दिवस त्यांचेही फुलायचे...

    दिनांक  07-May-2020 21:48:23   
|

unicef_1  H x W


संयुक्त राष्ट्र बाल कोषतर्फे यासंबंधी एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यानुसार २०१९साली अंदाजे १.९कोटी बालकांना त्यांच्या स्वत:च्याच देशात विस्थापित व्हावे लागले आहे. जगाच्या आधुनिक इतिहासात हे विस्थापन खूप मोठे आहे. २०१९ साली साधारण ४.६ कोटी लोकांना संघर्ष आणि हिंसेमुळे विस्थापित व्हावे लागले.

‘युरोपल’ ही ‘युनायटेड किंगडम नॅशनल क्राईम एजेन्सी’, ‘स्वीडीश पोलीस ऑथोरिटी’ आणि ‘इंटरनॅशनल जस्टिस मिशन’ यांनी नुकतेच जाहीर केले आहे की, ‘लॉकडाऊन’च्या काळात जगभरात बालकांचे लैंगिक शोषण प्रचंड वाढले आहे. त्यातही प्रसारमाध्यमांचा वापर करून बालकांना यासाठी प्रवृत्त केले जाते. त्यांचे शोषण केले जाते. अर्थात, प्रसारमाध्यमे वापरणारी बालके ही त्यातल्या त्यात चांगल्या घरातली असतील. कारण, लहाणपणीच त्यांना या सगळ्या सुविधा प्राप्त झाल्या. यामुळे एक प्रश्न उपस्थित होतो की, पालकांच्या छत्रछायेखाली, सुरक्षित कुटुंबांमध्ये बालकांच्या लैंगिक आणि इतर शोषणांत वाढ झाली असेल, तर ज्यांना घरच नाही, ज्यांच्याजवळ आईवडील किंवा कुटुंबच नाही, त्या बालकांचे या कोरोना संकटकाळात काय झाले असेल? संयुक्त राष्ट्र बाल कोषतर्फे यासंबंधी एक अहवाल नुकताच प्रकाशित झाला. त्यानुसार २०१९साली अंदाजे १.९कोटी बालकांना त्यांच्या स्वत:च्याच देशात विस्थापित व्हावे लागले आहे. जगाच्या आधुनिक इतिहासात हे विस्थापन खूप मोठे आहे. २०१९ साली साधारण ४.६ कोटी लोकांना संघर्ष आणि हिंसेमुळे विस्थापित व्हावे लागले.
‘सिन्हुआ न्यूज एजन्सी’ या प्रख्यात एजन्सीने संशोधन करून ५ मे रोजी ‘लॉस्ट अ‍ॅट होम‘ नावाचा अहवाल सादर केला. त्या अहवानुसार, १.९ कोटी विस्थापित झालेल्या मुलांबद्दल काही प्रश्न उपस्थित करण्यात आले आहेत. ही मुले पूर, भूकंप, वादळ, युद्ध किंवा अंतर्गत हिंसा, दहशतवाद, गरिबी, सामाजिक परिस्थिती, राजकीय परिस्थिती यामुळे विस्थापित झाली. १.२ कोटी मुलांमध्ये ३८ लाख मुले हिंसा आणि संघर्ष अर्थातच युद्धजन्य परिस्थिती, दहशतवादामुळे आपल्या देशातून विस्थापित झाली, तर ८२ लाख मुले पूर, वादळ आणि इतर नैसर्गिक आपत्तीमुळे विस्थापित झाली. विचार येतो की, विस्थापित होण्यापूर्वी या बालकांची काळजी घेणारे कुटुंब होते. पण, विस्थापनानंतर त्यांचे आयुष्यच बदलले. अचानक आलेल्या विस्थापनाने त्यांचे बालपण एकाएकी हिरावून घेतले; नव्हे त्यांच्या जगण्याचा मार्गच छिन्नविछिन्न केला. ही मुले आज कसेही, कुठेही जीवन जगत आहेत. त्यांना किमान मानवी सुविधाही उपलब्ध नाहीत. आज सगळे जग कोरोनाविरोधात लढत आहे. या काळात बालवयातच मजुरी करणारे, निवाराही उपलब्ध नसणार्‍या या बालकांची स्थिती अत्यंत गंभीर आहे. भूक, कोरोनाचे भय यामुळे या बालकांच्या जीवनावर मोठा आघात झाला आहे. ‘युनिसेफ’च्या कार्यकारी निदेशक हेनरीटा फोरे म्हणतात की, ’‘या बालकांना जगण्यासाठी पूर्वीही संघर्ष करावा लागत होता. पण, त्यावेळी निदान ते नाईलाजाने कामधंदे करून स्वत:चे पोट भरू शकत होते. कुठेही निवास करू शकत होते. आज कोरोना आपत्तीमुळे या मुलांना एकवेळचे अन्नही महाग झाले आहे. जगभरातल्या स्वयंसेवी संस्था आणि त्या त्या देशाच्या सरकारने या मुलांसाठी जरूर काम करावे. यांचे मायबाप व्हावे. ‘युनिसेफ’ने जगाला आवाहन केले आहे की, या मुलांच्या जगण्यासाठी, मदतीसाठी ठोस पाऊल उचलावी, यासाठी आवश्यक ती तरतूद करावी.
‘युनिसेफ’च्या आवाहनानुसार जगाने अशी तरतूद करायलाच हवी. कारण, सध्या जग संकटात असले तरी, जगभराचे चित्र असे आहे की काही विघातक लोक, गट आजही सक्रिय आहेत. सहज हाताशी लागणार्‍या या विस्थापित बालकांचा वापर ते गुन्हेगारीसाठी करतात. हिंसा, शोषण आणि तस्करी यासाठी त्यांचा वापर केला जात आहे. ‘लॉकडाऊनमुळे कुणी बाहेर पडू शकत नाही. कायदा बंदोबस्तात वाढही झाली आहे. अशा परिस्थितीत बालकांचा वापर गुन्हेगारीसाठी केला जात आहे. समजा, बालक पोलिसांच्या तावडीत सापडलेच तरी मुख्य गुन्हेगार नामानिराळा राहतो. दुसरीकडे ‘लॉकडाऊन’च्या काळात कुणीही घरकाम करण्यासाठी उपलब्ध नाही. तर काही गट या विस्थापित निराधार लहान मुलांना घरकामासाठीही विकत आहेत. बहुतेक ठिकाणी या बालकांचे लैंगिक शोषणही होत आहे. अर्थात, ते पूर्वीही व्हायचेच. पण, कोरोनामुळे स्वयंसेवी संस्थांचे काम मंदावले आहे, जगभरात कायदा-सुव्यवस्था कोरोनाविरोधात कामास जुंपली आहे. अशा काळात या पीडित बालकांचा आवाज क्षीण झाला आहे. या बालकांचा विचार करायलाच हवा, कारण त्यांचे हे दिवस फुलायचे आहेत.

आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.