पालिकेचा भरही आता डिजिटल शिक्षणावर!

@@NEWS_SUBHEADLINE_BLOCK@@

    28-May-2020
Total Views |
BMC_1  H x W: 0


चाचणी सुरू; शिक्षकांना मिळणार प्रशिक्षण

मुंबई : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शाळा वेळेवर सुरू होण्याची शक्यता कमी असताना, राज्यातील शालेय विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण देण्याबाबत राज्य सरकार अनुकूल आहे. त्याच पद्धतीने पालिका शिक्षण विभागही डिजिटल शिक्षणावर भर देणार आहे. त्यासाठी चाचणी सुरू झाली असून शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे.


कोरोनामुळे पालिका शाळांचे नियमित वर्ग भरविणे अशक्य होणार असल्याने, पालिका शिक्षण विभागाने डिजिटल आराखडा बनवण्यासाठी चाचपणी सुरू आहे. हा आराखडा पूर्ण झाल्यानंतर शिक्षकांना एक दिवसाचे प्रशिक्षण देऊन १५ जूनपासून विद्यार्थ्यांचे डिजिटल शिक्षण सुरू करण्याचा विचार पालिकेचा शिक्षण विभाग करत आहे.


कोरोनामुळे मुंबईसह राज्यातील शाळा आता १ जूनऐवजी १५ जूनपासून सुरू होणार आहेत. मात्र, ग्रीन झोन सोडून सर्व ठिकाणी शाळा डिजिटली सुरू होणार असून त्यासाठी सर्व प्रकारच्या सूचना आणि पर्यायांचा विचार सुरू असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी म्हटले होते. त्या धर्तीवर पालिका शिक्षण विभागही आपल्या परीने अनेक पर्यायांबाबत विचार करत आहे. काही सूचना आणि पर्यायांबाबत अंतिम आराखडा बनवला जात आहे. या आराखड्याला येत्या ५ ते ६ दिवसात अंतिम स्वरूप दिले जाणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या डिजिटल शिक्षणात अडथळे येऊ नयेत म्हणून पालिकेकडे असलेले टॅब ८ ते १० वीच्या विद्यार्थ्यांना दिले जाणार आहेत.


त्याचबरोबर विषय आणि तासिकांचे वेळापत्रक बनवणे सुरू केले आहे. ज्या मुलांकडे मोबाईलची सुविधा नसेल त्यांच्या पालकांना शाळेत बोलावून पाठयपुस्तके, ऑडिओबुक दिली जाणार आहेत. त्यांना साध्या फोनवरूनही शिकवता, मार्गदर्शन करता येणार आहे. मात्र, रेड झोनमधील विद्यार्थी आणि पालकांना शाळेत बोलावले जाणार नाही.


दरम्यान, येत्या ५ ते ६ दिवसात डिजिटल शिक्षणासंदर्भात पुन्हा बैठक घेऊन अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती शिक्षण अधिकाऱ्यांनी दिली. कुठल्या वेळेत कोणता विषय शिकवायचा, विषयाची लिंक कशी उघडायची याची पूर्ण माहिती शिक्षकांना दिली जाईल. याचा डिजिटल प्रशिक्षण आराखडा तयार करण्यात येत आहे. तो पूर्ण झाला की, त्याबाबतचे प्रशिक्षण शिक्षकांना दिले जाईल आणि मग डिजिटल शिक्षण सुरू होईल, असेही अधिकाऱ्यांनी सांगितले.
@@AUTHORINFO_V1@@