मोदी सरकार – २ : दलितांसाठी भरीव कामगिरी- रामदास आठवले

30 May 2020 18:08:11

RA_1  H x W: 0

मोदी सरकार – २ : दलितांसाठी भरीव कामगिरी- रामदास आठवले

 

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दुसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या वर्षात दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, शेतकरी, महिला, तरुण यांच्यासह समाजातील सर्व वर्गासाठी भरीव काम झाले आहे. त्याचप्रमाणे कोरोना महारोगावर विजय मिळविण्यासाठीदेखी मोदी सरकार पूर्ण क्षमतेने कार्यरत आहे, असे प्रतिपादन केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री आणि रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे (आठवले गट) राष्ट्रीय अध्यक्ष रामदास आठवले यांनी केले.
 

गेल्या सहा वर्षांत पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने दलित, आदिवासी, अल्पसंख्यांक, शेतकरी, महिला, तरुण यांच्यासह समाजातील सर्व वर्गासाठी भरीव अशी ऐतिहासिक कामगिरी केली आहे. सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास यावर वाटचाल करणारे केंद्र सरकार राष्ट्रीय एकात्मतेसाठी कटीबद्ध आहे. त्यासाठीच कलम ३७० संपुष्टात आणले गेले. मुस्लिम समाजातील महिलांना न्याय देण्यासाठी तिहेरी तलाकबंदीचा कायदा संमत करवून घेतला. त्याचप्रमाणे जनधन योजना, उज्ज्वला योजना, पंतप्रधान आवास योजना, पंतप्रधान किसान सन्मान निधी योजना याद्वारे अंत्योदयाच्या मार्गावर सरकारची वाटचाल सुरू असल्याचे केंद्रीय मंत्री आठवले म्हणाले.

 

कोरोनाविरोधातील लढाईत मोदी सरकार पूर्ण क्षमतेने उतरले आहे, असे आठवले यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, कोरोनाविरोधातील लढ्यात भारतास यश मिळेल यात शंकाच नाही. त्याचप्रमाणे आत्मनिर्भर भारताद्वारे देशाच्या अर्थव्यवस्थेस नवे वळण मिळणार आहे, त्याद्वारे शेतकरी, व्यापारी, तरुण, महिला आदी सर्वांना मोठा लाभ होईल. त्याचप्रमाणे केंद्रीय सामाजिक न्याय मंत्रालयाद्वारे समाजातील दलित, शोषित, आदिवासी आणि दिव्यांगांच्या कल्याण्यासाठी अनेक योजना राबविण्यात येत असल्याचेही आठवले यांनी सांगितले.

Powered By Sangraha 9.0