यंदा पावसाळ्यात मुंबईच्या किनाऱ्यांवर वाहून येणाऱ्या कासवांवर ऐरोलीत उपचार

30 May 2020 16:12:16

turtle _1  H x
 
 
 

'कांदळवन कक्षा'कडून जखमी सागरी जीवांसाठी 'किनारी व सागरी जैवविविधता केंद्रा'त प्राथमिक उपचार केंद्र

 
 
 
 
मुंबई (अक्षय मांडवकर) - पावसाळ्यात मुंबईच्या समुद्र किनाऱ्यांवर जखमी अवस्थेत वाहून येणाऱ्या सागरी कासव आणि जीवांवर यंदा ऐरोलीतील 'किनारी व सागरी जैवविविधता केंद्रा'त उपचार करण्यात येणार आहेत. राज्याच्या 'कांदळवन कक्षा'ने (मॅंग्रोव्ह सेल) या केंद्रात त्यासंबंधीच्या सुविधांचे नियोजन केले आहे. हा प्रयोग प्राथमिक स्तरावर करण्यात येणार असला तरी, वन विभागाकडून मुंबईत प्रथमच अशा प्रकारे सागरी जीवांच्या उपचाराकरिता केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
 
 

turtle _1  H x
 
 
 
पावसाळ्यात खवळलेल्या समुद्रामुळे अशक्त किंवा जखमी अवस्थेतील सागरी जीव किनाऱ्यांवर वाहून येतात. मुंबईच्या किनाऱ्यांवर दरवर्षी पावसाळ्यात जखमी समुद्री कासवे किंवा सागरी जीव वाहून आलेले आढळतात. यामध्ये सागरी कासवांची संख्या सर्वाधिक असते. अशा जखमी कासवांवर प्राणिप्रेमी संघटना वन विभागाच्या परवानगीने बऱ्याचदा खासगी पशुवैद्यकांकडून उपचार करुन घेतात. तसेच प्रकरण गंभीर असल्यास त्यांना डहाणूतील समुद्री कासव सुश्रृषा केंद्रात पाठविण्यात येते. मात्र, यंदाच्या मान्सूनमध्ये मुंबईच्या किनाऱ्यांवर वाहून येणाऱ्या जखमी कासवांवर ऐरोलीतील किनारा आणि सागरी जैवविविधता केंद्रात उपचार करण्याचा निर्णय कांदळवन कक्षाने घेतला आहे.
 
 

turtle _1  H x  
 
 
ऐरोलीतील केेंद्रामध्ये क्लाऊन फिशचे उबवणी केंद्र असल्याने याठिकाणी मोठे टॅंक, जलशुद्धीकरण यंत्रणा आणि स्वतंत्र कक्षही आहे. शिवाय उबवणी केंद्रासाठी उरणवरुन खास पाणीही आणले जाते. त्यामुळे यंदा पावसाळ्यात मुंबईतील समुद्र किनाऱ्यावर वाहून येणाऱ्या यंदा जखमी कासवांवर ऐरोलीतील केंद्रात प्राथमिक उपचार करण्याची परवानगी अधिकाऱ्यांना दिल्याची माहिती कांदळवन कक्षाचे अप्पर प्रधान मुख्य वनसंरक्षक विरेन्द्र तिवारी यांनी दिली. याठिकाणी कासवांवर उपचार करण्यासाठी पशुवैद्यकांना मानद स्वरुपात बोलावण्यात येईल, असे त्यांनी सांगितले. मुंबईत समुद्री जीवांवर उपचार करण्यासाठीचे केंद्र वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर उभारण्याचा 'कांदळवन कक्षा'चा मानस होता. परंतु, जागेच्या मालकीबाबत तांत्रिक अडचणीमुळे याठिकाणी उपचार केंद्र उभारण्यात येणार नाही.
Powered By Sangraha 9.0