राज्यात पेट्रोल आणि डीझेलचे दर वाढले!

    दिनांक  31-May-2020 15:11:06
|
Petrol disel_1  
महसूलवाढीसाठी राज्य सरकारचा निर्णय; प्रत्येकी २ रुपयांनी वाढणार दर!


मुंबई : लॉकडाऊन झाल्याने महसुलाअभावी निर्माण झालेली आर्थिक पोकळी भरून काढण्यासाठी राज्य सरकारने आता पेट्रोल-डिझेलचे दर दोन रुपयांनी वाढविण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या सोमवारपासून म्हणजेच १ जूनपासून राज्यात सर्वत्र पेट्रोल व डिझेल दोन रुपयांनी महाग होणार आहे.


मुंबईत पेट्रोलचे दर ७६.३१ रुपयांवरुन ७८.३१ रुपयांवर जाणार आहेत. तर मुंबईतील डिझेल प्रतिलिटर दोन रुपयांनी वाढून ६८.२१ रुपयांवर जाणार आहे. पेट्रोलवरील २६% आणि डिझेलवरील २४% ‘व्हॅट’शिवाय राज्य सरकार इंधनांवर उपकर आकारते. सरकारने शनिवारी पेट्रोलवरील उपकर ८.१२ रुपयांवरुन १०.१२ रुपये प्रतिलिटरपर्यंत वाढवण्याची अधिसूचना जारी केली. तर डिझेलवरील उपकर प्रतिलिटर एकऐवजी तीन रुपयापर्यंत वाढणार आहे.


देशभरात २५ मार्चपासून टाळेबंदीची अंमलबजावणी सुरू झाली. लॉकडाऊनमुळे सुरुवातीला जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक वगळता खासगी वाहनांना परवानगी नव्हती. हळूहळू खासगी वाहनांना सशर्त संमती देण्यात आली. आता प्रतिबंधित क्षेत्र वगळता इतर भागात शिथिलता देण्यात येणार आल्याने खासगी वाहनांची सशर्त वाहतूक पुन्हा सुरु होईल. उद्योग-व्यवसाय, वाहतूक सर्वच आर्थिक व्यवहारांना त्यामुळे फटका बसल्याने राज्याच्या तिजोरीत पडणारा महसूल आटला. यामुळे राज्याचे उत्पन्न वाढवण्यासाठीच्या उपाययोजनांची गरज निर्माण झाली होती. वस्तू व सेवा करामुळे राज्य सरकारच्या हातात करवाढीसाठी फारसे उपाय उरलेले नाहीत. त्यामुळे वित्तविभागाने हा निर्णय घेतला.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.