माणूसपण जगलेला डॉक्टर अभिनेता...

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    30-May-2020
Total Views |


shriram lagoo_1 &nbs

 

 

आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील संवादफेक, उंचेपुरे-देखणे व्यक्तिमत्त्व आणि भूमिकेवरची जबरदस्त पकड असणारे चित्रकर्मी, अभिनयसम्राट तसेच सामाजिक कार्यकर्ते म्हणजेच रंगभूमीवरचे ‘नटसम्राट’ डॉक्टर श्रीराम लागू...
 
 
पुण्यातील ‘फिल्म इन्स्टिट्यूट’च्या सभागृहात दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी अनेक दिग्गज मान्यवर उपस्थित होते. मधुरजी यांचा एका प्रख्यात कलावंताने सन्मान केला.तेव्हा मधुरजी त्या दिग्गज कलावंताचे आशीर्वाद घेण्यासाठी झुकले. तेव्हा ती व्यक्ती म्हणाली, ’‘अहो, मी तुमच्या सिनेमांचा चाहता आहे. माझ्या पाया कशाला पडता? तुम्ही इतक्या सुंदर कलाकृती दिल्या आहेत, त्याबद्दल प्रेक्षक म्हणून आम्हीच तुमचे आभार मानायला हवे.त्या दिग्गज कलावंतांचे हे वाक्य ऐकून मी स्तब्ध झालो. एक इतका मोठा कलावंत असून दुसर्‍या कलाकाराची एवढी कदर करणारा माणूस म्हणून मला त्यांना सलाम करावासा वाटला. या कार्यक्रमास मी उपस्थित असल्याचा आजही मला अभिमान वाटतो. कार्यक्रम संपला आणि मी त्यांचे पाय धरले. त्यांनी डोक्यावर हात ठेवला आणि म्हणाले, ‘’बेटा, लढत राहा.” या मोजक्या शब्दांनी खूप ऊर्जा दिली. आजही त्यांचे हे शब्द माझ्या मनात रुंजी घालतात आणि कुठल्या अवघड संकटक्षणी जगायला नव्याने बळ देतात. असे रोखठोक बोलणारे हे व्यक्तिमत्व म्हणजे रंगकर्मी, चित्रकर्मी, अभिनयसम्राट, सामाजिक कार्यकर्ते म्हणजेच रंगभूमीवरचे ‘नटसम्राट’ डॉक्टर श्रीराम लागू. खरंतर विसाव्या शतकातील मराठी रंगभूमीचे ‘नटसम्राट’ कोण, असा विचार जरी मनात आला, तर डॉ. श्रीराम लागू यांचे नाव सर्वप्रथम डोळ्यांसमोर आल्याशिवाय राहत नाही. अभ्यासू वृत्तीने अनेक पात्रांचे मनोविश्लेषण करून आणि त्यामध्ये आपली प्रतिभा ओतून मराठी रंगभूमीवर त्यांनी सजवलेल्या भूमिका पाहायला मिळणे म्हणजे एक पर्वणीच असायची. वि. वा. शिरवाडकर यांच्या ’नटसम्राट’ नाटकाच्या, गोवा हिंदू असोसिएशनने सादर केलेल्या पहिल्या प्रयोगात मराठी रंगभूमीवर हा बुलंद आवाज दुमदुमला आणि मराठी प्रेक्षक अंतर्बाह्य थरारले! गणपतराव जोशी, नानासाहेब फाटक, केशवराव दाते अशा अनेक नटसम्राटांच्या मांदियाळीत स्वत:चे नाव आपल्या कर्तृत्वाने कोरून एक नवा ’नटसम्राट’ मराठी रंगभूमीवर अवतरला होता. त्याचं नाव होतं डॉ.श्रीराम लागू. या ’तुफाना’नं पुढील पाच दशके मराठी रंगभूमी आपल्या अस्तित्वानं केवळ उजळूनच टाकली असं नाही, तर तिला एक नवी उंची प्राप्त करून दिली.

 


 
श्रीराम बाळकृष्ण लागू हे त्यांचे पूर्ण नाव. त्यांचा जन्म सातारा जिल्ह्यात १६ नोव्हेंबर १९२७ रोजी बाळकृष्ण व सत्यभामा या दाम्पत्याच्या पोटी झाला. पुण्यातील भावे स्कूलमध्ये प्राथमिक शिक्षण घेतलं. महाविद्यालयीन शिक्षण फर्ग्युसन कॉलेजमध्ये झाल्यानंतर त्यांनी डॉक्टर होण्यासाठी पुण्यातील बी. जे. वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश घेतला. महाविद्यालयीन जीवनातही त्यांच्या नाट्यप्रेमाची झलक सहाध्यायींना दिसली होती. कॉलेजमध्ये अनेक नाटकांतून त्यांनी काम केलं. ‘एमबीबीएस’ पदवी मिळविल्यानंतर ‘ईएनटी सर्जन’ म्हणून त्यांनी पुण्यात रितसर प्रॅक्टिस सुरू केली. मात्र, नाट्यप्रेम त्यांना स्वस्थ बसू देत नव्हतं. शिक्षण सुरू असतानाच भालबा केळकर यांच्या ‘प्रोग्रेसिव्ह ड्रॅमॅटिक असोसिएशन’मधून त्यांनी वयाच्या २४व्या वर्षी प्र. के. अत्रे यांच्या ‘उद्याचा संसार’ या नाटकात भूमिका करून रंगभूमीवर पहिले पाऊल टाकले. सतत १२-१३ वर्षे ते भालबांच्या हाताखाली ‘बेबंदशाही’, ‘रथ जगन्नाथाचा’, ‘वेड्याचं घर उन्हात’ अशा अनेक नाटकांत भूमिका करीत राहिले. १९६४ साली विजय तेंडुलकर यांच्या ‘मी जिंकलो, मी हरलो’ या नाटकात त्यांनी भूमिका केली. विजया मेहता यांच्या ‘रंगायन’ या संस्थेने ते नाटक सादर केले होते. त्या संस्थेत दोन वर्षे काम केल्यावर थिएटर युनिटमध्ये त्यांनी आधे अधुरे’ व ‘ययाती’ ही नाटके केली. ‘गिधाडे’ या नाटकाच्या वेळी त्यांची दीपा बसरूर या अभिनेत्रीशी जवळीक निर्माण झाली व २४ जुलै १९७१ रोजी दीपा बसरूर ‘दीपा लागू’ झाल्या. या दोघांनी ‘रूपवेध’ या संस्थेची स्थापना केली व १९७४ ते १९८९ या काळात चार नाटके सादर केली. त्यानंतर त्यांनी १९७४ व १९९५ साली ‘प्रतिमा’ व ‘क्षितिजापर्यंत समुद्र’ ही दोन नाटके रंगमंचावर आणली. पण, हा सारा नाट्यसंसार प्रायोगिक रंगभूमीवरील वाटचालीचा होता. प्रायोगिक रंगभूमीबरोबरच त्यांनी व्यावसायिक रंगभूमीवरही अनेक भूमिका केल्या. ‘इथे ओशाळला मृत्यू’पासून त्याची सुरुवात झाली. त्यांनी १९६९ साली ते नाटक सादर केले. त्यानंतर ‘वेड्याचं घर उन्हात’, ‘गिधाडे’, ‘काचेचा चंद्र’, ‘नटसम्राट’, ‘हिमालयाची सावलीअशा अनेक नाटकांतून भूमिका करून डॉ. लागूंनी मराठी रंगभूमीवर स्वत:चे एक अढळ स्थान निर्माण केले. साठच्या दशकात त्यांचं आयुष्य मेडिकल प्रॅक्टिस आणि आठवड्याच्या अखेरीला नाटकांचे प्रयोग असं धावपळीत सुरू होतं. मधल्या काळात ते उच्च शिक्षणासाठी इंग्लंड आणि कॅनडाला रवाना झाले. त्यानंतर काही काळ ते आफ्रिकेतील टांझानिया या देशातही होते. या सर्व काळात त्यांना मराठी रंगभूमीपासून आपण लांब आहोत, याची खंत जाणवत होती. इंग्लंडमध्ये त्यांनी अनेक नाटकांचे प्रयोग पाहिले. त्यांचं नाट्यविषयक चिंतन सतत सुरूच होतं. अखेरीस टांझानियाच्या ’किलिमांजारो’ या पर्वतावर गिर्यारोहण करायला गेले असताना, त्यांना आपण पूर्णवेळ थिएटरच केलं पाहिजे, असा साक्षात्कार झाला. त्यानंतर ते तडक मुंबईला परतले आणि त्यांनी पूर्णवेळ नाटकाला वाहून घेण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या सुदैवानं त्यांना रामकृष्ण नाईक यांच्या ’दि गोवा हिंदू असोसिएशन’ या संस्थेकडून आमंत्रण आलं. नाटक होतं वि. वा. शिरवाडकर यांनी ’किंग लिअर’ वरून साकारलेलं ’नटसम्राट’! या नाटकातील अप्पासाहेब बेलवलकर ही भूमिका डॉ. लागूंना प्रचंड आव्हानात्मक वाटली. त्यांनी तातडीनं हे नाटक स्वीकारून तालमी सुरू केल्या. मुंबईच्या बिर्ला मातोश्री सभागृहात २३ डिसेंबर १९७० रोजी या नाटकाचा पहिला प्रयोग झाला आणि मराठी रंगभूमीवर खरोखरचा नवा ’नटसम्राट’ अवतरला...
 
’नटसम्राट’ नंतर व्ही. शांताराम यांनी डॉ. लागूंना आपला नवा चित्रपट करण्याची ‘ऑफर’ दिली. हा चित्रपट होता ’पिंजरा.’ हा चित्रपट १९७२ मध्ये प्रदर्शित झाला आणि लागूंची लोकप्रियता प्रचंड वाढली. आपल्या वैशिष्ट्यपूर्ण शैलीतील संवादफेक, उंचेपुरे-देखणे व्यक्तिमत्त्व आणि भूमिकेवरची जबरदस्त पकड यामुळे डॉ. लागू लवकरच महाराष्ट्रातीलच नव्हे, तर देशातील प्रमुख रंगकर्मी ठरले. ’पिंजरा’ पाठोपाठ डॉ. जब्बार पटेल यांच्या ’सामना’ या ऐतिहासिक चित्रपटात ते निळू फुलेंसारख्या जबरदस्त अभिनेत्यासमोर उभे ठाकले आणि हा ’सामना’ भलताच रंगतदार ठरला. ’सामना’पाठोपाठ आलेल्या ’सिंहासन’मध्येही त्यांनी विश्वासराव दाभाडे या मंत्र्यांची भूमिका तडफेनं साकारली. व्ही. शांताराम दिग्दर्शित ‘पिंजरा’ (१९७२) या चित्रपटाद्वारे डॉ. लागू यांनी चित्रपटात पहिले पाऊल टाकले. यात त्यांनी वठवलेली शिक्षक ते तमाशाचा फडावरचा एक उपरा पुरुष ही प्रवाही भूमिका लक्षणीय आहे, याचा प्रत्यय आजच्या चित्रपट रसिकांनाही येतो. ‘पिंजरा’पाठोपाठ ‘सामना’, ‘सिंहासन’, ‘सुगंधी कट्टा’, ‘मुक्ता’, ‘देवकीनंदन गोपाळा’, ‘झाकोळ’, ‘कस्तुरी’, ‘सोबती’, ‘पांढर’, ‘मसाला’ वगैरे चित्रपटांत त्यांनी साकार केलेल्या भूमिका त्यांच्या अभिनयामुळे लक्षात राहिल्या आहेत. अभिनयातील प्रगल्भता, भूमिकेला अभिप्रेत असणारा संयमीपणा, भावप्रकटीकरणातले वैविध्य, संवाद कौशल्य या अभिनयाला अपेक्षित असणार्‍या गोष्टींचा तरतमभाव साधत व्यक्त होणारे त्यांचे पडद्यावरचे रूप प्रेक्षकांना कमालीची मोहिनी घालत असे, याचा प्रत्यय त्यांच्या सर्वच चित्रपटातील सर्वच भूमिका पाहताना आल्यावाचून राहत नाही, हे विशेष. ‘घरोंदा’, ‘किनारा’, ‘इमान धरम’, ‘एक दिन अचानकवगैरे हिंदी चित्रपटातल्या त्यांच्या भूमिका स्मरणीय होत्या. डॉ. लागू यांनी ‘गिधाडे’, ‘नटसम्राट’, ‘किरवंत’ वगैरे काही नाटके दिग्दर्शित केली, तर ‘झाकोळ’ (१९८०) या एकमेव मराठी चित्रपटाचे दिग्दर्शनही केले. १९५१ पासून सुरू झालेल्या नाट्य व चित्रपट कारकिर्दीमध्ये जवळजवळ पन्नास वर्षांत डॉ. लागू यांना अनेक मानसन्मान मिळाले. त्यामध्ये संगीत नाटक अकादमीतर्फे तत्कालीन उपराष्ट्रपती जी. एस. पाठक यांच्या हस्ते १९७४ साली मिळालेल्या पुरस्काराचा आवर्जून उल्लेख केला पाहिजे. त्याखेरीज भारत सरकारतर्फे १९७४ साली ‘पद्मश्री’, महाराष्ट्र शासनातर्फे ‘जीवनगौरव’ पुरस्कार, २००० साली मिळालेला ‘पुण्यभूषण’ पुरस्कार यांचाही उल्लेख करायला हवा. मराठी चित्रपटांसाठी त्यांना ‘सुगंधी कट्टा’, ‘सायना’ व ‘भिंगरी’ या चित्रपटांतील अभिनयासाठी ‘फिल्मफेअर’ पारितोषिकांनी गौरवले होते, तर ‘घरोंदा’ या हिंदी चित्रपटासाठी त्यांना साहाय्यक अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता.
 
अभिनय करता करता त्यांनी विलक्षण सामाजिक भानही जपले. डॉ. नरेंद्र दाभोलकर, डॉ. बाबा आढाव, सदाशिव अमरापूरकर यांच्यासह त्यांनी महाराष्ट्रातील सामाजिक कार्यात मोलाचा वाटा उचलला. नव्वदच्या दशकात सामाजिक कार्यकर्त्यांच्या मदतीसाठी सामाजिक कृतज्ञता निधीसुरू करण्याची कल्पना या दिग्गजांच्या मनात आली. त्यांनी आचार्य अत्रे यांच्या ’लग्नाची बेडी’ या विनोदी नाटकाचे महाराष्ट्रभर प्रयोग करून, त्यातून पैसे उभे करून महाराष्ट्रातील सामाजिक कार्यकर्त्यांना आर्थिक बळ दिले.’परमेश्वराला रिटायर करा’ हे त्यांचे वाक्य प्रचंड गाजले. बुद्धिप्रामाण्यवादी, विवेकवादी डॉ. लागूंनी आपल्या तत्त्वांशी कधीही तडजोड केली नाही. ’सखाराम बाइंडर’ आणि ’घाशीराम कोतवाल’ या दोन्ही नाटकांच्या मागे ते खंबीरपणे उभे राहिले आणि अभिव्यक्तिस्वातंत्र्यासाठी कायमच लढा दिला. विजय तेंडुलकर यांचे ’गिधाडे’ हे वेगळ्या वाटेवरचे नाटक रंगमंचावर आणण्याचे आणि त्याचे नेटाने प्रयोग करण्याचे श्रेयही नि:संशय त्यांचेच. श्याम मनोहर यांचे प्रेमाची गोष्ट?’ आणि मकरंद साठे यांचे ’सूर्य पाहिलेला माणूसया नाटकांतील अवघड भूमिका त्यांनी उतारवयातही मोठ्या ताकदीने केल्या. नव्या रंगकर्मींना आधार देण्याचे, बळ देण्याचे काम ते कायम करीत. पुण्यातील नाटकाच्या कुठल्याही नव्या प्रयोगाला ते पत्नी दीपा श्रीराम यांच्यासह पहिल्या रांगेत हजर असत. मुलगा तन्वीर याच्या अपघाती निधनानंतर त्यांनी रंगकर्मींना प्रोत्साहन देण्यासाठी ’तन्वीर सन्मान’ पुरस्कार सुरू केला. नव्वदी ओलांडल्यानंतरही ते वेताळ टेकडीवर नियमित चालायला जायचे. कर्वेनगर परिसरातील अनेकांना आपले ’दादा’ सकाळी फिरताना दिसायचे. डॉ. लागू हे १७ डिसेंबर २०१९ रोजी वयाच्या ९२व्या वर्षी आपल्याला सोडून गेले, पण आजही त्यांच्या भूमिका मनात ठसलेल्या आहेत. केवळ महाराष्ट्राचाच नव्हे, तर भारताचा एक प्रमुख रंगकर्मी, चित्रकर्मी व मराठी-हिंदी सिनेसृष्टीच्या या माणूसपण जगलेल्या डॉक्टर अभिनेत्याला मनापासून सलाम...
 
 

 

- आशिष निनगुरकर

 
 
@@AUTHORINFO_V1@@