
मुंबई : कोरोना रुग्णांमध्ये सकारात्मकता वाढीस लागावी यासाठी म्युझिक थेरपीचा अवलंब करण्यात येत आहे. कोरोना संसर्ग झालेले रुग्ण मानसिक तणावाखाली असतात. त्यांना ठेवण्यात आलेल्या आयसोलेशन वॉर्डामध्ये कोणतेही मनोरंजनाचे साधन नसल्याने त्यांच्यातील नैराश्य वाढते. ते मानसिकरीत्या खचून जाऊ नये यासाठी रुग्णालय प्रशासन आणि व्हिजन स्मार्ट इंडिया या स्वयंसेवी संस्थेने एकत्र येऊन रुग्णांसाठी मनोरंजनाकरिता म्युझिक थेरपीचा वापर केला आहे. वॉर्डच्या बाहेरून गाणी ऐकवून रुग्णांचे मनोरंजन केले जाते आहे.
म्युझिक थेरपी नेमकी काय ?
कोरोना संसर्गाच्या रुग्णांना ठेवलेल्या वॉर्डमध्ये जोडण्यात आलेल्या स्पिकरच्या माध्यमातून गाणी, म्युझिक ऐकवले जाते आहे. त्याला रुग्णांकडूनही दाद दिली जाते आहे. रुग्णांना एकटेपणा जाणवू नये, त्यांच्यात सकारात्मकतेची भावना निर्माण व्हावी यासाठी रुग्णांची काळजी घेतली जात असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले. सकारात्मकता वाढावी यासाठी रुग्णांचे समुपदेशनही करण्याचे ठरले आहे. समुपदेशन चर्चेने होत असतेच; पण म्युझिक थेरपीचाही वापर केला जात असल्याने रुग्णांचा चांगला प्रतिसाद मिळतो आहे. रुग्णांचे मनोबल वाढवण्यासाठी संस्था व प्रशासनाच्या माध्यमातून अशा प्रकारची संकल्पना सुचली व ती प्रत्यक्षात उतरवली असून त्याला प्रतिसाद मिळतो आहे. संस्थेचे स्वयंसेवक व डॉक्टर, परिचारिकांकडूनही गाणे ऐकवले जाते. म्युझिक थेरपीसोबत पेंटिंग थेरपीचा वापरही केला जाणार आहे. अनेकदा चित्रकलेच्या माध्यमातूनही नैराश्य बाहेर पडते. त्यामुळे या थेरपीचाही वापर करण्यात येणार आहे. रुग्णांच्या आवडीचे खेळही बसल्याजागी उपलब्ध करण्याचा विचार आहे. रुग्णांचे मनोधैर्य वाढेल, ते आनंदित राहतील व एकटेपणा जाणवणार नाही हा उद्देश या थेरपीमागे असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.