३ वर्षांच्या चिमुरड्यासह गर्भवतीची कळवा ते कल्याण पायपीट

    दिनांक  31-May-2020 20:06:21
|

kalyan_1  H x W

कल्याण
: आठ महिन्यांच्या गर्भवती असणाऱ्या कल्याणमधील एका महिलेला ३ वर्षांच्या चिमुरड्यासह कळवा ते कल्याण हे अंतर रेल्वे ट्रॅकवरून पायपीट करीत यावे लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. सरकारी रुग्णालयातील अजब कारभारामुळे पायपीट करण्याची वेळ या गर्भवती महिलेवर आल्याने सरकारी आरोग्य यंत्रणेतील सावाळा गोधंळ कधी सुरळीत होणार असा प्रश्न उपस्थित राहत आहे.
कल्याणातील कचोरे परिसरातील रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणारी शबा शेख नावाची आठ महिन्यांची गर्भवती महिला प्रसूतीसाठी सुरुवातीला कल्याण डोंबिवली महापालिकेच्या रुख्मिणीबाई रुग्णालयात गेली होती. मात्र प्रसूती काळात काही आपात्कालीन परिस्थिती उद्भवल्यास त्याला तोंड देण्यायोग्य सुविधा नसल्याने तिला कळव्याच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात जाण्यास सांगण्यात आले. त्यानुसार रुख्मिणीबाई रुग्णालयाने रुग्णवाहिकेद्वारे तिला कळवा रुग्णालयात नेण्यात आले. त्याठिकाणी प्राथमिक तपासणीसाठी तीला एक दिवस रुग्णालयातच ठेवण्यात आले.प्रस्तुतीसाठी वेळ असल्याने दुसऱ्या दिवशी तीला परत जाण्याचा सल्ला देत सकाळी रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला. तसेच अशा परिस्थितीत आपण परत कसे जाणार आपल्यासाठी रुग्णवाहिका किंवा वाहनाची व्यवस्था करण्याची मागणी या महिलेने केली. मात्र रुग्णवाहिका उपलब्ध नसल्याचे रुग्णालयाकडून सांगण्यात आले. त्यावर या महिलेने तिकडे उपस्थित पोलिसांनाही मदतीसाठी विनवणी केली परंतु त्यांच्याकडूनही कोणताच प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे अखेर नाईलजास्तव या गर्भवती महिलेने रेल्वे ट्रॅकवरून चालत कल्याणला येण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार आपल्या ३ वर्षांच्या चिमुरड्याला घेऊन या महिलेने कळवा ते कल्याण हे अंतर अवघडलेल्या स्थितीत चालत पार केले. कोरोना महामारीत महिला वर्ग आणि इतर रुग्णांची हेळसांड सुरूच असून या हृदयद्रावक प्रकारामुळे शासनाच्या आरोग्य यंत्रणेतील भोंगळ कारभाराला कोण अंकुश लावणार असा सवाल यानिमित्ताने उभा राहिला आहे. तसेच कामात निष्काळजीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी यानिमित्ताने जोर धरु पाहत आहे. दरम्यान कल्याणमधील डॉ आहिरे यांनी मोफत उपचार करून या महिलेची प्रसूती केली. त्यामुळे सर्वच स्तरातून डॉक्टरांचे कौतुक केले जात आहे.
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.