कल्याण-डोंबिवलीतील कम्युनिटी किचन बंद

    दिनांक  30-May-2020 16:26:54
|
community kitchen _1 

डोंबिवली : कल्याण डोंबिवली महापालिका क्षेत्रात रूग्णांची वाढ होत असतानाच परराज्यातील मजूर आपल्या गावाकडे रवाना झाल्याने महापालिकेने कम्युनिटी किचन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे, असे असले तरी महाराष्ट्रातील मजुरांचे काय असा प्रश्न झोपडपट्ट्यांमधून विचारला जात आहे. तर दुसरीकडे महाराष्ट्राच्या रहिवाशांनी रेशनींगवर धान्य घ्यावे असे महापालिका व्यवस्थापनातर्फे सांगण्यात येत आहे. पंरतु रेशनीगंच्या दुकानांमधूनच अन्न-धान्य मिळत नसल्याची तक्रार हे नागरीक करत असून कम्युनिटी किचन बंद झाल्याने पुन्हा पोटापाण्याचे प्रश्न उद्भवला असल्याचे वस्त्यांमधून दिसून येत आहे. कम्युनिटी किचन सुरुच ठेवण्यात यावे, अशी मागणी रिपब्लिकन पार्टी आँफ इंडियाचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी केली आहे.


कल्याण - डोंबिवली महापालिका क्षेत्रात एकुण ७४ झोपडपटट्या आहे. यामध्ये इंदीरा नगर, ज्योती नगर, समत नगर या झोपडपटट्यांचा समावेश होतो. एकीकडे कल्याण -डोंबिवली महापालिका क्षेत्रात कोरोनाचे दिवसाला ५० रूग्ण आढळून येत आहेत. तर दुसरीकडे संचारबंदीमुळे हातावर पोट असलेल्या नागरिकांचे पोटापाण्याचे हाल होत आहेत. महापालिकेडून गेल्या दोन महिन्यापासून कम्युनिटी किचन सुरू करण्यात आले होते. यामध्ये पुरी -भाजी किंवा खिचडीचे जेवण देण्यात येत असे. या जेवणामुळे आधार मिळत होता असा दावा वस्तीतील नागरिक करत आहेत. दिवसाला १२ ते १३ हजार पाकिटे पुरविली जात असल्याची माहिती महापालिकेची कम्युनिटी किचन उपक्रम सांभाळणाºया सत्यावान उबाळे यांनी दिली. सद्यास्थितीत अनेक परप्रांतीय देखील आपापल्या गावी परतले आहेत.

तसेच जे नागरीक रेशनकार्ड धारक नाहीत त्यांनाही रेशन देण्यात येईल असे सरकारने सांगितल्याने कम्युनिटी किचन बंद करत असल्याचे उबाळे यांनी स्पष्ट केले. मात्र असे असले तरी झोपडपटट्यातील नागरिकांनी रेशनच्या दुकानातच अन्न- धान्याचा पुरवठा होत नसल्याने रेशनींग दुकानात गेल्यानंतर रिकाम्या हाताने परत यावे लागत असल्याचे सांगितले. त्यामुळे एकीकडे मरणाची भिती तर एकीकडे भूकबळीची भिती सतावत असल्याची माहिती कार्यकर्ते किशोर मगरे आणि सचिव दिनेश साळवे यांनी दिली. विशेष म्हणजे रेशनींग दुकानात सद्यास्थितीत केवळ तांदुळ मिळत आहेत.

 
जेवण बनविण्यासाठी गॅस किंवा स्टोवर जेवण बनविण्यासाठी रॉकेल लागते ते रेशनींग दुकानात उपलब्ध नाही. इतकेच नव्हे तर तिखट, मिठाचा खर्चच दिवसाला १०० रुपये असल्याचे विठ्ठल खेडकर, तेजस जोंधळे हे कार्यकर्ते सांगत आहेत. त्यामुळे एक दिवस कोणाकडे हात पसरून मिठ, मसाला विकत घेऊन दोन दिवसाने पुन्हा ये रे माझ्या मागल्या हीच गत होणार आहे. त्यामुळे कम्युनिटी कीचन बंद करू नये अशी मागणी देखील आरपीआयचे डोंबिवली शहर अध्यक्ष अंकुश गायकवाड यांनी केली आहे. इतकेच नव्हे तर कम्युनिटी कीचन बंद करण्याचा निर्णय मागे घेतला नाही तर दोन दिवसात उपोषणाला बसणार असल्याचे त्यांनी सांगितले. पालिकेचे कम्युनिटी किचन समन्वयक सत्यवान उबाळे म्हणाले,की रेशनकार्ड धारक नसाल तरी रेशनींग दुकानात धान्य मिळेल असे नियम प्रशासनाने काढले आहेत. त्यामुळे कम्युनिटी किचन आणि रेशनींग असा दोन्ही खर्चाचा मेळ बसवणे कोरोनाच्या या काळात कठीण होत असल्याने कम्युनिटी कीचन ३१ मे पासून बंद करण्यात येणार आहे.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.