असे झाल्यास उत्तमच!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    04-May-2020
Total Views |

2032_1  H x W:
 
 
 

जगभरात कोरोनाचा प्रादुर्भाव सुरुच असल्याने जुलै महिन्यात होणारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धा पुढील वर्षी आयोजित करण्याचा निर्णय जागतिक ऑलिम्पिक समितीने घेतला. ऑलिम्पिक आता या वर्षी होणार नसल्याने अनेक अ‍ॅथलिट्सची निराशा झाली. गेल्या चार वर्षांपासून आतुरतेने वाट पाहिली जाणारी स्पर्धा तातडीने पुढील वर्षी ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला. ज्या स्पर्धेच्या तयारीसाठी वर्षानुवर्षे जीवापाड मेहनत घेतली जाते, ती स्पर्धा पुढील वर्षी ढकलण्यात आल्याने जगभरातील अनेक खेळाडूंमध्ये नाराजीचे वातावरण आहे. मात्र, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने घेतलेल्या निर्णयानंतर भारतातील खेळाडूंमध्ये काहीसे आनंदाचे वातावरण आहे. याचे कारणही तसेच आहे. भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनचे अध्यक्ष नरिंदर बत्रा यांनी २०२६ आणि २०३२च्या ऑलिम्पिक स्पर्धेच्या आयोजनासाठी भारत उत्सुक असल्याचे सूतोवाच केले. बत्रा यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली की, “१० वर्षांपूर्वी राष्ट्रकुल क्रीडास्पर्धेचे यशस्वी आयोजन केल्यानंतर आम्ही त्यातून बरेच काही शिकलो आहोत. कॉमनवेल्थ स्पर्धाही आमच्या धर्तीवर यशस्वीरित्या आयोजित केली गेली. त्यामुळे २०२६ युवा ऑलिम्पिक, तसेच २०३२च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी आम्ही उत्सुक आहोत,” असे ते म्हणाले. २०३२च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी उत्सुक असल्याचे पत्र भारतीय ऑलिम्पिक असोसिएशनने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीकडे (आयओसी) पाठवले आहे. २०३२च्या ऑलिम्पिक आयोजनासाठी भारतासह ऑस्ट्रेलिया, चीन, थायलंड, रशिया, कोलंबिया या देशांशी कडवी टक्कर द्यावी लागणार आहे. ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन आपल्या धर्तीवर झाल्यास ही सर्व भारतीयांसाठी आनंदाचीच बाब असेल. चीन, रशिया, अमेरिका, जपान, ब्रिटन, स्पेन यांसारख्या बड्या देशांच्या यादीत भारताचा समावेश होईल. ऑलिम्पिकसारख्या बड्या स्पर्धांचे आयोजन केल्यानंतर भारताला यातून मोठा नफाही कमावता येणार आहे. जो देश ऑलिम्पिक स्पर्धेचे आयोजन करतो त्या देशातील अनेक खेळाडूंना विविध स्पर्धांमध्ये भाग घेण्याची संधी मिळते. म्हणूनच ऑलिम्पिक स्पर्धा आपल्या देशात आयोजित होणे ही फारच महत्त्वाची बाब आहे, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही.
 
 
 
 

शेपूट वाकडेच!

 
 
 
 
 
‘कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच’ ही म्हण पाकिस्तानचा माजी जलदगती गोलंदाज शोएब अख्तरला तंतोतंत लागू होते, असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. याला कारणही तसेच आहे. संपूर्ण जग सध्या कोरोना संकटाविरोधात तोंड देत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी जगभरातील अनेक देशांनी विविध प्रकारच्या क्रीडा स्पर्धांना स्थगिती दिली आहे. मात्र, अशाही परिस्थितीत पाकिस्तानच्या या गोलंदाजाला भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका खेळविण्याचे शहाणपण सुचले होते. कोरोना संसर्गाची कसलीही तमा न बाळगता या क्रिकेटपटूने भारत-पाकिस्तान मालिका खेळविण्याबाबत भाष्य केले. पैशांपुढे माणूस आंधळा होतो, पैशांशिवाय त्याला इतर काहीच दिसत नाही, असे नेहमी म्हटले जाते. अख्तरच्या बाबतीतही असेच काहीसे झाले आहे. भारत-पाकिस्तान मालिका खेळविण्यामागे पैसा हेच एक कारण आहे. या दोन्ही देशांत झालेल्या करारानुसार दहा वर्षांच्या कालावधीत दोन्ही देशांनी मिळून एकूण चार मालिका खेळविणे बंधनकारक होते. २०१२ साली भारताने ही मालिका आपल्या देशात आयोजित केली. ही मालिका आपल्या देशात आयोजित करत भारताने नफा कमावला. मात्र, दहशतवादाच्या मुद्द्यावरून पाकिस्तानसोबत क्रिकेट खेळण्यास नकार देत भारताने शत्रू राष्ट्राचे बारा वाजले. पाकला आपल्या धर्तीवर मालिका आयोजित करता आली नाही. परिणामी यातून होणार्‍या नफ्यासही मुकावे लागले. नफा मिळत नसल्याने पाकिस्तानचे क्रिकेट बोर्ड डबघाईला आले असून पुन्हा वारंवार भारत-पाक मालिका खेळविण्याची इच्छा बोलून दाखवत आहे. अख्तरसारखे खेळाडू याबाबत आपले मत व्यक्त करतात. मात्र, यामागील ‘बोलविता धनी’ कोणी वेगळाच आहे, हे सांगण्याची गरज नाही. माजी क्रिकेटपटू असणारा व्यक्ती पंतप्रधानपदी विराजमान झाल्यानंतरही भारत-पाकिस्तान यांच्यात क्रिकेट मालिका आयोजित होत नाही, असा शिक्का आता माथ्यावर बसू लागल्यानंतर अख्तरसारख्या माजी खेळाडूंच्या खांद्यावर बंदूक ठेवून निशाणा साधला जात आहे. अख्तरने तेव्हा मालिकेविषयी भाष्य केले होते. मात्र, आता थेट भारतीय संघाच्या गोलंदाजीचा प्रशिक्षक होण्याची इच्छाच त्याने बोलून दाखविली आहे. भारत त्याची ही इच्छा पूर्ण करणारच नाही. मात्र, अख्तरपेक्षाही अनेक गुणवान गोलंदाज भारतात आहे. ही यादी इतकी मोठी आहे की, पाकिस्तानच्या बोर्डापेक्षाही आर्थिकदृष्ट्या सक्षम असे खेळाडून भारतात आहेत. अख्तरला जशास तसे प्रत्युत्तर देणारे आणि विश्वचषक विजेते कर्णधार कपिल देव यांच्यासारखे रथी-महारथी असताना अयशस्वी कारकिर्द ठरलेल्या शत्रुराष्ट्राच्या जलदगती गोलंदाजाचे येथे काय काम? त्यामुळे अख्तरने स्वप्नरंजन सोडावे आणि पाकिस्तानी संघालाच प्रशिक्षित करण्यावर भर द्यावा.
 
- रामचंद्र नाईक
@@AUTHORINFO_V1@@