अमेरिकेत वर्णभेद आणि दंगल

    दिनांक  29-May-2020 21:05:11   
|
floyed_1  H x W


अमेरिकेमध्ये मिनीयापोलीस शहरात सध्या दंगल, लुटमार सुरू आहे. हजारो लोक चेहर्‍याला मास्क लावून लूटमार, जाळपोळ करताना दिसतात. सारे जग कोरोनामुळे ठप्प असताना अमेरिकेमध्ये ही दंगल उसळली आहे. आधीच अमेरिकाही कोरोनामुळे जेरीस आली आहे, मात्र अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की, “जाळपोळ, लूटमार आणि शहरात दहशत माजवणार्‍यांवर कडक कायदेशीर कारवाई केली जाईल.” अर्थात, राष्ट्राध्यक्ष म्हणून कोणत्याही देशाच्या राष्ट्राध्यक्षांना देशातील अशा अराजकतेवर कठोर निर्णय घ्यावाच लागला असता. या दंगलीला कारणीभूत ठरला तो एका कृष्णवर्णीय व्यक्तीचा मृत्यू. त्याचे नाव फ्लॉएड. बिलामध्ये फेरफार केला म्हणून त्याला पोलिसांनी पकडले. तिथेच त्याचा मृत्यू झाला. त्याच्या मृत्यूचा व्हिडिओ मात्र लोकांसमोर आला. त्यात फ्लॉएडच्या हातात हातकड्या आहेत. तो जमिनीवर गुडघे टेकू न बसला आहे. त्याच्या समोर श्वेतवर्णीय पोलीस अधिकारी आणि त्याचे दोन सहकारी आहेत. फ्लॉएडच्या चेहर्‍यावर यातना स्पष्ट आहेत. तो माफी मागतोय. पण, अधिकार्‍यांनी फ्लॉएडच्या मानेवर गुडघा दाबला आहे. इतका जोरात मानेवर दबाव दिला आहे की, फ्लॉएडला श्वास घ्यायला त्रास होतोय. तो कसाबसा म्हणतो की, “मी मरेन, मला श्वास घेता येत नाही. मला सोडा. दया करा.” पण, अधिकारी आणखी जोरात फ्लॉएडची मान दाबतो. इतकी की फ्लॉएड अखेर श्वास सोडतोच.


प्रसंग लिहितानाही त्या क्रौयाचा संताप येतो. वाटते, अधिकाराचा, आपल्या सत्तेचा इतका विकृत माज माणसाला होऊ शकतो? तो व्हिडिओ पाहून कृष्णवर्णीयांचा संताप उफाळून आला आणि दंगल सुरू झाली. त्या पोलीस अधिकार्‍यावर कारवाईही झाली. इथे एक प्रश्न आहे की कृष्णवर्णीय व्यक्तीने कृष्णवर्णीय व्यक्तीचा किंवा श्वेत व्यक्तीचा श्वेत व्यक्तीनेच असा संतापजनक खून केला असता, तर ही दंगल झाली असती का? कदाचित नाही. माणसाच्या न्याय-अन्यायाची परिभाषाही वंशवर्ण, जातपात, धर्म आणि न जाणो कित्येक वर्गवारीत अडकली आहे. विषयांतर झाले, पण अमेरिकेतील कृष्णर्वणीय लोकांचे म्हणणे आहे की, “अमेरिकेत नेहमीच आमच्याशी दुजाभाव केला जातो.”


अमेरिकेत १९५०च्या दशकातही अशीच दंगल भडकली होती. त्याकाळी बसमध्ये कृष्णवर्णीय लोकांना बसमध्ये राखीव सीट असायच्या. त्याचेही कारण आहे की, बसमध्ये श्वेतवर्णीय आणि कृष्णवर्णीय दोघेही एकाचवेळी चढले तर बसमध्ये रिकाम्या जागेवर श्वेतवर्णीय व्यक्तीच बसायची. त्यामुळे अमेरिकेने त्याकाळी कृष्णवर्णीयांना बसमध्ये जागा आरक्षित केल्या. एकदा काय झाले की, या आरक्षित जागेवर एक कृष्णवर्णीय महिला बसली होती. बसमध्ये जागा नव्हती. इतक्यात एक श्वेतवर्णीय महिला आली आणि तिने या कृष्णवर्णीय महिलेला सांगितले ”ऊठ, मला बसायचे, तुला कळत नाही का आम्हाला जागा द्यायची ते.” यावर त्या कृष्णवर्णीय महिलेने नकार देत सांगितले, ”ही जागा आमच्यासाठी राखीव आहे.” आता अमेरिकन कायद्यानुसार तिचे म्हणणे योग्यच होते. पण, इथे घडले उलटेच. श्वेतवर्णीय महिलेला बसायला जागा देण्यासाठी जागेवरून उठली नाही, म्हणून त्या कृष्णवर्णीय महिलेला पोलिसांनी अटकही केली आणि तिच्यावर केसही झाली. या अन्यायाविरोधात अमेरिकेतील कृष्णवर्णीय नागरिक रस्त्यावर उतरले. खूप मोठी दंगल झाली. त्याचा परिणाम असा झाला की, १९६५ साली अमेरिकेमध्ये कृष्णवर्णीय लोकांनाही मतदानाचा अधिकार मिळाला. थोडक्यात अमेरिकेमध्ये असल्या दंगली काही नव्यानेच होत नाहीत. सध्या कोरोनाच्या काळात समाजअभ्यासकांचे मत आहे की, अमेरिकेतील श्चेतांच्या तिप्पट संख्येने कृष्णवर्णीय कोरोनाग्रस्त आहेत. कोरोनमुळे होणार्‍या मृत्यूचे प्रमाणही श्वेतवर्णीय व्यक्ती १, तर कृष्णवर्णीय व्यक्ती ६ असे आहे. ही मृत्यूचीही वर्गवारी सांगताना अभ्यासक सांगतात की, अमेरिकेमध्ये कोणाला जगण्याच्या जास्त संधी उपलब्ध आहेत हे यावरून कळते.


हे पाहून आपल्याकडच्या काही तथाकथित पुरोगाम्यांचे वक्तव्य आठवले. ते म्हणतात की, ”आपल्या देशातील अल्पसंख्याक, दलित यांचे आणि अमेरिकेतील काळ्यांचे (हा त्या पुरोगामी लोकांचा शब्द, माझा नव्हे) दु:ख एक आहे.” पण, अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची स्थिती पाहून वाटते की, या पुरोगामी विचारवंतांनी जरा नव्याने विचार करावा. भारत देशात समरस समानतेचा कायदा सांगणार्‍या संविधानाचे राज्य आहे आणि तो कायदा पाळणारे चांगले लोकही आहेत. त्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतील कृष्णवर्णीयांची स्थिती अत्यंत वाईटच आहे.आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.