मुंबईत कामावर जाणाऱ्यांना कल्याण डोंबिवलीत 'नो एन्ट्री'

05 May 2020 17:50:54
KDMC_1  H x W:
 
 


८ मे पासून हा निर्णय लागू होणार

कल्याण : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केडीएमसी आयुक्तांनी मोठा निर्णय घेतला आहे. मुंबईसह इतर भागात काम करणाऱ्या खासगी आणि शासकीय कर्मचाऱ्यांच्या ये-जा करण्यावर ८ मे पासून बंदी घालण्यात आली आहे. गेल्या काही दिवसांत कल्याण-डोंबिवलीत वास्तव्याला असणाऱ्या आणि मुंबईला कामाला जाणाऱ्या अनेक जणांना कोरोनाची बाधा झाल्याचे दिसून आले आहे. त्या पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महापालिका आयुक्त डॉ. विजय सुर्यवंशी यांनी हा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे.
 
 
 
कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात राहणाऱ्या आणि मुंबईत खासगी-शासकीय कार्यालयात काम करणाऱ्या नागरिकांची मोठी संख्या आहे. कल्याण डोंबिवलीतही कोरोनाच्या रुग्णांची संख्या २२४ झाली आहे. यात मुंबईत अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणाऱ्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची संख्या ७३ असून, या ७३ जणांच्या सहवासात आलेल्या २८ जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामूळे मुंबईत ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या येण्या-जाण्यावर प्रतिबंध घालण्यासह संबंधित कार्यालयांनीच त्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्याची मागणी राजकीय, सामाजिक स्तरातून केली जात होती.
 
 
 
कल्याण डोंबिवली महापालिकेने मुंबईत कामाला असणाऱ्या शासकीय आणि खासगी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या ये जा करण्यास ८ मे पासून मनाई केली आहे. मुंबईत शासकीय आणि खासगी रुग्णालयात काम करणाऱ्या आणि मुंबई महापालिकेच्या कर्मचाऱ्यांची व्यवस्था मुंबई महापालिकेमार्फत संबंधित कर्मचाऱ्यांच्या कार्यालयाजवळील हॉटेलमध्ये केली जाणार आहे. तर मुंबईतील बँका, खासगी कंपनी आणि इतर आस्थापनांमध्ये काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी मुंबईत राहण्याची आपापली व्यवस्था स्वतःच करण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रातून मुंबईला कामानिमित्त ये-जा करणाऱ्या अधिकारी कर्मचाऱ्यांनी आपली सर्व माहिती ई मेलद्वारे केडीएमसीला देण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Powered By Sangraha 9.0