बेस्टच्या २५९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण

    दिनांक  30-May-2020 17:14:39
|
best _1  H x W:
 
 

मुंबई : अत्यावश्यक सेवा देताना आतापर्यंत बेस्टच्या २५९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली. मात्र यातील १४० कर्मचारी बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. तर आठ कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. दरम्यान ११९ कर्मचाऱ्यां रुग्णालयात उपचार सुरू असून यातील ५ जणांना अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले असल्याची माहिती बेस्ट प्रशासनातील एका अधिकाऱ्याने दिली.
मुंबईत कोरोना संसर्गाच्या रुग्णांचे प्रमाण वाढते आहे. अत्यावश्यक सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची लागण झाल्याने आरोग्य विभागापुढे आव्हान उभे राहिले आहे. अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना कामाच्या ठिकाणी सोडण्यासाठी दिवस-रात्र काम करणाऱ्या बेस्टमध्येही कोरोना संसर्गाचा शिरकाव झाला आहे. बेस्टमधील आतापर्यंत २५९ कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली आहे. 
यातील १४० जणांना कोरोनामुक्त झाल्याने घरी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता ११९ कर्मचारी विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. यातील पाच जणांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना खासगी रुग्णालयातील अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आले आहे. बाधित रुग्णांमध्ये ७५ टक्के चालक आणि वाहकांचा समावेश आहे. तर उर्वरित कर्मचारी हे तांत्रिक आणि विद्युत विभागातील आहेत.
सध्या लॉकडाऊन असल्यामुळे अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व गोष्टी बंद आहेत. रिक्षा, टॅक्सी, ओला, रेल्वे बंद असल्यामुळे याचा भार बेस्टवर आला आहे. दररोज १ हजार ५०० बेस्ट बसगाड्या रस्त्यावर धावत आहेत. त्यामुळे तीन हजारपेक्षा जास्त चालक – वाहक आपले कर्तव्य बजावत आहेत. याव्यतिरिक्त वाहतूक निरिक्षक आणि परिवहन विभागाबरोबरच विद्युत विभागातील कर्मचारीही कार्यरत आहेत. 
अपंग कर्मचाऱ्यांसह उच्च रक्तदाब, मधुमेह इत्यादी आजार असलेल्या दीड हजारपेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना घरात राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. दरम्यान, कोरोनावर मात करण्याचे प्रमाण ४८ टक्के असल्याचे बेस्टच्या जनसंपर्क विभागातील अधिकाऱ्याने सांगितले.
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.