ऑनलाईन शिक्षण - स्वरुप आणि संधी

    दिनांक  30-May-2020 23:20:30
|

online classes_1 &nb
कोरोना आणि ‘लॉकडाऊन’चा उद्योगधंद्यांइतकाच फटका बसला तो शिक्षणक्षेत्रालाही. अभ्यासक्रम रखडला, परीक्षा बुडाल्या आणि विद्यार्थ्यांचे शैक्षणिक वर्षही धोक्यात आले. त्यानंतर ऑनलाईन शिक्षणाची पूर्वीही चर्चेत असलेली प्रणाली एकाएकी केंद्रस्थानी आली. ‘युजीसी’नेही यासंबंधी मार्गदर्शक नियमावली जाहीर केली. तेव्हा, एकूणच या ऑनलाईन शिक्षण प्रणालीचे बदलते स्वरुप, त्यातील समस्या आणि संधींचा ऊहापोह करणारा हा लेख..


सध्या जगभरातील जवळपास सगळ्याच गोष्टी कोरोनाला घेऊन निर्धारित होत आहेत. अख्ख जग हे कोरोनामय झाले आहे. गेल्या शैक्षणिक वर्षाचा उत्तरार्ध हा कोरोनामुळे पूर्णतः प्रभावित झाला आणि त्याचा परिणाम विद्यार्थी, शिक्षक, शिक्षण संस्था, पालक अशा या सगळ्या स्तरांवर झालेला दिसून आला. आगामी काही दिवसांमध्ये कदाचित या कोरोना संकटापासून आपली मुक्तता होईलही किंवा परिस्थितीत थोडी सुधारणा होईल. पण, या काळामध्ये शिक्षणक्षेत्रात जे काही चांगले बदल झाले, त्यापैकी एक महत्त्वाचा बदल म्हणजे ऑनलाईन शिक्षण. विद्यार्थी आणि अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन शिक्षण सुरु झाले. या संदर्भातच ‘विद्यापीठ अनुदान आयोग’ म्हणजेच ‘युजीसी’ने काही नवीन दिशानिर्देशसुद्धा येणार्‍या शैक्षणिक वर्षासाठी जारी केले आहेत. त्यानुसार कोरोना संकट संपल्यानंतरही नवीन शैक्षणिक वर्षापासून किमान २५टक्के अभ्यासक्रम ऑनलाईन शिकवावा लागेल. याव्यतिरिक्त सर्व विद्यापीठांना त्यांचे स्वतःचे मोबाईल अ‍ॅप्स तयार करावे लागतील, जेणेकरून त्या माध्यमातून विद्यार्थ्यांना अभ्यासाची आवश्यक साधने उपलब्ध होतील.
आगामी शैक्षणिक वर्ष २०२१मध्ये नेमकी अध्यापन पद्धती कशी असेल, याबाबत सध्या काहीसे चिंतेचे वातावरण आहे. अशा परिस्थितीमध्ये ‘युजीसी’ने विद्यापीठांना आणि महाविद्यालयांना ऑनलाईन शिक्षण सुरु करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच किमान एकूण अभ्यासक्रमाच्या ३० ते ५० टक्के अभ्यासक्रम हा सुट्टीच्या किंवा ‘लॉकडाऊन’च्या काळात पूर्ण करण्याचे दिशानिर्देश दिले आहेत. या संदर्भात ‘युजीसी’ने एक समिती नेमली होती आणि या समितीनेच जुलै महिन्यामध्ये परीक्षा सुरु करण्याचा आणि ऑगस्टपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरु करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. या व्यतिरिक्त अनेक महत्त्वपूर्ण शिफारसी या समितीने केल्या आहेत. नवीन शैक्षणिक वर्षामध्ये ‘युजीसी’च्या तज्ज्ञांच्या समितीने ऑनलाईन शिक्षणाला जास्त महत्त्व दिले आहे आणि त्यासाठी सर्व महाविद्यालयांना आठवड्यातून सहा दिवस ‘व्हर्च्युअल क्लासरूम’ तयार करण्यासाठी सांगितले आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमाचे वेळापत्रक आता महाविद्यालयांना तयार करावे लागेल. या ‘व्हर्च्युअल’ अभ्यासक्रमामध्ये आपोआपच सुरक्षित सामाजिक अंतराची अंमलबजावणीसुद्धा होईल आणि महाविद्यालयांनी केलेल्या कार्याचा व्हिडिओरुपी दस्तावेज तयार करून आणि तो डिजिटल माध्यमातून पोहोचविण्यात यावा, असे ‘युजीसी’ने सूचित केले आहे.
‘युजीसी’च्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांमध्ये ऑनलाईन शिक्षणप्रणालीवर अधिकाधिक भर देण्यात आला असला, तरी ग्रामीण भागातील अनेक महाविद्यालयांमध्ये इंटरनेट कनेक्शन नसल्यामुळे तेथील विद्यार्थ्यांची अडचण होऊ शकते. मात्र, आता बर्‍याचशा महाविद्यालयांनी या दिशेने वेगाने कामही सुरु केलेले दिसते. समितीच्या सूचनेनुसार विद्यापीठे आणि उच्च शैक्षणिक संस्थांमध्ये शिक्षण देणार्‍या संस्थांमधील सर्व शिक्षकांच्या ऑनलाईन शिक्षणासंदर्भात प्रशिक्षणावरही भर देण्यात आला आहे. त्याअंतर्गत सर्व विद्यापीठांना एक वेगळा कार्यक्रम राबविण्यास सूचित केले गेले आहे. तसेच विद्यापीठांना असे ऑनलाईन कोर्सेस तयार करण्याचे आणि निवडण्याचा सल्लादेखील देण्यात आला आहे. येणार्‍या काही दिवसांमध्ये ऑनलाईन अभ्यासक्रमांची सरासरीदेखील वाढेल, असा प्रस्ताव समितीने केला आहे. ऑनलाईन अभ्यासक्रमांच्या आपल्या सूचनेमध्ये पायाभूत सुविधा निर्माण करण्यावर ‘युजीसी’ने भर दिला आहे जेणेकरून आगामी काळात जेव्हा अशाप्रकारच्या कोणत्याही समस्येला तोंड द्यावे लागले, तर अभ्यासक्रमात खंड पडणार नाही आणि तो व्यवस्थित पूर्ण करता येईल. या पार्श्वभूमीवर प्रत्येक विद्यापीठात एक स्वतंत्र सेल तयार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, ज्याच्यासोबत आयटी व्यावसायिक देखील जोडलेले असतील. ‘युजीसी’ अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, कोरोना संकटकाळात ऑनलाईन अभ्यासक्रमांना सामोरे जाण्यासाठी पूर्ण ताकदीने पाठपुरावा केला गेला. कोरोनामुळे अभ्यासक्रमांवर जो काही परिणाम झाला होता, त्यासाठी अधिक ऑनलाईन वर्ग आयोजित करण्याचेदेखील सुचवले गेले.
खरे पाहता, ‘युजीसी’ने आधीपासूनच ऑनलाईन शिक्षण प्रणालीचा पाठपुरावा केला आहे. त्यासंदर्भात आपल्याला युट्युबवरसुद्धा व्हिडिओ दिसतील, ज्यामध्ये विविध विषयांवरील व्याख्यानांचा समावेश आहे. ती डाऊनलोड करता येतील, अशी अध्ययन सामग्री देखील उपलब्ध आहे. विशिष्ट कोर्सेसच्या अनुषंगाने प्रश्नोत्तराच्या माध्यमातून व्हिडिओ, स्वयंमूल्यांकनाच्या परीक्षादेखील ऑनलाईन उपलब्ध आहेत. काही शंकांचे निरसन करण्यासाठी ऑनलाईन चर्चा घेतील, अशी व्यासपीठेदेखील ऑनलाईन उपलब्ध आहेत. ‘युजीसी’चे देखील ’स्वयं’ या नावाचे असेच एक व्यासपीठ उपलब्ध आहे. ’स्वयं शिक्षित भारत, उन्नत भारत’ अशी त्याची टॅगलाईन आहे. मल्टिमीडियाचा वापर करून शैक्षणिक क्षेत्राला पूरक ठरतील, असे नवनवीन शैक्षणिक प्रयोग करावेत, असा ‘युजीसी’चा आग्रह आधीपासून राहिलेला आहे. यासाठी वेगवेगळे समन्यवक देखील नेमण्यात आले होते. काही शैक्षणिक संस्थांनी त्याची अंमलबजावणीसुद्धा केली आहे आणि केंद्रीय मनुष्यबळ विभागाच्या सहकार्याने ‘युजीसी’ने असे काही अभ्यासक्रम सुरु केले आहेत. त्याचबरोबर भारतीय तांत्रिक शैक्षणिक परिषद यांनी सुद्धा मायक्रोसॉफ्टच्या मदतीने काही अभ्यासक्रम सुरु केले होते. जवजवळ दोन हजार असे वेगवेगळे अभ्यासक्रम आणि ऐंशी हजारांपेक्षा जास्त तासांचे ऑनलाईन शिक्षण उपलब्ध आहे. पदव्युत्तर शिक्षण, अभियांत्रिकी शिक्षण, कायद्याचे शिक्षण आणि काही व्यावसायिक अभ्यासक्रम यांचा यामध्ये समावेश होतो. त्याचबरोबर कौशल्य विकासासाठी सुद्धा काही अभ्यासक्रम हे देखील ‘युजीसी’ने याआधी दिले होते. मात्र, सध्याच्या स्थितीमध्ये महाविद्यालयांनी पारंपरिक शैक्षणिक व्यवस्थेचा पुरस्कार केल्यामुळे बर्‍याच ठिकाणी या गोष्टी उपेक्षित आहेत. त्याचबरोबर महाविद्यालयात शिकवणारे अनेक शिक्षक ज्यांनी वयाची पन्नाशी ओलांडली आहे, त्यांची या नवतंत्रज्ञानासोबत जुळवून घेण्याची फारशी तयारी दिसत नाही. त्यामुळे सद्यस्थिती थोडीशी निराशाजनक म्हणता येईल. या संदर्भात खूप मोठे प्रयत्न केले जाण्याची आवश्यकता आहे. सगळ्याच शिक्षकांचे यासंदर्भातील प्रशिक्षण हा या योजनेतील महत्त्वाचा भाग आहे.
‘लॉकडाऊन’मध्ये झालेला बदल
‘लॉकडाऊन’मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर वेगवेगळ्या शैक्षणिक संस्थांनी वेबिनार, ऑनलाईन कोर्सेस, ऑनलाईन अभ्यासक्रमांची उपलब्धता याद्वारे विद्यार्थ्यांना त्याचे प्रमाणपत्रदेखील मिळू शकते. यातील काही कोर्सेस विनामूल्य आहेत, तर काहींसाठी माफक फी आकारणी केली जाते. या ‘लॉकडाऊन’मध्ये खूप मोठ्या प्रमाणावर प्रमाणावर इंटरनेट साक्षरता, मोबाईल साक्षरता आणि ऑनलाईन शिक्षणासंदर्भात साक्षरता निर्माण झाली, असे म्हणता येऊ शकते. या प्रयत्नांना चालना देऊन, यात गती निर्माण करण्याची गरज आहे. भविष्यातील योजनेचा विचार केला असता, भारतामध्ये दूरसंचार क्षेत्रात झालेल्या क्रांतीचा आपल्याला लाभ करून घ्यावा लागेल. त्यातही मोबाईल तंत्रज्ञान आणि मोबाईलचा डेटा हा स्वस्त झाल्यामुळे भारतातल्या अनेक खेड्यापाड्यात मोबाईल-इंटरनेट पोहोचला आहे आणि बरेच जण त्याचा उपभोग घेतात. केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून, तसेच वैयक्तिक पातळीवर शिक्षक आणि विद्यार्थ्यांकडून ही नवीन शिक्षणप्रणाली स्वीकारण्यासाठी आता प्रयत्न करण्याची खरी गरज आहे. ऑनलाईन शिक्षण प्रणाली या सर्वांनी दिलेल्या प्रतिसादावरच अवलंबून राहील, यात शंका नाही. मात्र, त्यामध्ये काही महत्त्वाच्या गोष्टी आपल्याला लक्षात घ्याव्या लागतील. त्या पुढीलप्रमाणे- तंत्रज्ञानाच्या वापराशी संबंधित काही धोरणे, काही नीती आणि व्यावहारिक पावले उचलण्यासाठी पुढील काही विषयांचा समावेश आपल्याला करणे आवश्यक ठरेल.
१ . वेगवेगळ्या माध्यमातून अध्यापनाला सुरुवात
२ . शैक्षणिक रेडिओ
३ . वेबवर आधारित माहिती
४ . संशोधनासाठी विशिष्ट वेब ग्रंथालय म्हणचेच लायब्ररी
५ . विज्ञान आणि तंत्रज्ञानातील व्यावहारिक क्रियांचा समावेश
६ . वेगवेगळ्या माध्यमांचा एकत्रित वापर
वरील उपाययोजना केल्यानंतर खूप कमी काळामध्ये चांगला शैक्षणिक विकास होऊ शकतो. त्याचप्रमाणे जास्तीत जास्त लोकसंख्येची घनता असलेल्या ठिकाणी देखील शैक्षणिक आशय पोहोचविता येईल. प्रौढ साक्षरतेमध्ये देखील आपोआपच बदल होईल. महिला शिक्षणामध्ये देखील वाढ होईल आणि तंत्रज्ञानाचा व्यापक वापर केला जाईल. यासाठी चांगले अध्यापक तयार करणे आवश्यक आहे.म्हणूनच सध्याच्या प्रचलित अशा विद्यापीठ शिक्षण आणि महाविद्यालयीन शिक्षण प्रणालीमध्ये बदल करण्याची गरज आहे. हे बदल पुढीलप्रमाणे असावेत-
१ . सगळ्या शिक्षकांना तंत्रज्ञानाचे शिक्षण अनिवार्य करावे.
२ . डेटा व्यवस्थापन आणि त्यासाठीची वेगळी सोय
३ . अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर
४ . तंत्रज्ञानाशी संबंधित वेगवेगळ्या क्षेत्रात प्रत्येक विद्यापीठात संशोधन केंद्र
५ . सातत्याने प्रशिक्षण सामग्री खरेदी करण्यावर आणि वाढविण्यावर भर
६ . ऑडिओ व्हिज्युअल आणि डिजिटल उत्पादने
७ . वेगवेगळ्या माध्यमांचा आणि साधनांचा शिक्षकांकडून आणि विद्यार्थ्यांकडून होणारा वापर
८ . शैक्षणिक वेबसाईट (ती सातत्याने अपडेट होणे आवश्यक आहे.)
वरील सर्व गोष्टींचा विचार केला असता, माहिती आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्राशी संबंधित शिक्षण आणि शिकवण्याच्या साधनांचा सुयोग्य वापर होऊ शकतो. ही माहिती-तंत्रज्ञानाची साधने हे विश्लेषणात्मक साधनांना प्रेरणा देतात. विद्यार्थ्यांना देखील त्यांचे प्रश्न विचारण्यासाठी किंवा त्यांना प्रश्न निर्माण होण्यासाठी मदत होते.
उपलब्ध माहितीचे विश्लेषण हे नवनवीन पद्धतीने करता येते आणि नवीन माहिती तयार करण्यासाठी हे एक नवीन व्यासपीठ तयार होते. हे सगळं करताना विद्यार्थी आपोआप बर्‍याच गोष्टी शिकत असतात. जसे विद्यार्थी वास्तविक समस्यांपासून शिकतात, त्याचप्रकारे त्यांना या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून, या सगळ्या गोष्टींची सांगड आपण घालून देऊ शकतो. त्या वेळेवर शिकण्याची संधी मिळते. शिकण्याचे एकूण तास वाढतात. तसेच वेगवेगळे पर्याय निवडता येतात.माहिती आणि तंत्रज्ञान संबंधित जो अभ्यासक्रम असतो, त्यामध्ये विद्यार्थी, शिक्षक, तज्ज्ञ यांच्यात संवाद आणि सहकार्य निर्माण होते आणि एकमेकांना प्रोत्साहित करण्यासाठी मदत होते.विद्यार्थ्यांना वेगवेगळ्या संस्कृतीमधील लोकांसोबत काम करण्याची संधी मिळते, ज्याला खर्‍या अर्थाने आपण ‘जागतिकीकरण’ म्हणतो. त्यामुळे संवादाची क्षमता आणि आपली संघटनेची क्षमता किंवा एखाद्या गटाची क्षमताही वाढते आणि आपोआपच जागरूकता वाढण्यासाठी प्रेरक ठरते. एकप्रकारचे आजीवन शिक्षण घेण्याचे ‘मॉडेल’ तयार होते आणि ज्ञानाची व्याप्ती मोठ्या प्रमाणात विस्तृत होते.
खूप मोठ्या अशा 33 विद्यापीठांमध्ये दरवर्षी लाखो विद्यार्थी नोंदणी करतात आणि यापैकी कोट्यवधी लोकांना सेवा दिली जाते. अमेरिकेमधील जवळपास साडेतीन हजार महाविद्यालये ही विद्यापीठांमधून एक कोटी चाळीस लाख विद्यार्थी अशा प्रकारचे तंत्रज्ञानाद्वारे दूरस्थ शिक्षण घेतात. आता जेव्हा पोहोच वाढत चालली आहे, तेव्हा भारतासारख्या देशामध्ये सुद्धा अशा प्रकारचे प्रयोग होण्यास काहीच हरकत नाही. त्यामुळे भविष्यकाळात कोरोना किंवा अशा प्रकारची परिस्थिती निर्माण झाली तरी शिक्षणक्षेत्रावर त्याचा विपरीत परिणाम होणार नाही, हे निश्चित.
प्रा. गजेंद्र देवडा
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.