बिबट्या विहिरीत पडला; लाॅकडाऊनमुळे कोणी नाही पाहिला

07 May 2020 16:15:30

tiger_1  H x W:

 

पाण्यात बुडून बिबट्याचा मृत्यू 

 
 
मुंबई (प्रतिनिधी) - अमरावतीत विहिरीत पडून पाच वर्षीय बिबट्याचा मृत्यू झाल्याची घटना आज उघड झाली. साधारण तीन दिवसांपूर्वी शेतातील विहिरीत पडलेल्या बिबट्यावर लाॅकडाऊनमधील संचारबंदीच्या आदेशामुळे ग्रामस्थांचे लक्ष गेले नाही. परिणामी बिबट्याच्या विहिरीतील पाण्यात बुडून मृत्यू झाला.
 
 
 
 
tiger_1  H x W:
 
 
 
अमरावतीपासून ४० किमी अंतरावरील केकतपूर येथील राखीव जंगलाला लागूनच असलेल्या शेतामधील विहिरीत आज नर बिबट्याचा मृतदेह आढळून आला. तळेगाव ठाकूर गावाजवळील शेतातील विहिरीत हा बिबट्या साधारण तीन दिवसांपूर्वी पडला होता. शेताला लागूनच असलेल्या संरक्षित वनक्षेत्रामधून तो याठिकाणी आला असावा. भक्षाचा पाठलाग करताना बांध नसलेल्या या विहिरीत तो पडल्याची शक्यता अमरावतीचे मानद वन्यजीव रक्षक डाॅ. जयंत वडतकर यांनी वर्तवली. ही विहीर कोणी वापरत नसल्याने आणि संचारबंदीमुळे या परिसरात माणसांचा वावर नव्हता. त्यामुळे विहिरीत पडलेल्या बिबट्यावर कोणाचे लक्ष गेले नाही. त्यामुळे पाण्यात बुडून बिबट्याचा मृत्यू झाला. हा बिबट्या साधारण पाच वर्षांचा असून वन विभागाने दोरीच्या सहाय्याने बिबट्याचा मृतदेह विहिरीबाहेर काढल्याचे वडतकर यांनी सांगितले. या निमित्ताने वन्यजीवांच्या मृत्यूसाठी कारणीभूत ठरणाऱ्या संरक्षित वनक्षेत्राजवळील उघडया विहिरींचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे.
 
Powered By Sangraha 9.0