बोरिवली नॅशनल पार्कवर कोरोनाचे सावट; डॅम पाडा सील

08 May 2020 11:52:02
national park _1 &nb

 

 
उद्यान प्रशासन सर्तक
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - बोरिवलीच्या 'संजय गांधी राष्ट्रीय उद्याना'तील डॅम पाडा मुंबई महानगर पालिकेकडून सील करण्यात आला आहे. दोन दिवसांपूर्वी या पाड्यात राहणाऱ्या एका वनकर्मचाऱ्याचा परळच्या केईएम रुग्णालयात मृत्यू झाला. त्याची मृत्यूनंतर करण्यात आलेली कोरोना चाचणी पाॅझिटीव्ह आली. त्यामुळे त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांना होम क्वारंटाइन करुन हा पाडा सील करण्यात आला आहे.
 
 
 
 
मुंबईत पसरणाऱ्या कोरोना संक्रमणाचे लोण बोरिवलीच्या नॅशनल पार्कपर्यंत पोहोचले आहे. येथील डॅम पाड्यामध्ये राहणाऱ्या एका वनकर्मचाऱ्याला (सुरक्षा रक्षक) १० एप्रिल रोजी मेंदूतील रक्तस्त्रावामुळे नायर रुग्णालयात भरती करण्यात आले होते. त्यानंतर त्यांना परळच्या केईएम रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी त्यांची दोन वेळा कोरोना चाचणी करण्यात आली. मात्र, या चाचण्यांचा अहवाल निगेटिव्ह आल्याची माहिती उद्यानातील एका वनाधिकाऱ्याने 'मुंबई तरुण भारत'शी (महा MTB) बोलताना दिली. दोन दिवसांपू्र्वी या व्यक्तीचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर रुग्णालय प्रशासनाने केलेली त्याची कोरोना चाचणी पाॅझिटिव्ह आली.
 
 
 
 
या व्यक्तीला डब्बा देण्याच्या निमित्ताने आणि रात्रभर त्याच्या सोबत राहण्यासाठी डॅम पाड्यातील त्यांचे कुटुंबीयांचे रुग्णालयामध्ये जाणे-येणे होते. त्यामुळे अशा पाच व्यक्तींना पाड्यामध्येच होम क्वारंटाइन करण्यात आले असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. तसेत त्यांची कोरोना चाचणीही करण्यात येणार आहे. महापालिका प्रशासनाने डॅम पाडा सील केला असून वन विभागाचे कर्मचारी सर्तकता बाळगून असल्याची माहिती अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक, वन्यजीव (पश्चिम) सुनील लिमये यांनी दिली. हा व्यक्तीला रुग्णालयामध्येच कोरोनाची लागण झाल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
 
 
 
 
Powered By Sangraha 9.0