राष्ट्रसेवा परमो धर्मः ।

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    07-May-2020
Total Views |

agralekh_1  H x


कोरोनाविरोधातील देशपातळीवरील प्रयत्नांना हातभारच नव्हे, तर त्यांना बळकट करण्यासाठी स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. कारण, ‘परम वैभवं नेतुमेतत स्वराष्ट्रम्’ हा मंत्र प्रत्यक्षात आणायचा तर देश उभा करावा लागेल. देश उभा करायचा म्हणजे त्यातल्या नागरिकांना उभे करायचे-तेदेखील कोणताही भेदभाव न करता. कारण राष्ट्र एका एका व्यक्तीमुळे आकार घेत असते आणि प्रगतीच्या किंवा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असते.


चीनच्या वुहान शहरामधून इराण, इटली, स्पेन, अमेरिकेसह संपूर्ण जगात थैमान घालणार्‍या कोरोनाने भारतातही प्रवेश केला. मात्र, कोरोनाचे संकट रोखण्यासाठी केंद्र सरकारने तत्परतेने ‘लॉकडाऊन’सारखा पर्याय निवडत मानवी जीव वाचण्याला प्राधान्य दिले. कोरोनासदृश आपत्ती नजीकच्या काळात उद्भवली नव्हती व त्यामुळे त्यावर मात करण्यासाठीचे निर्णय घेण्यात व त्याची अंमलबजावणी करण्यात सरकारी यंत्रणेचा कस लागणार होता. आजही भारतातील कोरोनाबाधितांची संख्या ५० हजारांच्या पुढे गेली असून वैद्यकीय कर्मचारी, डॉक्टर, परिचारिका, स्वच्छता कर्मचारी, पोलीस, प्रशासकीय कर्मचारी-अधिकारी राबत आहेत. कोरोनामुळे फक्त रुग्णसंख्याच वाढत नसून ‘लॉकडाऊन’ मुळे सर्वच प्रकारचे उद्योगधंदे, व्यापार-व्यवसायदेखील ठप्प पडले आहेत. परिणामी, रोजंदारीवर काम करणार्‍यांपासून ते ज्येष्ठ नागरिक, एकटी राहणारी माणसे, दिव्यांग, देहविक्रय करणार्‍या महिला, तृतीयपंथीय, भिक्षेकरी अशा समाजातील आर्थिकदृष्ट्या अक्षम असलेल्यांसमोर दोन वेळचे अन्न न मिळण्यासारखी बिकट परिस्थिती निर्माण झाली. तथापि, अशा सर्वांनाच दिलासा देण्याचे काम सरकारी, प्रशासकीय यंत्रणेकडून सुरू होतेच. परंतु, कोरोनामुळे उद्भवलेल्या अभूतपूर्व काळात केवळ सरकार व प्रशासकीय यंत्रणेवर विसंबून राहून चालणारे नव्हते व नाही. कारण, भारतासारख्या खंडप्राय आणि विशाल लोकसंख्येच्या देशात काम करताना अनेक अडथळे उभे ठाकत असतात. अशा परिस्थितीत समाजातील व्यक्ती वा संघटनांनी पुढाकार घेऊन सरकारच्या खांद्याला खांदा लावून जनसेवाच नव्हे, तर राष्ट्रसेवा करण्याची नितांत आवश्यकता असते. भारतात कोरोनाचा प्रसार सुरू झाल्यापासून असेच काम स्वयंप्रेरणेने व स्वयंप्रज्ञेने राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाच्या स्वयंसेवकांकडून सुरू असून नुकतीच त्यासंबंधीची दि. २ मेपर्यंतची आकडेवारी जारी करण्यात आली.


राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने कोरोना काळातील मदतकार्याला ‘कोविड सेवा’ असे नाव दिले आहे. तद्नुसार देशातील सुमारे ६७ हजार, ३३६ ठिकाणी एकाचवेळी मदतकार्य सुरु असून ३ लाख, ४२ हजार, ३१९ स्वयंसेवक यात कार्यरत आहेत. संकटकाळात सापडलेल्या प्रत्येकाप्रति आपुलकीची व बंधुत्वाची भावना जोपासत संघाकडून शनिवारपर्यंत ५० लाख, ४८ हजार, ८८ कुटुंबांना अन्नधान्याच्या किट्सचे वाटप करण्यात आले. इतक्या मोठ्या प्रमाणावर कुटुंबांपर्यंत अन्नधान्य किट्स पोहोचवण्यातून हे स्पष्ट होते की, नागरी वस्तीसह देशातील सुदुर, दुर्गम प्रदेशातही संघ काम करत आहे. अन्नधान्य किट्सच्या वाटपाबरोबरच तब्बल ३ कोटी, १७ लाख, १२ हजार, ७६१ तयार भोजन पाकिटांचेही वितरण करण्यात आले. तथापि, रा. स्व. संघ किंवा संघस्वयंसेवक केवळ अन्नधान्य व भोजन वाटप करुनच थांबलेले नाहीत. तर गरजवंताच्या उदरनिर्वाहाबरोबरच आरोग्यविषयक सेवाकार्यातही संघाने स्वतःला झोकून दिले. कोरोना विषाणूच्या प्रकोपामुळे निर्माण झालेल्या शारीरिक दुर्बलतेत, जीव वाचण्यासाठी रुग्णाला रक्ताची गरज भासू शकते. तसेच कोरोनाव्यतिरिक्त थॅलेसेमिया, डायलिसिस, कर्करोग आजारांत किंवा अपघाताने जखमी झालेल्या रुग्णालाही रक्त मिळणे आवश्यक असते. परंतु, ‘लॉकडाऊन’ मुळे अनेक ठिकाणची रक्तदान शिबिरे रद्द करण्यात आली किंवा त्यांचे आयोजनच करण्यात आले नाही. परिणामी, देशभरात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला व सरकारसह प्रशासकीय यंत्रणा, रक्तपेढ्यांनी रक्तदानाचे आवाहन केले. संघस्वयंसेवकांनी या आवाहनाला प्रतिसाद देत सुमारे २१ हजार, ४४६ ठिकाणी रक्तदान शिबिरांचे आयोजन करत रक्तदान केले व कोरोनाबरोबरच इतर आजारांनाही आम्ही हरवू, हे दाखवून दिले.



कोरोनापासून बचावासाठी मास्क आणि सॅनिटायझरच्या वापराला अनन्यसाधारण महत्त्व प्राप्त झाले आहे. हीच बाब लक्षात घेऊन स्वयंसेवकांनी ४४ लाख, ५४ हजार, ५५५ मास्कचे वाटप केले आहे. दरम्यान, ५८ हजार, ७३९ ठिकाणी अस्थायी निवास व्यवस्था, ४ लाख, ८९ हजार, ८२४ स्थलांतरित कामगारांची मदत, २१ लाख, २४ हजार, ४०४ आयुर्वेदिक काढ्याचे वाटप, १ लाख, ६१ हजार भटक्या-विमुक्तांना मदत करुन रा. स्व. संघ व संघस्वयंसेवकांनी कोरोनाच्या भीषण आपत्तीत एक आदर्श प्रस्थापित केला. सोबतच रा. स्व. संघ जनकल्याण समितीकडून महाराष्ट्रातील विविध शहरातल्या आरोग्य यंत्रणेच्या बरोबरीनेही काम सुरू आहे. ‘हॉटस्पॉट’च्या भागात घरोघरी जाऊन सर्वेक्षण करून त्या भागात कोरोनासदृश लक्षणे असलेले नागरिक शोधून काढणे, ताप, सर्दी, खोकला आदींचा त्रास जाणवत असेल तर त्यांची त्याच दिवशी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आरोग्य व जनकल्याण समितीच्या वैद्यकीय पथकाच्या माध्यमातून तपासणी करण्याची कामे हाती घेण्यात आली आहेत. सर्वेक्षणात घरोघरी जाऊन त्यांचा संपर्क क्रमांक घेऊन पुढचे १४ दिवस त्या कुटुंबाशी संपर्क साधून त्यांच्या आरोग्यविषयक स्थितीचा पाठपुरावा करण्याचे कामदेखील केले जात आहे. तसेच हे कार्य थांबलेले नाही किंवा थांबणारही नाही, तर जोपर्यंत कोरोनाचे देशातून उच्चाटन होत नाही, तोपर्यंत हे कार्य सुरुच राहणार आहे. कारण हाती घेतलेले कार्य पूर्ण करणे, हा संघ किंवा संघस्वयंसेवकांचा स्वभावच.



दरम्यान, अशा प्रकारचे काम याआधी आपण गुजरातमध्ये आलेल्या भूकंपावेळी, तामिळनाडूला धडक दिलेल्या त्सुनामीवेळी, माळीण दुर्घनटेवेळी आणि अगदी अलीकडे आपल्या महाराष्ट्रात उद्भवलेल्या पूरस्थितीवेळी इतरही अनेक घटनांतून पाहिले होते. या प्रत्येक संकटातून संबंधित ठिकाणचे नागरिक सावरण्यापर्यंत, दैनंदिन जीवनयापन करेपर्यंत संघ स्वयंसेवकांनी मदत केली होती व आता कोरोनावर अंतिम विजय मिळेपर्यंत हे कार्य सुरुच राहील. कोरोनाविरोधातील देशपातळीवरील प्रयत्नांना नुसता हातभारच नव्हे, तर त्यांना बळकट करण्यासाठी स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत. कारण संघाची शिकवण - ‘परम वैभवं नेतुमेतत स्वराष्ट्रम्’ हा मंत्र प्रत्यक्षात आणायचा असेल तर देश उभा करावा लागेल. देश उभा करायचा म्हणजे त्यातल्या नागरिकांना, व्यक्तीला, मनुष्याला उभे करायचे-तेदेखील कोणताही भेदभाव न करता, मनात किन्तु-परंतु न बाळगता. कारण, राष्ट्र एका एका व्यक्तीमुळे आकार घेत असते आणि प्रगतीच्या किंवा विकासाच्या दिशेने वाटचाल करत असते. आपण जिथे राहतो, त्या ठिकाणी जे काही साधन उपलब्ध असेल त्याच्या साहाय्याने इतरांची मदत करणे हा संघ स्वयंसेवकांचा स्थायीभाव झालेला आहे. म्हणूनच कोणत्याही आपत्तीच्या काळात संघस्वयंसेवक मदतकार्यात आघाडीवर असल्याचे व एक राष्ट्रबंधुत्वाच्या नात्याने पीडित नागरिकांची आस्थेने, प्रेमाने काळजी घेत असल्याचे, सर्वतोपरी साहाय्य करत असल्याचे, धीर देत असल्याचे दिसते. संघाला पाण्यात पाहणार्‍यांना यामागची भावना समजणार नाही, पण ‘राष्ट्रसेवा परमो धर्म:’ मानणार्‍या लाखो, कोट्यवधी भारतीयांना त्याची जाणीव आहे आणि तीच संघाचीही शक्ती आहे.

@@AUTHORINFO_V1@@