्याची कादम्बरीनावाची एक दीर्घ प्रेमकथा प्रसिद्ध आहे. त्या कथेत सुरुवातीला शूद्रकनावाच्या राजाच्या दरबारात एक तथाकथित चांडाल आपल्या मुलीसोबत एक पोपट घेऊन येतो. त्याचे वर्णन करताना बाणभट्ट म्हणतो: ...... अनुगृहीतार्यवेशेन शुभ्रवाससा पुरुषेण.... अर्थात “...... पांढरी शुभ्र सभ्य वस्त्रे परिधान केलेला पुरुष..... याच्या मागे-पुढे खास बाणभट्ट शैलीतलेबाकीचे अजून बरेच लांबलचक वर्णन आहेच. परंतु इथे सांगण्याचा मुद्दा हा, की या तथाकथित चांडालाचा वेश बाणभट्टाने आर्यवेशम्हणून वर्णन केलेला आहे. अर्थात हा चांडाल राजाच्या सभेत येताना आवर्जून सज्जन किंवा सभ्य लोकांचा वेशपरिधान करून आलेला आहे. लोकरीतीचे तो अशा पद्धतीने पालन करीत आहे. इथे तो इराणीकिंवा मध्य-आशियनवेश परिधान करून आलेला असावा, असे याचा कुणीही वाचक म्हणेल काय?बाणभट्टाचे निधन झाल्यावर त्याच्या मुलाने
कादंबरीचे उरलेले लेखन पूर्ण केले. त्या उत्तरार्धाच्या मंगलाचरणात तो आपल्या पित्याला वंदन करताना म्हणतो: आर्यं यमर्चति गृहे गृह एव लोक: पुण्यै: कृतश्च यत एव ममात्मलाभ: | सृष्टैव येन च कथेयमनन्यशक्त्या वागीश्वरम् पितरमेव तमानतोऽस्मि || अर्थ: "ज्या आर्याचीपूजा लोक घराघरात करतात, पूर्वपुण्याईच्या बळावर मी ज्याच्या ठायी जन्म घेतला आहे, दुसऱ्या कुणाला जमणार नाही अशा या अजोड कथेची रचना ज्याने केली आहे, जो वाणीचा अधिकारी आहे, अशा माझ्या त्या पित्याला मी वंदन करतो.इथे आर्यशब्दाचा वापर करताना कवीच्या मनात आपला पिता एक आदरणीय / वंदनीय व्यक्तिमत्त्व असल्याची भावना आहे, की तो एक परकीय आगंतुक उपरा असल्याचा भाव आहे?

लोककथांमध्ये आर्य

प्राचीन लौकिक प्राकृत साहित्यात गाहासत्तसई’ (गाथासप्तशती) नावाचे तत्कालीन प्रचलित लोकसाहित्य सुद्धा आज उपलब्ध आहे. यामध्ये लोकांमध्ये प्रचलित असलेल्या असंख्य गाथातत्कालीन महाराष्ट्राचा राजा हाल सातवाहनयाने संकलित केलेल्या आहेत. यामध्ये तत्कालीन सर्वसामान्य आणि ग्राम्य लोकांचे जनमानस, चाली-रीती, सामाजिक परिस्थिती यांचे दर्शन घडते. या सर्व गाथा बह्वंशी शृंगारिक आणि सूचकशब्दांनी ओतप्रोत आहेत. यातही आर्य / आर्याहे शब्द काही ठिकाणी दिसतात. यातली एक-दोन उदाहरणे पाहूया.


हल्लफलण्हाणपसाहिआणँ छणवासरे सवत्तीणं
| अज्जाएँ मज्जणाणाअरेण कहिअं व सोहग्गं || (उत्साहतरलत्वस्नानप्रसाधितानाम् क्षणवासरे सपत्नीनाम् | आर्यया मज्जनानादरेण कथितमिव सौभाग्यम् ||) – गाहासत्तसई १.७९ || अर्थ: उत्सवाच्या दिवशी मोठ्या उत्साहाने सवती स्नान करून, नटून-थटून बसल्या. पण या आर्येने स्नानाचाही अनादर करून आपले सौभाग्य दाखवून दिले!किंवा अजून एका ठिकाणी: जञ्झावाउत्तिण्णिअघरविवरपलोट्टसलिलधाराहिं | कुड्डलिहिओहिअहं रक्खइ अज्जा करअलेहिं || (झञ्झावातोत्तृणीकृतगृहविवरप्रपतत्सलिलधाराभि: | कुड्यलिखितावधिदिवसं रक्षत्यार्या करतलै: ||) गाहासत्तसई २.७० || अर्थ: वादळामुळे घराची कुडे उजाड होऊन त्यातून पावसाचे पाणी झिरपत आहे. दूरदेशी गेलेला घराचा मालक परतून कधी येणार त्याचा अवधी कुडाच्या भिंतीवर लिहून ठेवला आहे. तो भिजून पुसला जाऊ नये म्हणून त्याची पत्नी आर्या त्या झिरपणाऱ्या पाण्यापासून त्या मजकुराचे आपल्या हातांनी झाकून रक्षण करत आहे.इथे अशा उदाहरणांमधून तत्कालीन ग्रामीण जीवनातही सामान्य घरच्या स्त्रियांना आदराने आर्याम्हणण्याची पद्धत दिसून येते.विस्तारभयास्तव अजून उदाहरणे देणे शक्य नाही. हाल सातवाहनाचा काळ (इ. सन १ले शतक) असो
, कालिदासाचा काळ (इ. सन ४थे शतक) असो, बाणभट्टाचा काळ (इ. सन ७वे शतक) असो, की विशाखदत्ताचा काळ (इ. सन ८वे शतक) असो प्राचीन भारतातल्या संस्कृत आणि प्राकृत लौकिक वाङ्मयात आर्यशब्द एकही अपवाद न ठेवता सगळीकडे केवळ गुणवाचक अर्थानेच वापरलेला दिसतो. अगदी मुबलक! मग पाश्चात्त्य संशोधकांचे म्हणणे काहीही असो!!


- वासुदेव बिडवे
(
लेखक भारताचा प्राचीन इतिहास, संस्कृती, कला, साहित्य, तत्त्वज्ञान - अर्थात भारतविद्याअथवा प्राच्यविद्या’ (Indology) विषयाचे अभ्यासक आहेत.)

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.