कळव्यात वन कर्मचाऱ्यांवर भ्याड हल्ला; तीन कर्मचारी जखमी

    दिनांक  28-May-2020 15:10:16
|
forest_1  H x W


अतिक्रमण करणाऱ्यांनी केला हल्ला


मुंबई (विशेष प्रतिनिधी) - कळव्यामधील राखीव वनक्षेत्रात गस्तीसाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर अतिक्रमण करणाऱ्यांनी भ्याड हल्ला केला आहे. आज सकाळी ही घटना घडली. यामध्ये तीन वनकर्मचाऱ्यांना दुखापत झाली आहे. लाॅकडाऊनदरम्यान वन क्षेत्रांमध्ये अतिक्रमण होत असल्याचे सातत्याने समोर येत आहे.
 
 
 
लाॅकडाऊनमुळे लागू असलेल्या संचारबंदीचा फायदा उचलून वन क्षेत्रांमध्ये बेकायदा अतिक्रमणांचा विळखा वाढत आहे. अशा परिस्थितीत या बेकायदा बांधकामांना आळा बसावा म्हणून नियमित गस्त घालत आहेत. मात्र, गस्त घालण्यासाठी गेलेल्या वन कर्मचाऱ्यांवर अतिक्रमण करणारे लोक हल्ला करत असल्याच्या घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील वन कर्मचाऱ्यावर अशाच प्रकारे हल्ला झाला होता. आज सकाळी असाच प्रकार कळवा वन परिमंडळमध्ये घडला. कळवा येथील घोलाई नगर परिसरातील राखीव वनक्षेत्रात सात वन कर्मचारी गस्तीसाठी गेले होते. यामध्ये तीन महिला आणि चार पुरूष कर्मचारी होते. गस्तीदरम्यान त्यांना वन विभागाच्या हद्दीत काही इसम घर बांधत असल्याचे दिसले. चौकशी करण्यासाठी कर्मचारी त्याठिकाणी गेले असता अतिक्रमण करणाऱ्या लोकांनी दगड-विटांनी त्यांच्यावर हल्ला केला. या हल्लात वनपाल अर्जुन निचाते, समीर इनामदार आणि रोजंदारी मजूर सचिन म्हात्रे जखीम झाले. निचाते आणि म्हात्रे यांच्या डोक्याला मार लागला असून इनामदारांना पायाला दुखापत झाली आहे. बापू पवार या इसमाने त्यांच्यावर हल्ला केल्याची माहिती मिळाली आहे. या प्रकरणी कळवा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केल्याची माहिती ठाण्याचे उपवनसंरक्षक डाॅ. जितेंद्र रामगावकर यांनी दिली. तसेच या भागात झालेले बेकायदा बांधकामांवर पोलीसांच्या मदतीने कारवाई करणार असल्याचे त्यांनी सांगितले. 
 
 
 
 
 
आता महाMTBच्या बातम्या आणि लेख मिळवा एका क्लिकवर. Facebook, Twitter, Helo वर आम्हाला फॉलो करा, महाMTB You tube चॅनलला सबस्क्राईब करा. डाऊनलोड करा महाMTB App.