भारताचे (जैविक) प्रभावक्षेत्र (पूर्वार्ध)

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    09-May-2020
Total Views |


super power india_1 



भारत एक आशियाई शक्तीम्हणून प्रस्थापित होऊ लागल्याचा उल्लेख या अगोदर झाला होता. (या लेखमालेचा लेख क्र.१) तसेच अभ्यासकांच्या मते, तो नजीकच्या भविष्यकाळात एक महाशक्तीम्हणून उदयाला येऊ शकतो, असेही म्हटले होते. आज आपण त्या अंगाने, याच लेखमालेच्या माध्यमातून चर्चेत आणलेल्या आग्नेय आशियाच्या विशेष संदर्भावर, लक्ष केंद्रित करणार आहोत.



जेव्हा एखाद्या देशाचा एक
शक्तीम्हणून विचार करण्यात येतो, तेव्हा त्यात काही गृहीतके समाविष्ट असतात. त्यापैकी एक अगदी उघड असलेली गोष्ट म्हणजे, त्याचे स्वत:च्या अंतर्गत कारभारावर ठाम नियंत्रण असणे आणि त्याचबरोबर उर्वरित जगाच्या कार्यकलापावर विशिष्ट (गुणात्मक तसेच परिमाणात्मक) प्रभाव टाकण्याची अंगभूत क्षमता बाळगून असणे. सदर प्रभावाला भौगोलिक मर्यादा असतातच असे नाही. परंतु, भौगोलिक क्षेत्राची अपरिहार्यता अर्थातच असते. विविध कारणांमुळे प्रभावितझालेल्या सदर भौगोलिक क्षेत्राला संबंधित शक्तीचे प्रभावक्षेत्रमानले जाते. आधी म्हटल्याप्रमाणे, मर्यादा जरी नसल्या तरी साधारणत: जगातील कोणत्याही शक्तीच्या प्रभावक्षेत्रात त्याच्या शेजाराचा समावेश हटकून असतोच. या संदर्भात सहज आठवणारी उदाहरणे म्हणजे अमेरिका आणि रशिया; त्यासाठी त्यांच्या शेजाराच्या नकाशावर नजर टाकण्याचीसुद्धा गरज पडत नाही.



याच व्याख्येच्या चष्म्यातून आपण भारताच्या शेजारावर नजर टाकली
, तर मात्र आपल्याला तसा प्रत्यय येत नाही. किंबहुना, भारतच जणू काही त्याच्या पाकिस्तान, चीन आणि बांगलादेश या शेजार-त्रयीच्या (तापदायक) प्रभावक्षेत्राखाली आहे की काय, असे वाटून जाते. यावर खुलासा म्हणून (पाक-बांगलादेशच्या बाबतीत) कोणी १९४७च्या फाळणीचा संदर्भ देऊ शकतो. तर्काच्या अंगाने पाहिल्यास, फाळणीची कटुता कालांतराने विसरली जाऊन, पुरातन जैविक नात्याला कालौघात पुन्हा पालवी फुटायला हरकत नव्हती. पण, मुळात असे काही जैविकत्या भूप्रदेशात आजच्या घडीला शिल्लक तरी आहे का, या प्रश्नाचे उत्तर नकारात्मक आहे आणि ते आपल्याला पुरेपूर ठाऊक आहे.



मग भारताचे प्रभावक्षेत्र तरी कोणते
? भूतान आणि नेपाळ? या दोहोंपैकी भूतानबाबत तर चर्चेची गरजही नाही. जगातील बहुतेक देश त्या देशाशी नवी दिल्लीमार्फत संपर्कात असतात, एवढे सांगितले तरी भारताच्या सदर प्रभावक्षेत्राच्या पक्केपणाची खात्री पटते. यावरून जर कोणी भूतानच्या अगदीच लहान आकाराचा आणि भारताने त्याला पुरवलेल्या संरक्षणाचा संबंध लावला तरी त्याच्या भारताशी असलेल्या बौद्ध नात्याचा संदर्भ नजरेआड करता येत नाही. कोणे एके काळी नेपाळचेदेखील भारताशी असेच, किंबहुना अधिक घट्ट जैविक संबंध होते (ते अधिकृत हिंदुराष्ट्र असेपर्यंत), जे तिथल्या २००१च्या माओवादी राज्यक्रांतीनंतर उत्तरोत्तर क्षीण झाले. आपल्या सागरी शेजार्‍यांशी, श्रीलंका आणि मालदीवशी, आपले संबंध सागरी लाटांप्रमाणे वरखाली हेलकावे घेणारे राहिले आहेत. त्यांच्याबरोबरचे सध्या स्थिर भासत असलेले संबंध हे मूलत: भू-राजकीय पटलावरच्या आजच्या अनिवार्यतेवर बेतलेले आहेत; त्यातला जैविक्तेचा भाग फार कमी आहे. सदर पार्श्वभूमीवर जर दोहोंची तुलना केली, तर मालदीवला आपण (सध्या तरी) प्रभावक्षेत्राचा भाग मानू शकतो; श्रीलंकेच्या बाबतीत मात्र तसे खात्रीने म्हणता येत नाही.



उपरोल्लेखित परिस्थितीचा विचार करता
, कोणाला वाटू शकेल की दुर्दैवाने भारताचे प्रभावक्षेत्र अस्तित्वातच नसावे. पण, सुदैवाने ते भारताच्या विस्तारित शेजारात आणि सध्याच्या जागतिक भू-राजकीय परिस्थितीच्या संदर्भात अगदी मोक्याच्या जागी म्हणजेच आग्नेय आशियात आहे. या विस्तारित शेजाराचा आणि त्या अनुषंगाने भारत सरकारच्या २०१४ साली अधोरेखित झालेल्या ‘Neighbourhood First Policy'चा आढावा आपण या आधी (या लेखमालेचा लेख क्र.२) थोडक्यात घेतला होता. त्याची थोडी उजळणी अशी - ब्रिटिशांनी १९३७ साली बर्मा ब्रिटिश इंडियातून वेगळा काढला नसता, तर १९४७ साली तो स्वतंत्र भारताचा भाग असता. त्यायोगे, थायलंड आणि लाओस आपले सख्खे शेजारी असते. भारताची सागरी सीमा आग्नेय आशियातील सर्वात विशाल आणि प्रमुख सत्ता असलेल्या इंडोनेशियाच्या सीमेला थडकलेली आहेच. अशा प्रकारे विचार केल्यास जवळ जवळ दोन तृतीयांश आग्नेय आशिया आपल्या शेजारात मोडतो.



ही झाली भौगोलिक मांडणी. यात प्रभावक्षेत्राचा भाग नेमका कुठे येतो
? याचे उत्तर यापूर्वीच्या लेखांमध्ये (क्र.२ ते ९) दडलेले आहे. आपण सदर लेखांमधून अनुक्रमे (आणि शक्यतो भारत-प्रभावाच्या क्रमाने) इंडोनेशिया, मलेशिया, थायलंड, व्हिएतनाम, कंबोडिया, लाओस, सिंगापूर, म्यानमार, ब्रूनय, फिलिपिन्स या देशांच्या भारताबरोबरच्या नातेसंबंधांचा उहापोह केला (तिमोर लेस्तला यापुढील चर्चेच्या परिघात ठेवण्यास मर्यादा आहेत). त्यात आपण सर्वसाधारणत: चर्चेत येणार्‍या वाणिज्यिक आणि ठोकळेबाज राजनैतिक बाबींना फाटा देऊन मुख्यत्वे पुरातन काळापासून असलेल्या धर्म-संस्कृतीविषयक परस्पर-संबंधांना प्राधान्य दिले होते.



तसे करण्यामागचे कारण असे की
, या सर्व प्रचंड विस्तारलेल्या भूभागात प्राचीन भारताने दोन हजार वर्षांच्या ज्ञात इतिहासाच्याही आधीपासूनच्या काळात (मानवी संस्कृतीच्या उत्क्रांतीच्या दृष्टिकोनातून), संस्कृतीकरणाची आणि त्या भूभागातील अनेकवंशीय मानवसमूहाला त्या संस्कृतीकरणाच्या एका विशिष्ट टप्प्यावर आणून सोडण्याची अतिशय मोलाची, ऐतिहासिक कामगिरी बजावली आहे. विशेष म्हणजे, सदर कामगिरी कोणताही गाजावाजा न करता अनेक वर्षे (किंबहुना शतके) पार पडली जात होती. काळाच्या, संबंधित भारतीय भूभागाच्या, तसेच प्रचलित वर्णव्यवस्थेच्या अनुषंगाने बोलायचे झाल्यास असे म्हणता येईल की, भारताच्या अनेक प्रांतांतील (मुख्यत्वे पूर्व किनारा आणि काही प्रमाणात पश्चिम किनारा), चारही वर्णांतील भारतीयांच्या अनेक पिढ्यांच्या बहुमोल योगदानामुळे सदर कामगिरी, कोणत्याही सामूहिक अभिनिवेशाशिवाय, शक्य झाली. मानवी इतिहासात ज्या अनेक ठाशीव संस्कृती अस्तित्वात झाल्या (ज्यापैकी बहुतेक सर्व काळाच्या उदरात हळूहळू गडप झाल्या), त्यापैकी आजही पुराव्यांसकट जिवंत असलेल्या संस्कृतीला जगात ‘Indian Civilization' असे संबोधिले जाते (जिला आपण हिंदू संस्कृतीम्हणतो). सदर संस्कृतीचा ठसा युयुत्सु वृत्तीच्या प्राचीन भारतीयांच्या उपरोल्लेखित कामगिरीमुळेआग्नेय आशियात सुदूर, सघन आणि सखोल उमटलेला आहे.



या संदर्भात मजेचा भाग असा की
, भारतीयांच्या सदर कामगिरीचीनोंद ज्या युरोपियन देशांवर आपण वसाहतवादीम्हणून दातओठ खाऊन असतो, त्यांच्याच अभ्यासकांनी (विशेषत: डच आणि फ्रेंच) सखोल संशोधनांती, अगदी तपशीलवार घेतली आहे. किंबहुना, उपलब्ध भारतीय ऐतिहासिक साधनांमध्ये तशी नोंद फारशी आढळत नाही. त्याची अनेक कारणे संभवतात - एक तर उपरोल्लेखित योगदानहे अनेक प्रांतातील लोकांचे म्हणजेच अनेक विविध राजवटींच्या प्रजाननांकडून (प्रसंगी एकमेकांचे प्रतिस्पर्धी किंवा शत्रूही असलेल्या) सलग तरीही अवाढव्य कालखंडात घडलेले असल्यामुळे त्याची एकच एक प्रमाणित नोंद असणे शक्य नाही. दुसरे म्हणजे, काळाच्या ओघात इतिहासकारांनी ज्या काही नोंदी केल्या असतील, त्या कदाचित नालंदासारख्या आपल्या प्राचीन विद्यापीठांचा इस्लामी आक्रमकांच्या टोळधाडीत जो काही अपूर्व विध्वंस झाला, त्यात नष्ट झाल्या असतील.



अजून एक कारण असे की
, आजच्या प्रस्थापित पद्धतीप्रमाणे इतिहासलेखन करणे ही भारतीयप्रकृती अजिबात नव्हती; अनेक ऐतिहासिक गोष्टी (पुराणकथांच्या धर्तीवर) काव्यात्मक पद्धतीने नोंदवलेल्या असायच्या; ज्यापैकी काही सदर संदर्भात तुरळक स्वरुपात आजही आढळतात. म्हणूनच कदाचित रामायण आणि महाभारतासारख्या प्राचीन काळाचा वेध घेणार्‍या आणि ऐतिहासिक तथ्यांचा समावेश असलेल्या ग्रंथांना पाश्चात्य चष्म्यातून महाकाव्यठरवले गेले असेल (ज्याची रीओढण्याचे काम आपल्या गेल्या अनेक पिढ्यांनी इमानेइतबारे, प्रश्न विचारण्याची चूकन करता, केले).



आजच्या भारतीयांपैकी फार मोठ्या जनसमूहाला तर त्यांच्या पूर्वजांच्या या पराक्रमी इतिहासाची गंधवार्ताही नाही. ज्यांना ती आहे
, त्यांच्याकडे अशा प्रकारच्या प्राचीन संबंधांकडे पाहण्यासाठी आवश्यक असलेला भावनिक ओलावा फारसा जाणवत नाही; चिकित्सा तर खूप दूरची गोष्ट झाली. कधी कुठे चर्चेमध्ये सदर विषय आला, तर जसे कीर्तनात एखाद्या पुराणकथेचे निरुपण चालले असताना आपण त्यात रमतो, गुंगून जातो, त्या काळाचे चित्र थोडेफार डोळ्यांसमोर आणण्याचा प्रयत्न करतो आणि अशा प्रकारे त्याचा रसास्वाद घेऊन झाला की (कार्यक्रम आटोपल्यानंतर) आपण ते सर्व विसरून आपापल्या नेहमीच्या उद्योगाला लागतो, असेच अनुभवास येते. तसेच काहीसे एकूणच भारतीय मनाचे आग्नेय आशियाशी असलेल्या धर्म-संस्कृतीविषयक अनुबंधांच्या संदर्भात झाले आहे. त्यावर काय करता येऊ शकते, किंबहुना काय करण्याची आवश्यकता आहे, आणि मुळातच सदर विषयाची व्याप्ती किती इ. प्रश्नांची उत्तरे आपण या लेखाच्या उत्तरार्धात शोधणार आहोत.

- पुलिंद सामंत

(लेखक हे आंतरराष्ट्रीय संबंधांचे अभ्यासक असून सध्या मुंबई विद्यापीठाशी संलग्न अभ्यास केंद्रात पीएच.डी संशोधनात कार्यरत आहेत.)

@@AUTHORINFO_V1@@