मजूरांनी 'जय महाराष्ट्र' म्हणत घेतला निरोप

03 May 2020 14:41:36
Bhivandi Road_1 &nbs 
 
 
 
 
 
 
ठाणे : केंद्र सरकारने देशात ठिकठिकाणी अडकलेल्या स्थलांतरित मजुरांना त्यांच्या मूळ गावी परतण्याची परवानगी दिली आहे. केंद्र सरकारच्या परवानगीनंतर आज ठाणे जिल्ह्यातील भिवंडी रोड रेल्वे स्थानक ते गोरखपूर अशी विशेष श्रमिक रेल्वे रात्री १ वाजता १ हजार १०४ मजुरांना घेऊन रवाना झाली. या रेल्वेतील प्रवाशांना टाळ्यांच्या कडकडाटात जिल्हाप्रशासनाने निरोप दिला.
 
 
 
 
सर्व परप्रांतियांच्या चेहऱ्यावर आज घरी जाण्याचा आनंद ओसंडून वाहत होता. गौरवाची आणि अभिमानाची बाब म्हणजे रेल्वे सुटली तेव्हा त्यांनी मोठमोठ्याने महाराष्ट्र सरकार की जय, जय महाराष्ट्र अशा घोषणा दिल्या. मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी दिलेल्या निर्देशांनुसार परराज्यातील अडकलेल्या मजुरांना घरी पाठविण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याच्या सुचना पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी जिल्हा प्रशासनास दिल्या होत्या. 
 
 
 
 
त्यानुसार कोकण विभागीय आयुक्त शिवाजीराव दौंड यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर आणि पोलिस आयुक्त विवेक फणसळकर त्यांच्या टिमने सकाळपासून या ट्रेनचे नियोजन सुरु केले. शनिवारी सकाळी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेष ट्रेन गोरखपूरसाठी सोडणार असल्याचे संबंधित यंत्रतणेला सांगण्यात आले होते. 
 
 
 
 
जिल्हा प्रशासनाकडून या प्रवासासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्यात आली असून सोशल डिस्टनसिंगचे पालन करून चोख व्यवस्था केली होती. या ठिकाणी त्यांची आरोग्य विभागाकडून तपासणीही करण्यात आली. रेल्वेमध्ये पाठवण्यात येणाऱ्या प्रवाशांना सोशल डिस्टन्स पाळणे बंधनकारक करण्यात आले होते. प्रवाशांसाठी चालवण्यात येणारी ही रेल्वे पूर्ण पणे सॅनिटाईज करण्यात आली.



 
 
 
प्रत्येक प्रवाशाने चेहऱ्यावर मास्क किंवा रुमाल घातला असल्ची खात्री करुन घेण्यात येत होती तसेच प्रवाशांच्या जेवणाची आणि पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली होती . तसेच सोबत सुके खाद्यपदार्थ ही देण्यात आले होते.विशेष म्हणजे मजुरांनी सर्वच ठिकाणी गर्दी केल्याने विशेष श्रमिक ट्रेनचे बुकिंग काही वेळातच बुकिंग फुल झाले होते. रेल्वे स्थानकात कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी भिवंडी पोलीस उपआयुक्त राजकुमार शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली भिवंडी रेल्वे स्थानक परिसरात मोठ्याप्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. तर स्थानकातही लोहमार्ग पोलिसांचा बंदोबस्त तैनात होता.
Powered By Sangraha 9.0