महाराष्ट्रात शॉपिंग मॉल, हॉटेल्स, धार्मिक स्थळे बंदच राहणार!

    दिनांक  31-May-2020 18:14:06
|

lockdown 5_1  H‘लॉकडाऊन ५’ची नवीन नियमावली राज्य सरकारकडून जारी!


मुंबई : मागील दोन महिन्यांपासून देशात लॉकडाउन होता. यात अनेक गोष्टींवर निर्बंध होते. पण, आता केंद्र सरकारने काल अनलॉकच्या दिशेने पहिले पाऊल उचलले. केंद्रीय गृहमंत्रालयाकडून काल लॉकडाउन-५, अनलॉक-१ बाबत नियमावली जाहीर करण्यात आली. त्यानुसार ८ जूनपासून धार्मिकस्थळे, हॉटेल्स, मॉल सुरू करण्याची परवानगी देण्यात आली आहे. यातच आज महाराष्ट्र सरकारनेही लॉकडाउन-५ बाबत आपली नियमावली जारी केली. यात केंद्राने सवलती दिलेल्या काही गोष्टींवर राज्यात अद्याप बंदी कामय राहणार आहे.


राज्य सरकार कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करत आहे. येत्या काळात कोरोनाची परिस्थिती अधिक गंभीर होणार असल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केले होते. परंतु या परिस्थितीला सामोरे जाण्यासाठी राज्य सरकारने आतापासून तयारी सुरु केली असल्याचे ही सांगण्यात आले आहे. मुंबई महापालिकेसह मुंबई महानगर परिसरातील इतर महापालिका, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, मालेगाव, नाशिक, धुळे, जळगाव, अकोला, अमरावती आणि नागपूर याही महापालिका क्षेत्रांमध्ये अनेक गोष्टी आता टप्प्या-टप्प्याने सुरू केल्या जाणार आहेत.पहिला टप्पा : हा टप्पा ३ जूनपासून सुरू होणार आहे.
◆ सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, चालणे यासाठी आता कोणतेही निर्बंध नसणार. सकाळी ५ ते सायंकाळी ७ बीच, सरकारी-खासगी मैदाने, सोसायट्यांचे मैदाने, गार्डन अशा ठिकाणी आता आरोग्याच्या दृष्टीने व्यायामासाठी सायकलिंग, जॉगिंग, रनिंग, वॉक यांना परवानगी असणार. याच काळात करता येणार. समूहाने कोणतीच कृती करता येणार नाही.
◆ प्लंबर, इलेक्ट्रिशयन, पेस्ट-कंट्रोल आणि टेक्निशियन्स यांना सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पालन करून काम सुरू करता येणार.
◆ गॅरेजेस सुरू करता येणार मात्र गाडी दुरूस्त करणाऱ्याला आधी त्यासाठी पूर्वसूचना द्यावी लागेल.
◆अत्यावश्यक सेवेमध्ये येणारी सरकारी कार्यालये वगळून इतर सरकारी कार्यालयांमध्ये १५ टक्के किंवा कमीतकमी १५ कर्मचाऱ्यांवर काम सुरू करता येणार.


दुसरा टप्पा : हा टप्पा ५ जूनपासून सुरू होणार आहे. त्यात दुकानांना परवानगी दिली आहे.
◆ ५ जूनपासून सर्व दुकाने सुरू करण्यास परवानगी असेल. मात्र, मार्केट कॉम्प्लेक्स आणि मॉल्स यांना परवानगी नाही, परंतु यासाठी नियम असेल तो म्हणजे पी१ आणि पी२ असा. म्हणजेच रस्त्याच्या / लेनच्या किंवा पॅसेजच्या एका बाजूची दुकाने एका दिवशी सुरू असतील तर दुसऱ्या बाजूची दुकाने दुसऱ्या दिवशी सुरू असतील. फक्त सकाळी ९ ते सायंकाळी ५ याच काळात दुकाने सुरू ठेवता येतील.
◆ कपड्यांच्या दुकानातील ट्रायल रूम वापरण्याची परवानगी नाही. कोणतेही कपडे एक्स्चेंज किंवा रिटर्न करू देण्याचीही परवानगी नाही. लोकांनी दुकानांवर किंवा मार्केटमध्ये जाताना पायी किंवा सायकलवर जावे.
◆ अत्यावश्यक नसलेल्या वस्तूंसाठी दूरचा प्रवास करण्यास परवानगी नसेल. यासाठी वाहनही वापरता येणार नाही.
◆ एखाद्या मार्केटमध्ये सोशल डिस्टंन्सिंगचा वापर केला जात नसल्याचे आढळल्यास, ते मार्केट तत्काळ बंद करण्याचे अधिकार संबंधित अधिकाऱ्यांकडे असतील.
◆ टॅक्सी, कॅब आणि रिक्षा यांनाही ५ जूनपासून परवानगी असणार. मात्र त्यासाठी १+२ अशा संख्येचे बंधन आहे. चार चाकी वाहनांसाठीही हाच नियम असणार मात्र दुचाकीवरून एकाच व्यक्तिला प्रवास करता येणार.


तिसरा टप्पा : हा टप्पा ८ जूनपासून सुरू होणार आहे. त्यात खासगी कार्यालयांना काही अंशी परवानगी दिली आहे.
◆ खासगी कार्यालयांना ८ जूनपासून काम सुरू करण्यास परवानगी देण्यात येणार आहे. मात्र कामाच्या ठिकाणी फक्त १० टक्के कर्मचाऱ्यांना काम करू देण्यास परवानगी असेल. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होम करावे लागेल. जे कर्मचारी ऑफिसमध्ये येतील त्यांनी सॅनेटायझेशनची सर्व खबरदारी घेणे आवश्यक आहे.


आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.