भाजपतर्फे कोरोना रुग्णांसाठी ठाण्यात `कमळ कवच'!

06 May 2020 16:24:37
kamal kavach_1  

तीन हजार रुपयांत चाचणी होणार


ठाणे : शहरातील कोरोना रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेऊन, ठाणे शहर भाजपा व वैद्य लॅबच्या वतीने `कमळ कवच' उपक्रमान्वये कोरोना रुग्णांची ३ हजार रुपयांत चाचणी केली जाणार आहे. सध्या अन्य लॅबमध्ये साडेचार हजार रुपयांत चाचणी होत असून, भाजपा व वैद्य लॅबच्या माध्यमातून शहरातील तीन ठिकाणी सवलतीत तपासणी होईल, अशी माहिती आमदार व भाजपाचे शहराध्यक्ष निरंजन वसंत डावखरे यांनी दिली.


ठाणे शहरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यात खाजगी लॅबमध्ये चाचणीसाठी ४ हजार ५०० रुपये आकारले जातात. कोरोना पॉझिटिव्ह झालेल्या रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या व्यक्तींची कोरोना चाचणी करावी लागते. मात्र, सामान्य व मध्यमवर्गीयांना हा खर्च परवडणारा नाही. त्यामुळे ठाणे शहर भाजपाने सवलतीच्या दराने कोरोना चाचणीचा उपक्रम हाती घेतला आहे.


भारतीय आयुर्विज्ञान अनुसंधान परिषदेने (आयसीएमआर) ठाणे शहरातील मिलेनियम स्पेशल लॅब प्रा. लि. च्या वैद्य लॅबला कोरोनाच्या चाचणी घेण्यासाठी परवानगी दिली आहे. भाजपा ठाणे शहर जिल्हा व वैद्य लॅबच्या संयुक्त विद्यमाने ४ हजार ५०० रुपयांऐवजी सवलतीच्या दरात ३ हजार रुपयांमध्ये चाचणी केली जाणार आहे. त्यासाठी डॉक्टरांचे प्रिस्क्रिप्शन व आधार कार्ड आवश्यक आहे. अन्य कोणत्याही अटी ठेवण्यात आलेल्या नाहीत, अशी माहिती आमदार निरंजन डावखरे यांनी दिली.


नौपाडा येथील टेलिफोन एक्सचेंजसमोरील उड्डाणपुलाखाली, वर्तकनगर येथील डॉ. मेधा शहा क्लिनिक आणि सिव्हील हॉस्पीटलच्या आवारातील ट्रॉमा केअर सेंटरमध्ये कियोस्क उभारण्यात आले आहेत. त्याठिकाणी प्रत्येकी दररोज १५० रुग्णांच्या चाचण्या केल्या जातील.
Powered By Sangraha 9.0