चाचण्या आणि सुविधांचा पर्याय

    दिनांक  08-May-2020 23:19:46
|
sion hospital_1 &nbs
 


दररोज किमान १५ हजारांपेक्षा अधिक चाचण्या जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत कोरोनावर नियंत्रण मिळवता येणार नाही. तसेच वॉर्डावॉर्डात कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसणार्‍यांची तपासणी करण्यासाठी व त्यांच्यावरील उपचारासाठी वेगळ्या सुविधा उभ्या करायला हव्यात.
 
 

‘मुंबईतील शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील कोरोनाबाधितांवर मृतदेहाशेजारीच उपचार’ या संदेशाखाली एक चित्रफित समाजमाध्यमांवर व्हायरल झाली आणि एकच खळबळ उडाली. तथापि, टिळक रुग्णालयातून समोर आलेली चित्रफित व त्यात दिसत असलेले दृश्य अतिशय दुःखद आणि दुर्दैवीच म्हटले पाहिजे. कारण, प्रेताशेजारी झोपणे वा झोपवणे ही कोरोनाने आधीच धास्तावलेल्या रोग्यावर मानसिक आघात करणारीच घटना! तसेच ती चित्रफित ज्या पद्धतीने आणि ज्या वेगाने सर्वत्र पसरली, त्याचा जो बभ्रा झाला, तोदेखील एक मानसिक धक्काच होता व आहे. परंतु, कोरोनासारख्या भीषण संकटामुळे उद्भवलेली परिस्थितीच अशी आहे की, आपण किंवा कोणीही झाल्या प्रकाराबद्दल राजकारण करणे उचित होणार नाही. परंतु, अशा क्लेशकारक परिस्थितीचा विचार करता प्रशासनाला नम्र सूचना व सल्ला दिल्याविना पुढे जाता येणार नाही, हेही समजून घ्यायला हवे.
 
 
कोरोनाची साथ उद्भवल्यापासून देशातील, राज्यातील आणि आपल्या मुंबईतीलही वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर्स, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, वॉर्ड बॉय असा रुग्णालयातील प्रत्येकजण अफाट काम करतो आहे, याबद्दल कसलीही शंका नाही. कोरोनाचा प्रसार रोखण्यात आणि सर्वत्र भीती पसरवण्याचा प्रकार सुरु असताना रुग्णालये ज्या धैर्याने आलेल्या संकटाचा सामना करत आहेत, ती नक्कीच विशेष घटना. तरीही असा प्रकार होत असेल तर तो टाळण्यासाठी प्रयत्न व्हायला हवेत. प्रथमतः सर्वच रुग्णालयात पुरेसे मनुष्यबळ आहे का, स्वच्छता कर्मचारी, सफाई कामगार किंवा प्रेते उचलण्याची कामे करणारे कर्मचारी पुरेसे आहेत का, की त्यांचा तुटवडा आहे, हे तपासायला हवे. ते पुरेसे नसतील, तर अशा वाईट काळातही सहकार्यासाठी तयार असलेल्या स्वयंसेवी संस्थांना कोरोनाविरोधातील लढ्यात सामील करुन घेतले पाहिजे.
 
 
अशा संस्थांच्या कार्यकर्त्यांना ‘पीपीई किट’ देऊन आणि किमान आरोग्याची देखभाल करणारे निवासी केंद्र उपलब्ध करुन दिले तरी चालू शकते. रुग्णालयातील प्रेते उचलणे किंवा त्यांची रवानगी शवागारात करणे, रुग्णालयात व रुग्णालय परिसरात स्वच्छता राखणे, अशी कामे त्यांना सांगता येतील. माणुसकी व उभे ठाकलेले संकट पाहता, लोकदेखील तसे करायला मागेपुढे पाहणार नाहीत. ही वस्तुस्थिती किंवा भारतीयांची मदतीसाठी हात पुढे करण्याची मानसिकता लक्षात घेतली पाहिजे, जेणेकरुन आपण सर्वच कोरोनावर मात करु शकू.
 
 
शीव येथील लोकमान्य टिळक रुग्णालयातील वस्तुस्थिती संबंधित चित्रीकरणातून सर्वांसमोर आली. परंतु, केईएम, नायर, कस्तुरबा, कूपर किंवा आणखी एखाद्या रुग्णालयातील परिस्थितीही उघड झालेली नसली तरी ती कमी-अधिक प्रमाणात टिळक रुग्णालयासमानच आहे. आता या सगळ्यावर मात करण्यासाठी दोनच पर्याय सध्यातरी दोनच पर्याय दिसतात, जे व्यवहार्य ठरु शकतात. गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर कोरोनाचा विळखा अधिकाधिक घट्ट होताना दिसत आहे. झोपडपट्ट्यांची संख्या अधिक असलेल्या परिसरात कोरोना संसर्गाचे प्रमाण अधिक आहे आणि त्याचा दाखला धारावी, वडाळा या भागातील झोपडपट्ट्यांकडे पाहिल्यावर मिळतो. मुंबईतील कोरोनाबाधितांची एकूण संख्या १२ हजारांच्या उंबरठ्यावर पोहोचली आहे, तर मृतांची संख्या 450च्या जवळपास! शहरात दररोज ६०० ते ७००च्या घरात कोरोनाग्रस्त सापडत आहेत आणि हा आकडा तत्काळ कमी होईल, अशी कोणतीही चिन्हे सध्यातरी दिसत नाहीयेत.
 
 
अशा परिस्थितीत कोरोना संशयितांच्या, रुग्णांच्या निकट सहवासितांच्या चाचण्यांची संख्या वाढवली पाहिजे. कारण, दररोज किमान १५ हजारांपेक्षा अधिक चाचण्या जोपर्यंत होत नाहीत, तोपर्यंत या सगळ्यावर नियंत्रण मिळवता येणार नाही. तसेच वॉर्डावॉर्डात कोरोनाची प्राथमिक लक्षणे दिसणार्‍यांची तपासणी करण्यासाठी व त्यांच्यावरील उपचारासाठी वेगळ्या सुविधा उभ्या करायला हव्यात. सारखा वाढत जाणारा आकडा पाहता किमान ४० ते ५० हजार लोकांवर उपचार करता येईल, अशाप्रकाची व्यवस्था तयार केली पाहिजे. खासगी रुग्णालये आणि वैद्यकीय महाविद्यालये तथा त्यांच्या रुग्णालयांनी कोरोनाविरोधातील आघाडीत अजूनही थेट सहभाग घेतलेला नाही. अशा सर्वांना १०० ते २०० खाटांचे रुग्णालय तत्काळ उभारण्याची सक्ती किंवा सूचना केली पाहिजे. सोबतच अशा सुविधा उभारण्यासाठी अर्थसाहाय्यदेखील केले पाहिजे. चाचण्यांची संख्या वाढवणे आणि संशयितांसाठी व्यवस्थांची उभारणी, हे दोनच पर्याय सध्या आपल्यापुढे आहेत. असे केल्यास कोरोनाप्रसार आटोक्यात येण्यास नक्कीच मदत होईल.
 
 
दरम्यान, मुंबईसारख्या शहरात वरील दोन पर्यायांसह इतरही काही पर्यायांची अंमलबजावणी सरकारी व प्रशासकीय पातळीवर करता येऊ शकते. इथे अनेक इमारती मोकळ्या आहेत, त्यांचा उपयोग कोरोना संशयितांना-रुग्णांना आयसोलेशन, क्वारंटाईन किंवा अ‍ॅडमिट करण्यासाठी करता येऊ शकतो. तसेच हॉल, कार्यालये, शाळा, महाविद्यालयांच्या इमारती, खोल्या तात्पुरत्या स्वरुपात आपल्या ताब्यात घेऊन त्या ठिकाणांचा वापरही अशा प्रकारे करता येऊ शकतो. सोबतच मानवी शरीर कोरोना विषाणूशी लढा देऊ शकेल, अशा प्रतिकारशक्ती वाढवण्यार्‍या पदार्थांचे वाटप करणे शक्य होईल का, याचा विचारही सरकारी पातळीवर व्हायला हवा.
 
 
आयुष मंत्रालयाने सांगितलेला काढा, क जीवनसत्त्व असलेली फळे व पदार्थांचे व्यापक स्तरावर म्हणजे वॉर्डावॉर्डात सुरक्षेची काळजी घेऊन वाटप अशाप्रकारचे पर्यायही वापरता येतील का, हे तपासायला हवे. कोरोनावर विजय मिळवणे, ही आपल्या सर्वांची आताच्या घडीची प्राधान्याची बाब राहिली पाहिजे. म्हणूनच जे जे करता येणे शक्य आहे, ते ते केले पाहिजे. तसेच टिळक रुग्णालयात जो प्रकार घडला त्यावरुन गदारोळ उडवण्यापेक्षा तसे होऊ नये, म्हणून काय करता येईल, हे सरकारपुढे, प्रशासनापुढे, जनतेपुढे मांडण्याची आपलीही जबाबदारी आहे, हे समजून वागले पाहिजे. तसे झाल्यास आपण कोरोनाला आळा घालण्यात नक्कीच यशस्वी होऊ, असे वाटते.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.