‘कोरोना’विरोधात लढणाऱ्या ७१४ पोलिसांना कोरोनाची लागण

09 May 2020 13:05:20

police_1  H x W



महाराष्ट्रात पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर


मुंबई : देशभरात कोरोना विरुद्ध एक महायुद्ध सुरु असून हे युद्ध जिंकण्यासाठी कोविड योद्धा रात्रंदिवस झटत आहेत. यात सर्वाधिक कोरोना बाधित संख्या असलेल्या महाराष्ट्र राज्यात कोरोनाशी लढा देणाऱ्या आणि नागरिकांसाठी रात्रंदिवस तैनात असलेल्या ७१४ पोलिसांना कोरोनाची लागण झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. महाराष्ट्र पोलिस विभागाने याबाबत माहिती दिली आहे. यातील ६४८ पोलिसांवर सध्या उपचार सुरु असून ६१ जण बरे झाले आहेत. तर ५ पोलिसांचा दुर्दैव मृत्यू झाल्याचे सांगण्यात येत आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता जनतेची सेवा करणाऱ्या पोलिसांच्या सुरक्षेचा प्रश्न मात्र ऐरणीवर आला आहे.


लॉकडाऊनमुळे पोलिस तैनात असलेल्या भागात परिस्थिती आवरण्यासाठी गेलेल्या १९४ पोलिसांना आतापर्यंत मारहाण झाल्याचे देखील महाराष्ट्र पोलिसांनी सांगितले आहे. यासंदर्भात ६८९ जणांना अटक करण्यात आली आहे. कोरोनामुळे राज्यातील स्थिती हाताबाहेर जाऊ नये यासाठी हे कोरोना योद्धा सर्वोतोपरी प्रयत्न करत आहेत. बऱ्याच ठिकाणी पोलिस जनजागृती करत सोप्या पद्धतीने लोकांना सोशल डिस्टंसिंगचे महत्व पटवत आहेत. तसेच गोरगरिबांना अन्न-पाणी देऊन माणुसकीचे एक उदाहरण ही लोकांसमोर ठेवत आहे.


सद्य स्थितीत महाराष्ट्रात १९०६३ कोरोनाग्रस्त असून, गेल्या २४ तासांत या आजारामुळे ३७ जणांना आपला जीव गमवावा लागला, तर कोविड-१९ मुळे एकूण मृत्यूंची संख्या ७३१ झाली आहे. यामध्ये एक समाधानकारक बाब म्हणजे आतापर्यंत एकूण ३४७० लोक बरे झाले आहेत.
Powered By Sangraha 9.0