गोव्यात प्रथमच ब्लॅक पॅंथरचे दर्शन !

07 May 2020 22:57:08
leopard _1  H x

मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी दिली माहिती

 
 
 
मुंबई (प्रतिनिधी) - गोव्यामधून प्रथमच ब्लॅक पॅंथर म्हणजेच काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. येथील नेत्रावली वन्यजीव अभयारण्यातील पतीम वनपरिक्षेत्रात या बिबट्याचे दर्शन घडले. गोव्याचे मुख्यमंत्री डाॅ. प्रमोद सावंत यांनी टि्व्ट करुन याविषयी माहिती दिली.
 
 
 
 
 
 
 
ब्लॅक पॅंथर ही वेगळी प्रजात नाही. रंगपेशीमधील अनुवांशिक बदलामुळे काही बिबट्यांचा रंग काळा होता. त्यांना 'मेलेनिस्टिक लेपर्ड' असे म्हणतात. अशा बिबट्यांचे दर्शन फार दुर्मीळ असते. महाराष्ट्रात देखील हाताच्या बोटावर मोजण्याइतक्याच काळ्या बिबट्यांची नोंद आहे. आता गोव्यातून प्रथमच काळ्या बिबट्याची नोंद करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यामधील नेत्रावली वन्यजीव अभयारण्यात या काळ्या बिबट्याचे दर्शन घडले. अभयारण्यातील पतीम वनपरिक्षेत्रातील कृत्रिम पाणवठ्यावर पाणी पिण्यासाठी हा बिबट्या आला होता. यावेळी पाणवठ्यावर वन विभागाकडून लावण्यात आलेल्या कॅमेरा ट्रॅपमध्ये या बिबट्याची छबी टिपण्यात आली.
 
 
याविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी स्वत: टि्व्ट करुन माहिती दिली. त्यांनी टिव्ट मध्ये म्हटले की, 'गोव्याच्या समुद्ध वन्यजीव जैवविविधतेची एक झलक. नेत्रावली वन्यजीव अभयारण्यातील पतीम वनपरिक्षेत्रात कॅमेरा ट्रॅपमध्ये ब्लॅक पॅंथरचे छायाचित्र कैद झाले आहे'. वन विभागाने सांगितले की, प्रथमच काळ्या बिबट्याचे छायाचित्र कॅमेऱ्यात टिपण्यात आले असून आम्ही याठिकाणी अजून काळे बिबटे आहेत का ? याचा शोध घेत आहोत. काळ्या बिबट्या सापडलेल्या वनपरिक्षेत्रात प्रामुख्याने वाघांचे वास्तव्य आहे.
Powered By Sangraha 9.0