गजानन मेहेंदळे : एक व्यासंगी इतिहास संशोधक

    दिनांक  30-May-2020 22:12:42
|


gajanan mehendale_1 श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ, शिवशंभू विचारदर्शनच्या वतीने ज्येष्ठ इतिहास संशोधक गजानन मेहेंदळे यांचे रविवार, दि. ३१ मे रोजी सायंकाळी ५ वाजता फेसबुक आणि युट्युबवर ‘शिवराज्याभिषेक दिन अर्थात हिंदू साम्राज्य दिन’ या विषयावर लाईव्ह ई-व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे. हे व्याख्यान Facebook आणि YouTube वरुन लाईव्ह पाहाण्यासाठी www.evyakhyanmala.com या वेबसाईटवर क्लिक करा. तेव्हा, या व्याख्यानाच्या निमित्ताने या प्रसिद्धी पराड्.मुख इतिहास संशोधकाचा थोडक्यात परिचय करुन देणारा हा लेख...परिचय


गजाभाऊंचा जन्म दि. १९ डिसेंबर १९४७ रोजी झाला. गजाभाऊंना शालेय जीवनापासूनच इतिहासाची खूप आवडत होती. गजाभाऊंनी १९६९ साली पुण्याच्या ‘भारत इतिहास संशोधक मंडळा’त पाऊल ठेवले आणि अभ्यासाला सुरुवात केली. त्यातूनच पुढे त्यांना युद्धशास्त्राची अधिक आवड निर्माण झाली आणि वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षापासून त्यांनी युद्धशास्त्राचे वाचन आणि अभ्यास सुरू केला.

युद्ध पत्रकार


वयाच्या २४व्या वर्षी ‘तरुण भारत’चे पत्रकार म्हणून त्यांना बांगलादेशात पाठवण्यात आले. युद्ध सुरू होण्याच्या सात-आठ महिने आधीच गजाभाऊ तिथे पोहोचले. त्या वेळी प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले नसले, तरी युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली होती. कारण, ‘बांगलादेश मुक्ती वाहिनी’ने क्रांतीकार्याला सुरुवात केली होती. अशावेळी गजाभाऊंनी बांगलादेशच्या वेगवेगळ्या सीमांमधून आत प्रवेश केला. तिथली सगळी परिस्थिती अनुभवली. अनेक लोकांच्या मुलाखती घेतल्या. पाकिस्तानी सैन्याविरुद्ध बांगलादेशमध्ये असलेला रोष त्यांनी अनुभवला. त्यावर लिहिलेले लेख गजाभाऊ तार करून ‘तरुण भारत’ला पाठवित असत. यानंतर प्रत्यक्ष युद्ध सुरू झाले, तेव्हादेखील गजाभाऊ बांगलादेशातच होते. ‘बांगलादेश मुक्ती वाहिनी’च्या एका गटाबरोबर गजाभाऊ युद्धक्षेत्रात काही काळ वावरले. तिथे तळ ठोकून असलेल्या अनेक भारतीय लष्करी अधिकार्‍यांच्या त्यांनी मुलाखती घेतल्या.


शिवचरित्र अभ्यासाला प्रारंभ


युद्ध संपल्यावर गजाभाऊ दिल्लीमध्ये आले आणि त्यांनी बांगलादेश युद्धावर एक पुस्तक देखील लिहिले. परंतु, ते अप्रकाशित आहे.त्यानंतर शिवाजी महाराजांवर लष्करी दृष्टिकोनातून किंवा त्यांच्या युद्धनेतृत्वाबद्दल पुस्तक लिहावे, असा विचार त्यांच्या मनात आला. गजाभाऊंनी संरक्षण आणि सामरिकशास्त्र विषयात पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर (एम.ए) पदवी घेतली. यावेळी युद्धशास्त्राचा अभ्यास करताना ते शिवाजी महाराजांच्या युद्धशास्त्राकडे वळले. त्यातूनच मग त्यांनी पुढे शिवाजी महाराजांच्या चरित्राचा पूर्ण अभ्यास करण्याचा निर्णय घेतला. यासाठी मग मोडी लिपी बरोबरच फारसी, उर्दू, जर्मन, फ्रेंच, पोर्तुगीज या भाषा ते शिकले. मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी भाषेतील इतिहासाची साधने होतीच. ज्याला या भाषा येतात तोच खोलात जाऊन शिवचरित्राचा अभ्यास करू शकतो. यासाठी मूळ साधने आणि मुघलांची साधने अभ्यासणे आवश्यक होते. या अभ्यासासाठी ते भारतभर फिरले. जिथे जिथे संदर्भ कागदपत्रे होती ती मिळवली. अनेक अभ्यासकांशी चर्चा केली. त्यानंतर त्यांनी शिवचरित्र इंग्रजीतून लिहिले. मग मराठीतूनही लेखन केले. त्यामध्ये १६५८ पर्यंतच्या इतिहासावर २५०० पाने झाली आहेत आणि पुढील लेखन चालू आहे.

‘Shivaji his Life and Times’ हा एक हजार पानांचा इंग्रजी ग्रंथ आणि ‘श्री राजा शिवछत्रपती’ हा अडीच हजार पानांचा मराठी ग्रंथ हे या संशोधनातून साकार झाले आहेत. यामध्ये जवळजवळ सात हजार संदर्भ दिले आहेत. याबरोबरच ‘शिवछत्रपतींचे आरमार’, ‘आदिलशाही फर्माने’ या पुस्तकांचे ते लेखक आहेत. ‘Tipu as he really was’ ही त्यांची इंग्रजी पुस्तिका यापूर्वीच प्रकाशित झाली आहे. भारतात इस्लामिक सत्तेचे पाय पहिल्यांदा रोवल्यापासून पुढे जवळजवळ हजार वर्षे या राजवटींनी येथील प्रजेवर अनन्वित अत्याचार केले. या राजवटींनी अवलंबिलेले धार्मिक धोरण आणि छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्यामुळे झालेला आमुलाग्र बदल हा आगामी काळात प्रकाशित होणार्‍या भारतातील इस्लामी राजवट आणि शिवछत्रपतींचे स्वराज्यया ग्रंथाचा विषय आहे. गजाभाऊंनी एकदा म्हटले होते, “शिवाजी महाराजांना इतिहासातून काढले तर आपला इतिहास कुठे जातो? आणि त्यांचा इतिहासात समावेश केला तर कुठे जातो? हे महत्त्वाचे आहे. इस्लामी जुलमी राजवटींना शिवाजी महाराजांनी रोखले, हे जर कळले तर शिवचरित्र कळले.


पहिल्या आणि दुसर्‍या महायुद्धाचा अभ्यास


गजाभाऊंनी सन २००० ते २०१७ अशी १७ वर्षे पहिले आणि दुसरे महायुद्ध याचा सखोल अभ्यास करून त्यावर सुमारे सहा हजार पानांचे लेखन पूर्ण केले आहे. आगामी काळात त्याचे १० ते १२ खंड प्रसिद्ध होतील. त्यातही गुप्त संदेश उलगडणे आणि त्यांचे वाचन करणे या विषयावर त्यांनी एक पुस्तक लिहिले आहे.

अभ्यासू व्यक्तिमत्त्व


गजाभाऊ भारत इतिहास संशोधक मंडळाचे ज्येष्ठ सभासद आहेत. मागील पन्नास वर्षांत असा दिवस क्वचितच गेला असेल की, गजाभाऊंनी शिवकालीन कागदपत्रे अभ्यासली नाहीत. अभ्यास कसा करावा, ध्येयासक्त होऊन काम कसे करावे, अभ्यासासाठी विविध भाषा शिकल्याने कशी माहिती मिळविता येते, हे त्यांच्याकडून शिकण्यासारखे आहे. आजही गजाभाऊ जर्मन भाषा शिकत आहेत. अतिशय बुद्धिमान आणि दांडगी स्मरणशक्ती असलेल्या गजाभाऊंचा मित्रपरिवारही मोठा आहे. त्यामधील विशेष उल्लेख करावा लागेल पुण्याच्या माजी आणि व्यासंगी खासदार प्रदीपदादा रावत यांचा.

विविध संस्थांचे मार्गदर्शक


भारत इतिहास संशोधक मंडळाबरोबरच भांडारकर संस्था, डेक्कन कॉलेज, श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ या संस्थांशी गजाभाऊ अनेक वर्षे संलग्न आहेत. विशेष म्हणजे, भारत सरकारच्या भारतीय इतिहास अनुसंधान परिषद (आयसीएचआर) या संस्थेमध्ये गजाभाऊंना निमंत्रण देऊन सल्लागार सदस्य केले गेले. महाराष्ट्र शासनाने शिवरायांची जन्मतिथी निश्चित करण्यासाठी केलेल्या समितीत ते होते. काही काळ ‘बालभारती’च्या इतिहास पाठ्यपुस्तक मंडळाचे सल्लागार होते.

सप्रमाण मांडणीची आवश्यकता


आजकाल कोणतेही पुरावे नसताना स्वतःच्या मताप्रमाणे मांडणी करून जातीच्या आधारावर हिंदू धर्मामध्ये फूट पाडण्याचे कारस्थान काही मंडळी करीत आहेत. अशा वेळी गजाभाऊंसारख्या सखोल अभ्यास केलेल्या संशोधकाचे मत समाजासमोर येणे आवश्यक आहे. आज ७४व्या वर्षीदेखील ते दिवसातील १६ तास वाचन आणि लेखन करतात.गजाभाऊ भाषणांऐवजी सदैव ज्ञानसाधनेत रमलेले असतात.

श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळ


श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाची स्थापना लोकमान्य टिळकांनी ३० मे १८९५ रोजी केली. किल्ले रायगडावरील शिवछत्रपतींच्या समाधीचा जीर्णोद्धार, १२५ वर्षे रायगडावर शिवपुण्यतिथी अभिवादन कार्यक्रम, सिंहासनावरील मेघडंबरीच्या स्थापनेसाठी पाठपुरावा, आबालवृद्धांसाठी रोपवेची उभारणी अशी ऐतिहासिक कामे मंडळाने केली आहेत. याशिवाय संशोधनपर साहित्य प्रकाशित करणे, अभ्यासकांसाठी कार्यशाळा घेणे, देशव्यापी शिवचरित्र स्पर्धा आयोजित करणे असे अनेक उपक्रम मंडळ करते. श्री शिवाजी रायगड स्मारक मंडळाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आणि शिवराज्याभिषेक दिन याचे औचित्य साधून मंडळाच्या विनंतीवरून गजाभाऊ आज व्याख्यान देणार आहेत. तरी जगभरातील सर्व शिवप्रेमींनी या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.

 

- सुधीर थोरात

 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.